म्यानमार सर्वात मोठा अवैध अफू उत्पादक देश
भारताच्या सुरक्षेला गंभीर धोका : एनसीबीच्या अहवालात इशारा
भारताचा शेजारी देश म्यानमार आता अवैध अफूच्या उत्पादनप्रकरणी अफगाणिस्तानला मागे टाकत जगातील सर्वात मोठा उत्पादक ठरला आहे. 2021 साली सैन्य सत्तापालटानंतर आर्थिक संकट आणि गृहयुद्ध सदृश स्थितीमुळे म्यानमारमध्ये अफूचे उत्पादन मागील 10 वर्षांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले आहे. ही माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) जारी वार्षिक अहवालात देण्यात आली आहे.
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
एनसीबीच्या अहवालानुसार म्यानमारचा शान प्रांत अवैध अफूच्या शेतीचे सर्वात मोठे केंद्र ठरला आहे. म्यानमारमधून अफूच्या तस्करीचा नवा मार्ग थेट भारताच्या ईशान्येच्या राज्यांमधून येतो, ज्यामुळे भारताच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होत आहे. हा मार्ग दहशतवादाला वित्तपुरवठा आणि शस्त्रास्त्रांच्या तस्करीशीही निगडित असल्याचा इशारा एनसीबीने दिला आहे.
खुली सीमा ठरली समस्या
खुली सीमा आणि ‘फ्री मूव्हमेंट रिजीम’ (वाहतुकीची खुली व्यवस्था) तस्करीला सोपे करते, ज्यामुळे केवळ स्थानिक स्तरावर अमली पदार्थांचे सेवन वाढले नसून बंडखोर गटांना फंडिंगही मिळत असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.
जगभरात वाढतेय ड्रग्जचे सेवन
डार्कनेट मार्केट, सिंथेटिक ड्रग्ज आणि इंटरनॅशनल पोस्टल सिस्टीम परस्परांमध्ये जोडले गेल्याने जगभरातील कायदा-अंमलबजावणी यंत्रणांसमोर एक मोठे आव्हान उभे ठाकले आहे. 2023 मध्ये जगभरात जवळपास 31.6 कोटी लोकांनी (15-64 वर्षांचा वयोगट) कमीतकमी एकदा अमली पदार्थांचे सेवन केले होते. तर 2013 मध्ये हा आकडा 24.6 कोटी राहिला होता. म्हणजेच मागील एक दशकात जागतिक ड्रग्ज सेवनात जवळपास 29 टक्क्यांची वाढ झाल्याचे विविध देशांच्या ड्रग्जविरोधी यंत्रणांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
सिंथेटिक ड्रग्ज सर्वात मोठा धोका
अहवालात निटाजेन्स नावाच्या सिंथेटिक ओपिओइला नवा जागतिक धोका ठरविण्यात आले आहे. हे ड्रग हेरॉइनपेक्षा जवळपास 500 पट अधिक शक्तिशाली आहे. याचबरोबर एकाचवेळी अनेक प्रकारच्या अमली पदार्थांचे चलनही वेगाने वाढत आहे, यामुळे मृत्यू आणि गंभीर आरोग्य जोखिमीची भीती वाढली आहे. याकडे तत्काळ लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे एनसीबीने म्हटले आहे.
ड्रग्जमुळे वाढतेय हिंसा
ड्रग्ज तस्करी केवळ नशेपुरती मर्यादित नाही, तर यामुळे हिंसा आणि संघटित गुन्हेही वेगाने वाढत असल्याचा इशारा एनसीबीने दिला आहे. उदाहरणार्थ इक्वेडोरमध्ये कोकेन तस्करीवरून होणाऱ्या टोळीयुद्धामुळे 2020-23 दरम्यान हत्यांचे प्रमाण जवळपास 6 पटीने वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर
एनसीबीनुसार टेलिग्राम, व्हॉट्सअॅप आणि सिग्नल यासारख्या एन्क्रिप्टेड मेसेजिंग प्लॅटफॉर्म भारतासमवेत जगभरात ड्रग्जच्या पुरवठ्यासाठी महत्त्वाचे माध्यम ठरले आहे. यामुळे कायदा अंमलबजावणी यंत्रणांसमोर नवे तांत्रिक आव्हान उभे ठाकले आहे.
अफगाण-पाक-इराण कॉरिडॉर
एनसीबीनुसार अफगाणिस्तान-पाकिस्तान-इराण कॉरिडॉर अद्याप जगातील सर्वात मोठा अफू तस्करी मार्ग आहे, परंतु भारताला सर्व प्रमुख आंतरराष्ट्रीय तस्करी मार्गांद्वारे रणनीतिक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. अशास्थितीत विविध यंत्रणांदरम्यान उत्तम समन्वयाची आवश्यकता आहे. कोकेन तस्करीयुक्त देशांमध्ये तस्करीशी निगडित हिंसेत झालेली वाढ ड्रग मार्केटमध्ये प्रतिस्पर्धा कशाप्रकारे सुरक्षेचे एक मोठे संकट निर्माण करू शकते हे दाखवते. भारताच्या सागरी शेजाऱ्यांवर करडी नजर ठेवण्याची आवश्यकता असल्याचा इशारा अहवालात देण्यात आला आहे.