रहस्यमय 10 हजार गुहा
गुहांपर्यंत पोहोचणे अत्यंत अवघड
नेपाळच्या मस्टँग जिल्ह्यात मानवनिर्मित 10 हजार गुहा असून त्यांना मस्टँग केव्स आणि ‘स्काय केव्स’ म्हणूनही ओळखले जाते. या गुहा जमिनीपासून सुमारे 150 फुटांच्या उंचीवर आहेत, ज्यांच्यापर्यंत पोहोचणे प्रत्येकाला शक्य नाही. केवळ निष्णात गिर्यारोहकच या गुहांपर्यंत पोहोचू शकतात. या गुहांमध्ये अनेक रहस्यं दडली आहेत.
तिबेटी पठाराच्या सीमेला लागून असलेले मस्टँग एकेकाळी मोठे साम्राज्य होते, जे नेपाळी हिमालयातील सर्वात दुर्गम क्षेत्र होते. एकेकाळी एक स्वतंत्र बौद्ध साम्राज्य राहिलेल्या मस्टँगला 18 व्या शतकाच्या अखेरीस नेपाळने स्वत:च्या कब्जात घेतले होते. मस्टँग भागात 1992 पर्यंत विदेशी लोकांच्या प्रवेशावर बंदी होती.
नेपाळी जिल्हा मस्टँगमध्ये काली गंडकी नदीमुळे निर्माण झालेल्या अनेक दऱ्याखोऱ्या आहेत, अजब पर्वत असून यात एका अनुमानानुसार 10 हजार प्राचीन गुहा आहेतील यातील काही गुहा खोऱ्यातील जमिनीपासून 150 फुटांहून अधिक उंचीवर आहेत. आता या गुहा पाहण्यासाठी मोठ्या संख्येत लोक येत आहेत.
मस्टँग गुहा अत्यंत प्राचीन असून तेथे अनेक रहस्य दडली आहेत. या गुहा कुणी खोदल्या, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी लोकांनी चढाई कशी केली असे प्रश्न निर्माण झाले आहेत. या गुहांची उंची पाहता केवळ निष्णात गिर्यारोहकच तेथे पोहोचू शकतो. परंतु बहुतांश गुहा आता रिकाम्या आहेत, यातील अनेक गुहांमध्ये चूल, धान्य साठवणुकीची भांडी आणि झोपण्याच्या जागेचे अवशेष दिसून येतात.
काही गुहांमध्ये मानवी अवशेषही मिळाले आहेत, ते पाहता त्यांचा वापर दफन कक्ष म्हणून करण्यात आला असावा असे मानले जाते. या गुहांमध्ये अनेक मानवी मृतदेह आढळून आले असून ते सर्व 2000 वर्षांपेक्षा अधिक जुने आहेत. लाकडी बिछान्यावर हे मृतदेह ठेवण्यात आले होते आणि तांब्याचे दागिने तसेच काचेद्वारे त्यांना सजविण्यात आले होते. तसेच अनेक गुहांमध्ये बौद्ध चित्रे आणि कलाकृती देखील आढळून आल्या आहेत.