म्यानमारचे विमान मिझोरममध्ये दुर्घटनाग्रस्त
भारतातील स्वत:च्या सैनिकांना नेण्यासाठी आले होते विमान : दुर्घटनेत 8 जण जखमी
ऐझोल
मिझोरममधून स्वत:च्या सैनिकांना परत नेण्यासाठी आलेले म्यानमारचे विमान विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरून दुर्घटनाग्रस्त झाले आहे. विमानात चालक दलाच्या सदस्यांसमवेत एकूण 14 जण होते. हे विमान छोट्या आकाराचे असून या दुर्घटनेत 8 जण जखमी झाले आहेत.
जखमींना लेंगपुई रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिझोरमच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. म्यानमारच्या सैन्याचे कमीतकमी 276 सैनिक 17 जानेवारी रोजी बंडखोरांसोबत झालेल्या गोळीबारानंतर मिझोरममध्ये पळून आले होते.
मागील आठड्यात म्यानमारमधून आलेल्या 276 सैनिकांमुळे आतापर्यंत आश्रयासाठी दाखल झालेल्या म्यानमारच्या सैनिकांची संख्या आता 635 झाली आहे. सैनिकांच्या शिबिरावर वांशिक सशस्त्र संघटना आणि लोकशाही समर्थक दलांनी कब्जा केल्याने या सैनिकांना देश सोडावा लागला आहे. पळून आलेल्या सर्व सैनिकांपैकी 359 सैनिकांना यापूर्वीच त्यांच्या देशात परत पाठविण्यात आले आहे.
म्यानमारच्या सैन्याच्या एका विमानाने सोमवारी लेंगपुई विमानतळावरून दोन उ•ाणांद्वारे 184 सैनिकांना मायदेशी पोहोचविले आहे. तर उर्वरित 92 सैनिकांना मायदेशी नेण्यासाठी मंगळवारी सकाळी हे विमान मिझोरममध्ये दाखल झाले होते. सोमवारी देखील सैनिकांना ऐझोलनजीकच्या लेंगपुई विमानतळावरून शेजारील देशाच्या रखाइन प्रांतात सिटवेपर्यंत म्यानमारच्या वायुदलाच्या विमानांद्वारे पाठविण्यात आले होते.
म्यानमारचे सैनिक 17 जानेवारी रोजी शस्त्रास्त्रs तसेच दारूगोळ्यासमवेत दक्षिण मिझोरमच्या लॉन्गतलाई जिल्ह्यात भारत-म्यानमार-बांगलादेश सीमेवर बांडुकबंगा गावात शिरले होते. या सैनिकांच्या शिबिरावर ‘अराकान आर्मी’च्या सदस्यांनी कब्जा केला होता. यामुळे या सैनिकांना मिझोरममध्ये आश्रय घ्यावा लागला होता. म्यानमारच्या सैनिकांना नजीकच्या आसाम रायफल्सच्या शिबिरात नेण्यात आले अणि नंतर यातील बहुतेक जणांना लुंगलेई येथे हलविण्यात आले होते. तेव्हापासून हे सैनिक आसाम रायफल्सच्या देखरेखीत होते अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.
म्यानमारला लागून 510 किमीची सीमा
म्यानमारच्या सैन्याच्या 104 जवानांना नोव्हेंबर महिन्यात भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टर्सद्वारे मिझोरमच्या विविध ठिकाणांवरून मणिपूरचे सीमावर्ती शहर मोरेह येथे पाठविण्यात आले होते मग तेथून त्यांची मायदेशी रवानगी करण्यात आली होती. तर चालू महिन्याच्या प्रारंभी 255 सैनिकांना म्यानमारच्या सैन्यविमानांद्वारे लेंगपुई विमानतळावरून परत पाठविण्यात आले होते. मिझोरमची 510 किलोमीटर लांब सीमा म्यानमारला लागून आहे.