माझा मुलगा दहशतवादी नव्हता!
जॉर्डनमध्ये मारले गेलेल्या व्यक्तीच्या पित्याची चौकशीची मागणी
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
इस्रायलमध्ये प्रवेश करताना कथित स्वरुपात जॉर्डनच्या सशस्त्र दलांकडून झालेल्या गोळीबारात केरळचा रहिवासी थॉमस गेब्रियल परेरा याचा मृत्यू झाला होता. थॉमस याच्या पार्थिवावर तिरुअनंतपुरमच्या थुंबामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. परेराचे पार्थिव मंगळवारी सकाळी तिरुअनंतपुरम येथे पोहोचले होते.
याचदरम्यान मृत थॉमसच्या पित्याने न्यायाची मागणी करत माझा मुलगा दहशतवादी नव्हता, तर भारतीय नागरिक होता असे म्हटले आहे. भारतातून रवाना होताना थॉमस स्वत:सोबत व्हिसा तसेच आवश्यक दस्तऐवज घेऊन गेला होता. तो एकटा नव्हता, त्याचा नातेवाईक त्याच्यासोबत होता, असे थॉमसच्या पित्याने नमूद केले.
थॉमसकडे वैध व्हिसा अन् परतीचे तिकीट होते. याप्रकरणी सरकारने विस्तृत चौकशी करावी अशी मागणी थॉमसच्या परिवाराने केली आहे. थॉमसचे पिता गेब्रियल परेरा यांनी केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही.डी. सतीशन यांना एक निवेदन सोपविले, यात सखोल चौकशीसाठी त्यांच्या हस्तक्षेपाची विनंती करण्यात आली आहे.
सतीशन यांनी थुंबाच्या चर्चमध्ये थॉमस यांच्या परिवाराच्या सदस्यांची भेट घेतली. याप्रकरणी अधिक माहितीची आवश्यकता आहे कारण थॉमसचा पासपोर्ट आणि अन्य प्रवास दस्तऐवज अद्याप परिवाराला सोपविण्यात आलेले नाहीत असे सतीशन यांनी सांगितले आहे.
थॉमसचे पार्थिव केरळमध्ये परत आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केंद्र सरकारने केले आहेत. तर थॉमसच्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी विदेशमंत्री एस. जयशंकर यांच्याशी वैयक्तिक स्वरुपात चर्चा केल्याचे भाजप नेते व्ही. मुरलीधरन यांनी म्हटले आहे.