For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

म्हैसूर दसरोत्सवाची जम्बो सवारीने सांगता

06:35 AM Oct 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
म्हैसूर दसरोत्सवाची जम्बो सवारीने सांगता
Advertisement

सांस्कृतिक वैभव पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटकांची गर्दी

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर :

मागील 11 दिवसांपासून सुरू असलेला जगप्रसिद्ध म्हैसूर दसरोत्सव उत्साहात संपन्न झाला.  दसरोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेल्या जम्बो सवारीने लाखो प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. राज्याच्या विविध कला, सांस्कृतिक वैभव पाहण्यासाठी देश-विदेशातून लाखो पर्यटक म्हैसुरात दाखल झाले होते. दसरोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच बुधवारी जम्बो सवारीने प्रेक्षक भारावून गेले.

Advertisement

विजयादशमीच्या निमित्ताने बुधवारी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी राजवाडा परिसरात बुधवारी दुपारी 1:36 ते 1:56 या वेळेत नंदिध्वजाची पूजा केली. याप्रसंगी त्यांनी जनतेला विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर, सायंकाळी 4:10 ते 4:35 या वेळेत सुवर्ण अंबारीत विराजमान चामुंडेश्वरी देवीच्या मूर्तीवर पुष्पार्पण केल्यानंतर जम्बो सवारीला प्रारंभ झाला. ऐतिहासिक वारसा, कला, संस्कृती आणि ऐतिहासिक भव्यता दर्शवणारी जम्बो सवारी पाहण्यासाठी देशभरातून आणि परदेशातूनही पर्यटकांनी म्हैसूरमध्ये मोठी गर्दी केली होती. राजेशाही वारसा आणि धार्मिक परंपरांचा संगम असलेल्या या सोहळ्याने म्हैसूर दसऱ्याचे ऐतिहासिक महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले.

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या निमंत्रणावरून, केरळचे मुख्यमंत्री व्ही. डी. सतिशन आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रे•ाr हे जम्बो सवारीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. तसेच विविध देशांचे राजदूत आणि उच्चायुक्त यांच्यासह अनेक विदेशी मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यंदा प्रथमच 750 किलो वजनाची सुवर्ण अंबारी पाठीवर वाहून नेण्याचा मान ‘प्रशांत’ या हत्तीला मिळाला. जम्बो सवारीनिमित्त प्रशांतसह जम्बो सवारीत सामील झालेल्या हत्तींना सजविण्यात आले होते. जम्बो सवारीत राज्यातील संस्कृती व वारशाचे दर्शन घडविणारे 60 हून अधिक चित्ररथ सुमारे पाच किलोमीटरचे अंतर पार करून बन्नीमंटपपर्यंत पोहोचले.  चित्ररथांबरोबरच कलापथके, वाद्यवृंद, पोलिसांचे बॅण्ड पथक, अश्वदलांनी देखील उपस्थितांची मने जिंकली.

सशस्त्र दलांचे चित्ररथही सामील

या मिरवणुकीत विविध सरकारी खात्यांच्या योजना, कार्यक्रम आणि सामाजिक संदेशांवर आधारित चित्ररथही समाविष्ट होते. यंदाच्या म्हैसूर दसऱ्यात प्रथमच शेजारील राज्यांतील सांस्कृतिक पथके आणि चित्ररथांनीही सहभाग घेतला होता. तसेच, सशस्त्र दलांच्या तिन्ही शाखांचे प्रतिनिधित्व करणारे चित्ररथ विशेष आकर्षण ठरले.

विद्युत रोषणाईने म्हैसूर उजळले

कोप्पळ येथील गवीसिद्धेश्वर मठाचे अभिनव गविसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते 11 ऑक्टोबर रोजी दसरोत्सवाचे उद्घाटन झाले होते. मागील 11 दिवसांपासून म्हैसुरात दसरोत्सवानिमित्त एअरो शो, दसरा कुस्ती, महिला दसरा, दसरा फुड फेस्टिव्हल, शेतकरी दसरा, दसरा क्रीडा मेळा, चित्रपट महोत्सव, ड्रोन शो असे अनेक भरगच्च कार्यक्रम आयोजिण्यात आले होते. दसरोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजवाडा आणि परिसर, म्हैसूर शहरातील सर्व चौक व महत्त्वाच्या रस्त्यांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आणखी आठवडाभर विद्युत रोषणाई सुरू राहणार आहे.

राजघराण्याचे गतवैभव पुन्हा जिवंत

दुसरीकडे परंपरेनुसार, वडेयर राजघराण्याचे वंशज यदुवीर कृष्णदत्त चामराज वडेयर यांनी बुधवारी शाही पोशाख परिधान करून अंबा विलास पॅलेसपासून राजवाड्याच्या आवारात असलेल्या भुवनेश्वरी देवीच्या मंदिरापर्यंत विजय यात्रा काढली. तिथे त्यांनी शमी वृक्षाची विशेष पूजा केली. त्याचप्रमाणे राजवाड्याच्या आवारात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे राजघराण्याचा भव्य इतिहास आणि गतवैभव पुन्हा जिवंत झाले. राजवाड्यातील नवरात्रोत्सवामध्ये दैनंदिन विधींचा समावेश असतो. यातील मुख्य आकर्षण म्हणजे खासगी दरबार. दसरोत्सवाच्या पहिल्या दिवशी यदुवीर वडेयर वैदिक मंत्रघोषाच्या गजरात सुवर्णसिंहासनावर आरूढ झाले. त्यांनी खासगी दरबार भरवून राजवाड्यातील कर्मचाऱ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.

Advertisement
Tags :

.