‘मिस्ट्री बॉलर’...वरुण चक्रवर्ती !
सध्याच्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पाहुण्या फलंदाजांना प्रामुख्यानं पिडू लागलाय तो ‘मिस्ट्री बॉलर’ म्हणून ख्याती मिळविलेला वरुण चक्रवर्ती...यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही त्यानं आपला इंगा व्यवस्थित दाखविला होता...भारतीय ‘टी-20’ संघातून डच्चू मिळाल्यानंतर पुन्हा जिद्दीनं संघात प्रवेश मिळविलेल्या अन् मागील नोव्हेंबरमध्ये पाऊल ठेवल्यापासून 10 सामन्यांत 27 जणांना टिपलेल्या या वैशिष्ट्यापूर्ण शैलीच्या ऑफस्पिनरच्या कारकिर्दीवर टाकलेली धावती नजर...
एखाद्या व्यक्तीचं वर्णन ‘गूढ’ शब्दाच्या साहाय्यानं केल्यास लोकांची उत्सुकता ताणण्यास फारसा वेळ लागत नाहीये...क्रिकेटमध्ये सुद्धा विश्लेषकांवर ‘त्याची’ मोहिनी पडण्यास हीच बाब कारणीभूत ठरलीय. जेव्हा ‘त्या’ गोलंदाजानं भारतीय क्रिकेट संघात प्रवेश मिळविण्याच्या दृष्टीनं प्रवास सुरू केला तेव्हा ‘त्याचा’ समावेश देखील ‘गूढ फिरकी गोलंदाज’ अशाच गटात करण्यात आला...भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं त्याच्या ‘यू-ट्युब चॅनल’वर भविष्यवाणी वर्तविली होती ती भारत नि इंग्लंड यांच्यातील ‘टी-20’ मालिकेत इंग्लिश फलंदाज ‘त्याच’ गोलंदाजासमोर धडपडण्याची. वायफळ बडबडीची सवय नसलेल्या अश्विनचा ‘कॅरम बॉल’ इथंही अचूक टप्प्यावर पडलाय असंच म्हणावं लागेल...
कोलकात्यातील इडन गार्डन्सवरील पहिल्याच सामन्यात ‘तो’ सहाव्या षटकात गोलंदाजीसाठी आला आणि तामिळनाडूच्या त्या फिरकी गोलंदाजानं त्याच्या दुसऱ्याच षटकात ब्रूक व लिव्हिंगस्टोन यांना पाठोपाठ पॅव्हिलियनचा रस्ता दाखविला. आकड्यांच्या साहाय्यानं कामगिरी सांगायची झाल्यास 4 षटकांत 23 धावा व 3 बळी...चेन्नईतील दुसऱ्या लढतीतही ‘त्यानं’ पुन्हा एकदा ब्रूकला ‘मामा’ बनविलं व ओव्हरटोनचा सुद्धा बळी मिळविला. 4 षटकांत 38 धावांच्या बदल्यात 2 बळी...पण ‘त्यानं’ खरी कमाल केली ती राजकोटमध्ये. 24 धावांत 5 बळी मिळविणाऱ्या त्या गोलंदाजानं 1 बाद 83 अशा भक्कम स्थितीत असलेल्या इंग्लंडचा डाव अक्षरश: 360 अंशांत फिरविल्यानं तब्बल नऊ फलंदाज केवळ 64 धावांत तंबूत परतले...तामिळनाडूचा ऑफस्पिनर वरुण चक्रवर्ती...
वरुण दक्षिण आफ्रिकेत यजमान फलंदाजांना आपल्या तालावर नाचविल्यानंतर पुन्हा एकदा सुरात आलाय आणि इंग्लंडविरुद्धची सध्या सुरू असलेली ‘टी-20’ मालिका म्हणजे त्याचं सणसणीत उदाहरण...काही टीकाकारांच्या मते, त्याचा समावेश तीन ‘फिंगर स्पिनर्स’पैकी एकाला वगळून ‘चॅम्पियन्स चषक’ स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात करणं शक्य होतं. कारण त्याची अन् कुलदीप यादवची जेडी दुबईमध्ये छान जमली असती. मात्र अनेकांना वाटतंय की, वरुण चक्रवर्तीनं भारताच्या एकदिवसीय संघात प्रवेश मिळविण्यासाठी अजूनही स्वत:ला सातत्यानं सिद्ध करण्याची गरज असून त्याच्यात चमक दाखविण्यासाठी आवश्यक ती गुणवत्ता निश्चितच लपलीय...
