भेटीलागी जीवा...
उपमा सोप्या असल्या म्हणजे अर्थ सोपा होत नसतो. किंबहुना तो अर्थ समजावा म्हणूनच सोप्या सोप्या उपमा दिल्या जातात. परंतु त्यातली जी तळमळ आहे, तडफड आहे, भेटण्यासाठीचा एक मूक आक्रोश जो आहे, तो संगीत न कळणाऱ्याला सुद्धा तितकाच अंगावर येतो. आणि तो झेपणं त्याच्यासाठी खूप जड होऊन जातं. गाण्यांचा परिणाम असा असतो की अशी काही गाणी ऐकल्यानंतर एखाद्याच्या वाटेकडे डोळे लावून बसणे, एखाद्याच्या येण्यासाठी आशा लावून बसणे, एखाद्याच्या भेटीसाठी तळमळणी भरणे, याचे अर्थ नव्याने कळायला लागतात.
भे टीलागी जीवा लागलीसे आस
पाहे रात्रंदिवस वाट तुझी
पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन
तैसे माझे मन वाट पाहे.
उपमासौंदर्याने नटलेला तुकाराम महाराजांनी रचलेला अभंग. स्वर लता मंगेशकर नावाच्या चमत्काराचे. संगीत खळेकाका या नावाने प्रसिद्ध असलेल्या एका व्युत्पन्न म्हणावं अशा संगीतकाराचं. ज्यांच्या चाली लोण्याचा गोळ्यासारखे असतात म्हणतात. ऐकायला सोप्या पचायला जड. खरंतर हा अभंग ऐकण्यासाठी सुद्धा तुमच्या कानांची तेवढी तयारी झालेली असावी लागते. हा ऐकायला सुद्धा जडच आहे. पण तोही दोन कारणांसाठी. संगीताचा अभ्यासक असलेल्या कुणालाही ह्या अभंगाची बांधणी किती क्लिष्ट आहे आणि त्यामधून वाटा काढण्यासाठी आपल्या गळ्याची किती तयारी पाहिजे व अभ्यास किती पाहिजे या सगळ्या दृष्टीने विचार करावा लागतो. म्हणून नैसर्गिकदृष्ट्या त्याला तो जड वाटतोच. दुसरं कारण असं की अभंग अर्थाच्या दृष्टीनेही जडच वाटतो. उपमा सोप्या असल्या म्हणजे अर्थ सोपा होत नसतो. किंबहुना तो अर्थ समजावा म्हणूनच सोप्या सोप्या उपमा दिल्या जातात. परंतु त्यातली जी तळमळ आहे, तडफड आहे, भेटण्यासाठीचा एक मूक आक्रोश जो आहे, तो संगीत न कळणाऱ्याला सुद्धा तितकाच अंगावर येतो. आणि तो झेपणं त्याच्यासाठी खूप जड होऊन जातं. गाण्यांचा परिणाम असा असतो की अशी काही गाणी ऐकल्यानंतर एखाद्याच्या वाटेकडे डोळे लावून बसणे, एखाद्याच्या येण्यासाठी आशा लावून बसणे, एखाद्याच्या भेटीसाठी तळमळणी भरणे, याचे अर्थ नव्याने कळायला लागतात. अभंगातून संतांनी ते जेवढं दाखवलंय तेवढं सौंदर्य क्वचितच कोणाला नंतर जमलं असेल. उदाहरणार्थ,
चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी
कान्हो वनमाळी वेगी भेटवा का
मधलीच तडफड घ्या ना!
मुळात आपण कोणाची वाट बघत बसतो तर ज्या वेळेला, ज्या गोष्टीच्या घडण्यावर आपलं आयुष्य आपला आनंद अवलंबून असतो, ती व्यक्ती किंवा ती गोष्ट भेटल्याशिवाय, मिळाल्याशिवाय आपलं काहीच होऊ शकत नाही. ज्या व्यक्तीशिवाय जगणं कठीण झालेलं असतं त्याच गोष्टीची किंवा त्याच व्यक्तीची आपण एवढी वाट बघतो. ज्या व्यक्तीविषयी आपल्याला काही आपुलकी नाही, प्रेम नाही, जी व्यक्ती आपल्या दृष्टीने त्रयस्थ आहे किंवा तिच्या येण्यामुळे आपल्या आयुष्यात काही फरक पडत नाहीये अशा व्यक्तीची आपण वाट एवढ्या आतुरतेने कशाला पाहू? सरळंच आहे की ज्या गोष्टीशिवाय एक एक श्वास घेणं जड व्हावं तिचीच वाट आपल्याला पहावी लागते. आणि खरोखरच ज्या व्यक्तीशिवाय जगणं म्हणजे शाप वाटायला लागतो ती व्यक्ती यावी, त्या व्यक्तीला आपल्याला भेटता यावं याच्यासाठी जिवाची तगमग, तडफड होणे हे अगदीच नैसर्गिक आहे. आयुष्य गमतीशीर असतं. की काही व्यक्ती आपल्याला भेटतात, ओळख होते. त्या क्षणी आपल्याला कळतही नसतं. मग आपल्या लक्षात येतं की जगात कुठेतरी ही व्यक्ती मला भेटली आणि नंतर हीच माझं जग होऊन गेली. हिचा विरह मला घडला तर पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी माझ्या आयुष्याची तडफड तडफड होऊन जाईल. ज्या वेळेला अशा व्यक्तीचा विरह घडतो त्या वेळेला ‘भेटीलागी जीवा लागलीसे आस’ असं होऊन जातं. एकदम जुन्या काळातला ‘सुवासिनी’ नावाचा एक सिनेमा आहे. सीमा देव यांच्या सहजसुंदर अभिनयाने गाजलेला! त्या चित्रपटामधील सर्वच्या सर्व गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. याच्यामध्ये काय दाखवलंय, तर आपल्या बेपत्ता झालेल्या पतीसाठी शेवटपर्यंत तडफडणारी एक पत्नी. तिची श्रद्धा, निष्ठा आणि तळमळ तिच्या पतीला तिच्यापर्यंत घेऊन येते तोपर्यंतचा तिचा सर्व प्रवास. तोपर्यंतची तिची तळमळ आणि श्रद्धा याचे जिवंत चित्र म्हणजेच एखाद्यासाठी असोशी एवढी असते आणि ती कशी वाढत जाते हे त्यातल्या गाण्यांचा जो लावलेला क्रम आहे त्याच्यावरून सहज लक्षात येतं. तिच्या पतीची आणि तिची भेट होण्याच्या अगदी थोडा वेळ आधी त्याच्यामध्ये
आज मोरे मन लागो लगनवा
ही गुजरी तोडी मधली चीज घेतलेली आहे. पृथ्वीवर प्रकाश पसरण्याच्या सुरवातीच्या वेळेचा हा राग त्याच्या गंभीर प्रकृतीमुळे हे सहज अधोरेखित करतो की कोणाची तरी वाट बघणाऱ्या व्यक्तीचे मन त्या प्रतीक्षेशी इतके एकरूप झालेलं आहे की स्वत:चं वेगळं अस्तित्व असतं हेच ती व्यक्ती विसरलेली आहे. खरोखरच त्या सुवासिनीची अवस्था त्यावेळी अशी असते की आपल्या पतीच्या आठवणी, तो येईल याची लागलेली आस आणि विरहाची वेदना, त्यातच निष्ठा या सर्व गोष्टींशी ती एकरूप झालेली असते. त्या क्षणी आपल्याला ते स्वर ऐकू येतात तिच्या चेहऱ्याचे भाव आपण पाहतो परंतु तिचं वेगळे अस्तित्वच राहिलेलं नाही हे त्यातून सहज लक्षात येतं. ही कमाल नुसती संगीताची नाही तर त्यामध्ये अभिनय करणाऱ्या दोन्हीही व्यक्ती खरोखरीच ग्रेट आहेत. इथे विरहाचं रूपांतर संपूर्ण शरणागती आणि समर्पणात झालेलं असतं. त्यामुळे आपल्या आजूबाजूला काय घडत आहे, आपण जी इच्छा धरली आहे ती पूर्ण होणार आहे की नाही, आपल्याला विरोध घडेल की काय अशासारखे कुठलेही भाव तेवढे तिच्या चेहऱ्यावर ते दिसत नाहीत. तिच्या चेहऱ्यावर फक्त एवढं दिसतं की आता मला आस लागलेली आहे. मला ध्यास लागलेला आहे मी आणि तो वेगळे राहिलेलोच नाही आहोत.
प्रेमात पडलेल्या प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी आस, ध्यास याला सामोरं जायला लागलेलं असतंच. जोपर्यंत हा विरह सहन होण्यासारखा आहे तोपर्यंत सगळं ठीकच असतं. परंतु एकवेळ अशी येते की सगळं काही सहन करण्याच्या मर्यादेच्या बाहेर निघून जातं. आणि मग
सुन री सखि मेरी प्यारी सखी
ये दिल कहीं खोया है मेरा
अशी अवस्था व्हायला वेळ लागत नाही. लहान मुलांना जशी आई हवी झाल्यावर अन्य काहीही दिलं, खाऊ दिला, खेळणी दिली तरीही त्याचं समाधान होत नाही. ते मूल सगळ्या गोष्टी फेकून देतं. हातपाय आपटून आकांत करतं. जोपर्यंत त्याला आई दिसत नाही तोपर्यंत ते गप्प बसत नाही. हा जो आकांत असतो ना, तोच प्रेमात पडून आस लागलेल्या व्यक्तीचा होतो. जळी स्थळी ती एकच व्यक्ती दिसायला लागते. आणि
वेध तुझा लागे सतत मनी
वसतिच केलि नावे वदनी
जगत सकल सखि भासत त्वन्मय
मधुर रूप तव खेळे नयनी
खरं तर इथेपर्यंतही सगळं ठीकच म्हणावं लागेल.
दर्पणी पहाता रूप न दिसे वो आपुले
बापरखुमादेवीवरे मे ऐसे केले
परंतु त्याहीपुढे जाऊन अशी वेळ येते की स्वत:चं अस्तित्व सुद्धा नको असं वाटू लागतं. जगणं धुपासारखं होऊन उडून जावं असं वाटतं. म्हणून मग शब्द जन्माला येतात.
तुका म्हणे मज लागलीसे भूक
धावुनी श्रीमुख दावी देवा
भेटीलागी जीवा लागलीसे आस
पाहे रात्रंदिवस वाट तुझी...
अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु