म्यानमार भूकंपबळींचा आकडा दोन हजारांवर
वृत्तसंस्था/ नायपिडॉ
म्यानमार व थायलंडमध्ये शुक्रवारी झालेल्या भूकंपाने मोठा विध्वंस केला आहे. या भूकंपाचे केंद्र म्यानमारमध्ये असल्याने या देशात मोठी जीवित व वित्तहानी झाली. सोमवारपर्यंत मृतांचा आकडा दोन हजारांच्या वर पोहोचला आहे. अजूनही बऱ्याच भागात बचाव यंत्रणा पोहोचल्या नसून हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. तांत्रिक उपकरणांच्या कमतरतेमुळे मदत व बचावकार्याला गती येताना दिसत नाही. भारतासह अन्य देशातून पोहोचलेल्या यंत्रणांच्या माध्यमातून बचावकार्याला हातभार लावला जात असला तरी त्यांचे प्रयत्न तोकडे ठरत आहेत.
म्यानमारमधील भूकंपात शेकडो इमारती कोसळल्या आहेत. तसेच हजारो घरे ढासळली आहेत. या भूकंपानंतर बाधित परिसरात बचाव मोहिमा सुरू करण्यात आल्या आहेत. बचाव पथकातील हजारो कर्मचारी व लष्कराचे जवान गेल्या तीन दिवसांपासून ढिगाऱ्याखाली अडकेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत शेकडो मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढले आहेत. तसेच अनेक मृतदेह अजूनही मोठमोठ्या इमारतींच्या ढिगाऱ्यांखाली अडकलेले असून त्यांचा शोध जारी आहे.