परंतु ‘टी-20’चा विचार केल्यास मात्र चित्र बदलतं...तब्बल तीन वर्षांच्या गैरहजेरीनंतर भारतीय संघात परतलेल्या त्या 33 वर्षीय गोलंदाजानं पटकन वरच्या दिशेनं झेपावण्याचा सपाटा चालू ठेवलाय व त्यामुळं दिग्गज समालोचकांना सुद्धा त्याची दखल घ्यावीच लागलीय...खरं म्हणजे त्याच्या यशस्वी प्रवासाला प्रारंभ झाला होता तो काही वर्षांपूर्वी. पण भारतीय संघातून वगळण्यात आल्यानंतर त्यानं प्रशिक्षक ए. सी. प्रथिबन यांना प्रश्न केला होता तो पुनरागमन करण्याच्या शक्यतेसंबंधी, आपल्या क्षमतेसंबंधी...वरुण चक्रवर्तीच्या शब्दांत सांगायचं झाल्यास, ‘2021 सालच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर मी माझ्या गोलंदाजीचं विश्लेषण केलं आणि मला कळलं की, मी जास्त ‘साईड-स्पिन’चा वापर करतोय. त्यामुळं फलंदाजाला चकविणं कठीण व्हायचं. यावर तोडगा काढण्यासाठी गरज होती ती चेंडूच्या उसळीच्या साहाय्यानं फलंदाजांना गोंधळवून टाकण्याची. या पार्श्वभूमीवर मी सराव केला तो ‘ओव्हर-स्पिन’चा. तो डावपेच अजूनपर्यंत तरी यशस्वी ठरलाय’...
पुनरागमन करण्यापूर्वी वरुण चक्रवर्तीनं त्याच्या शैलीत काही तांत्रिक बदल करण्याबरोबर फलंदाजांसाठी डावपेच आखण्यावर भर दिला...कित्येक टीकाकारांच्या मतानुसार, तो आता पूर्वीपेक्षा जास्त शांत वाटतोय. त्याच्या भात्यात अनेक प्रकारचे चेंडू असल्यामुळं तो विविध प्रयोग करण्यावर भर द्यायचा. परंतु आता त्यानं त्यांचं प्रमाण कमी केल्यानं मनातील संभ्रम कमी होऊन गोलंदाजी जास्त प्रभावी होण्यास मदत झालीय...तामिळनाडूचे माजी ऑफस्पिनर व प्रशिक्षक प्रथिबन यांनी सांगितल्यानुसार, वरुण व ते प्रत्येक मालिका वा स्पर्धेपूर्वी विविध फलंदाजांच्या तंत्राचा अभ्यास करतात अन् त्यानुसार गोलंदाजीचा टप्पा वा चेंडूंचा ‘सिक्वेन्स’ ठरविला जातो...
वरुण चक्रवर्तीला भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या दृष्टीनं मोलाचा हात दिला तो 2023 (20 बळी) नि 2024 (21 बळी) या ‘इंडियन प्रीमियर लीग’च्या दोन मोसमांनी...त्यानंतर त्याला बांगलादेशविरुद्धच्या ‘टी-20’ मालिकेत संधी देण्यात आली नि त्यानं फक्त 14 धावांत 5 बळी मिळविले. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत देखील पाच ‘टी-20’ सामन्यांत 12 फलंदाजांना टिपून मुख्य हत्यार ठरला तो वरुणच. त्यात समावेश होता तो पोर्ट एलिझाबेथ इथं 17 धावांत गुंडाळलेल्या पाच फलंदाजांचा...त्यानं 2024-25 मोसमातील एकदिवसीय लढतींच्या विजय हजारे चषक स्पर्धेत 18 बळी खिशात घातले (या पार्श्वभूमीवर त्याला वाटतंय की, प्रत्येक खेळाडूनं देशी क्रिकेट आवर्जुन खेळायला हवं)...आणि आता त्यावर कडी करणारी सध्या चालू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील जबरदस्त कामगिरी !
वळणांनी भरलेला प्रवास...
- वरुण चक्रवर्तीनं क्रिकेटमधील कारकिर्दीला खरं तर सुरुवात केली होती ती यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून. परंतु त्यानंतर त्यानं क्रिकेटला ‘गूड बाय’ म्हणण्याचा निर्णय घेतला अन् संपूर्ण लक्ष केंद्रीत करण्याचं ठरविलं ते ‘आर्किटेक्चर’मधील पदवी मिळविण्यावर. तो पुढं ‘फ्री लान्स आर्किटेक्ट’ बनला देखील...
- शिकत असताना वरुण टेनिसबॉल क्रिकेट मात्र नेहमी खेळायचा. मग अचानक एके दिवशी त्यानं निर्णय घेतला तो पेशाला रामराम ठोकून व्यावसायिक क्रिकेटपटू बनण्याचा...
- वरुण ‘क्रॉमबेस्ट क्रिकेट क्लब’मध्ये सामील झाला तो वेगवान गोलंदाज म्हणून. परंतु गुडघ्याला झालेल्या दुखापतीनं त्याला फिरकी गोलंदाज बनविलं...हा ‘मास्टर स्ट्रोक’ ठरला. कारण 2017-18 मोसमात 7 लढतींत तब्बल 31 बळी मिळवून त्यानं कीर्ती मिळविली ती ‘गूढ गोलंदाजा’ची...
- वरुण चक्रवर्तीनं ‘चेन्नई लीग’च्या चौथ्या विभागात खेळताना गोलंदाजीत विविध प्रयोग करण्यास प्रारंभ केला आणि 2018 साली तामिळनाडू ‘टी-20’ लीगचं अजिंक्यपद त्याच्या मदुराई संघाला मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला...
- मग त्याची ख्याती भारतभर पसरण्यास फारसा वेळ लागला नाही अन् चेन्नई व कोलकाता यांनी ‘इंडियन प्रीमियर लीग’मध्ये ‘नेट बॉलर’ म्हणून त्याचा समावेश केला...
- वरुण चक्रवर्तीला तामिळनाडूचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली ती 2018-19 च्या मोसमातील विजय हजारे स्पर्धेत. त्यानंही निवड समितीची निराशा केली नाही आणि 9 सामन्यांत 22 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठविलं. त्याच मोसमात तो पहिला रणजी चषक सामना खेळला हैदराबादविरुद्ध..
‘पंजाब’ ते भारतीय संघ...
- 2019 मोसमाला सुरुवात झाली अन् वरुण चक्रवर्तीला ‘आयपीएल’मध्ये खेळण्याची प्रथम संधी दिली ती पंजाबनं. विशेष म्हणजे त्या स्पर्धेत तो सर्वप्रथम खेळला कोलकात्याविरुद्धच...पण सुरुवात मात्र मनाप्रमाणं झाली नाही...
- त्यानंतर 2020 च्य ‘आयपीएल’मध्ये वरुणला शाहरुखच्या ‘कोलकाता नाईट रायडर्स’नं खेचलं. त्या वर्षी त्यानं स्पर्धेत 17 बळी मिळवून प्रत्येकाला प्रभावित केल्यानंतर त्याचा समावेश करण्यात आला तो ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरील संघात. पण दुखापतीमुळं त्याची संधी हुकली...
- इंग्लंड दौऱ्यावर सुद्धा तो जखमी झाल्यामुळं जाऊ शकला नाही...वरुण चक्रवर्ती शेवटी पहिलीवहिली टी-20 आंतरराष्ट्रीय लढत खेळला तो श्रीलंकेविरुद्ध 2021 साली...त्याला त्याच वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या ‘टी-20 विश्वचषकासाठी निवडण्यात आलं...या विश्वचषकातील पाकिस्तान, न्यूझीलंड व स्कॉटलंडविरुद्धच्या तीन लढतींत त्यानं 11 षटकांत 71 धावा मोजल्या, परंतु एकही बळी मिळविणं शक्य झालं नाही आणि भारत सुद्धा ‘सुपर ट्वेल्व्ह’मध्ये गारद झाला. मग त्याच्यासाठी संघाचे दरवाजेही बंद झाले...
- त्यानंतर 2022 सालचा आयपीएल मोसम देखील वरुणसाठी फारसा फलदायी ठरला नाही आणि सहा सामन्यांतून बळी मिळाले ते अवघे 11...
‘टी-20’मध्ये एका डावात 5 बळी मिळविणारे भारतीय गोलंदाज
- वरुण चक्रवर्ती : 2 (दक्षिण आफ्रिका व इंग्लंडविरुद्ध)...
- कुलदीप यादव : 2 (इंग्लंड नि दक्षिण आफ्रिकाविरुद्ध)...
- भुवनेश्वर कुमार : 2 (दक्षिण आफ्रिका व अफगाणिस्तानविरुद्ध)...
- युजवेंद्र चाहल : 1 (इंग्लंडविरुद्ध)...
- दीपक चाहर : 1 (बांगलादेशविरुद्ध)...
- राजू प्रभू