For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माय-लेकीने रचला कट...पण शेवटी झालीच अटक!

11:38 AM Sep 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
माय लेकीने रचला कट   पण शेवटी झालीच अटक
Advertisement

वारंवारच्या त्रासाला कंटाळून पतीचा आवळला गळा, नैसर्गिक मृत्यू भासवण्याचा प्रयत्न, पोलिसांनी उघडे पाडले पितळ, वरिष्ठ अधिकाऱ्यांडून पोलीस पथकाचे कौतुक

Advertisement

बेळगाव : एक महिन्यापूर्वी पिरनवाडी, ता. बेळगाव येथील रहिवाशाच्या झालेल्या गूढ मृत्यूचा संपूर्ण उलगडा झाला आहे. त्याची पत्नी व सासूने खून केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून त्या दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी व्यवस्थित तपास केला नसता तर कदाचित हे प्रकरण उघडकीस आले नसते. विनायक जाधव (वय 48) रा. पिरनवाडी याचा दि. 29 जुलै रोजी मृत्यू झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. नैसर्गिक मृत्यू भासविण्याचा प्रयत्न झाला होता. मृतदेह पाहताच पोलिसांच्या मनात संशय बळावला. त्यामुळे संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद करून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात करण्यात आली.

बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी, पोलीस उपनिरीक्षक आदित्यराजन व त्यांच्या सहकाऱ्यांनी वैज्ञानिकरित्या या प्रकरणाचा तपास सुरू केला. शवचिकित्सा अहवाल येईपर्यंत पोलिसांनी स्थानिक चौकशी पूर्ण केली होती. संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद झाल्यानंतर एक-दोन दिवसातच विनायकच्या पत्नीवरच संशय बळावत होता. शवचिकित्सा अहवाल उपलब्ध झाल्यानंतर गळा आवळून त्याचा खून केल्याचे उघडकीस आले. त्यावेळी पोलिसांनी आजवरच्या तपासात उघडकीस आलेल्या माहितीच्या आधारावर पत्नीला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली असता तिने खुनाची कबुली दिली. प्रत्यक्षात हा प्रकार 30 जुलै रोजी उघडकीस आला असला तरी संपूर्ण तपासाअंती 30 ऑगस्ट रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. खून झालेल्या विनायकची पत्नी रेणुका जाधव (वय 36) रा. पिरनवाडी, त्याची सासू शोभा मंगण्णावर (वय 56), रा शिंदोळी या दोघा जणांना अटक केली आहे. एखाद्या गूढ चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यात आला आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, उपायुक्त रोहन जगदीश आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी  खुनाचा छडा लावणाऱ्या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.

Advertisement

उपलब्ध माहितीनुसार व्यवसायासाठी विनायकने बँकांमधून कर्ज उचलले होते. आणखी काही ठिकाणाहून हातउसनेही घेतले होते. त्याची परतफेड करता आली नाही म्हणून त्याला गाव सोडावे लागले होते. त्याचे वर्कशॉप होते. ते बंद झाल्यानंतर कामानिमित्त तो पुण्याला गेला होता. पत्नी आणि विनायक यांच्यात संशयावरून बेबनाव निर्माण झाला होता. 19 जुलै रोजी विनायकने आपल्या पत्नीला मेसेज केले होते. तुला संपवतो, असा तो मेसेज होता. त्यामुळे पतीवर पत्नीचा राग अनावर झाला होता. 29 जुलै रोजी विनायक नशेत घरी पोहोचला. तो झोपेतही आपल्या पत्नीच्या चारित्र्याविषयी बडबडत होता. त्यामुळे पतीला संपविण्याचा निश्चय करून रेणुकाने नायलॉन दोरीने गळा आवळला. रात्री 11.30 वाजता ही घटना घडली. त्याचवेळी रेणुकाच्या आईने त्याला सोडायचे नको, असे सांगत विनायकच्या तोंडावर उशी ठेवून श्वास कोंडला. एवढ्यावर या मायलेकींचे समाधान झाले नाही. त्यांनी विनायकला लाथा मारल्या. त्यानंतर मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास मृतदेह घराबाहेर ठेवून त्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे भासविण्यात आले होते. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून मायलेकींना अटक केली आहे.

वैज्ञानिक मार्गाने केलेल्या तपासामुळे उलगडा

विनायकचा मृतदेह पायऱ्यांवर ठेवून त्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे भासविण्यात आले होते. त्याचे सीमकार्डही तोडण्यात आले. खिडकीतून मोबाईल फेकून देऊन पुरावे नष्ट करण्यात आले होते. शेवटी वैज्ञानिक मार्गाने केलेल्या तपासामुळे या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला आहे. खून प्रकरणाचा तपास करणाऱ्या या पथकात पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांबरोबरच सी. एस. सिंगारी, एस. एस. निडवणी, अमित रुपनवर, विजय कंठीकर, अक्षता नायक, शिल्पा तळ्ळीकेरी आदींचा सहभाग आहे.

Advertisement
Tags :

.