अमेरिकेत दोन भारतीय विद्यार्थ्यांचा रहस्यमय मृत्यू
16 दिवसांपूर्वीच पोहोचले होते अमेरिकेत : झोपेतच घेतला अखेरचा श्वास
वृत्तसंस्था/ कनेक्टिकट
अमेरेकच्या कनेक्टिकटमध्ये 2 भारतीय विद्यार्थ्यांचा रहस्यमय स्थितीत मृत्यू झाला आहे. दोघेही 16 दिवसांपूर्वीच उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत दाखल झाले होते. यातील एक विद्यार्थी गट्टू दिनेश हा तेलंगणाचा तर दुसरा विद्यार्थी निकेश हा आंध्रप्रदेशचा होता. पोलिसांनी दोन्ही विद्यार्थ्यांचा झोपेत मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांना दिली आहे.
दिनेशचे मित्र त्याला भेटण्यासाठी त्याच्या रुमवर गेले असता दोघेही झोपलेल्या अवस्थेत आढळले. दोघांनाही जागे करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या शरीरात कुठलीच हालचाल दिसून आली नाही. रुग्णवाहिकेद्वारे त्यांना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले, जेथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले आहे. या दोघांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
विषारी वायूने मृत्यू झाल्याचा संशय
22 वर्षीय गट्टू दिनेशच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. दिनेश आणि त्याच्या मित्राचा विषारी वायूमुळे मृत्यू झाल्याचा संशय त्याच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. दिनेशने मागील वर्षी चेन्नईतील एका खासगी विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेकची पदवी मिळविली होती. यानंतर त्याने कनेक्टिकटच्या सेक्रेड हार्ट युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला होता. गट्टू दिनेशचे कुटुंबीय आता अमेरिकेसाठी रवाना झाले आहेत. तर निकेश याच्या कुटुंबीयांबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही.