For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माझी सानिका आत्महत्या करूच शकत नाही ! आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, नातीच्या मृत्यूने आजोबांनी सोडले प्राण

02:57 PM Sep 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
माझी सानिका आत्महत्या करूच शकत नाही   आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश  नातीच्या मृत्यूने आजोबांनी सोडले प्राण
Advertisement

सिंधुदुर्ग: लेकीच्या मृत्यूचे दुःख कोणत्याही आई-वडिलांसाठी शब्दांत व्यक्त न होणारे असते. मात्र, आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून तिच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा स्पष्ट आरोप करीत आत्महत्या करून आपले जीवन संपवणाऱ्या सानिका सिद्धेश प्रभू हिच्या आईने थेट मालवण पोलिसांचे दरवाजे ठोठावले आहेत. 'माझ्या मुलीच्या संशयास्पद मृत्यू मागचे सत्य समोर आणा आणि तिला न्याय द्या,' अशी आर्त विनवणी संजना सचिन गावडे यांनी मालवण पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केली आहे.

Advertisement

सानिकाच्या मृत्यूने तिच्या माहेरच्या कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सानिकाचे वडील सामान्य रिक्षा चालक असून कष्ट करून संसाराचा गाडा हाकणाऱ्या या कुटुंबाच्या आयुष्याला मुलीच्या मृत्यूने मोठा धक्का बसला आहे. ज्या लेकीच्या भवितव्यासाठी आई-वडिलांनी अनेक स्वप्ने पाहिली,
तिचाच विवाह पश्चात अवघ्या दीड वर्षातच अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंब मानसिक आघातातून जात आहे.

माझी मुलगी हे टोकाचे पाऊल उचलणार नाही'

Advertisement

सानिकाचा विवाह १७ फेब्रुवारी २०२५ रोजी वायंगवडे येथील सिद्धेश प्रभू याच्याशी झाला होता. विवाहानंतर काही काळातच तिच्या वैवाहिक आयुष्यात मतभेद निर्माण झाल्याचे तिच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सानिकासोबत किरकोळ कारणांवरून भांडणे, मानसिक त्रास आणि मारहाणीचे प्रकार होत असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. सानिका माहेरी आल्यानंतर तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा व व्रण दिसून आल्याचेही आईने तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे मुलीच्या परिस्थितीबाबत आईच्या मनात आधीपासूनच चिंता होती. 'सानिकाच्या मनात दुःख, राग आणि कटुता असली, तरी ती आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणार नाही,' असा ठाम विश्वास तिने आपल्या तक्रारीतून व्यक्त केला आहे.

मृत्यूच्या घटनेने कुटुंब उद्ध्वस्त
सानिकाच्या मृत्यूची बातमी तिच्या माहेरच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांच्यावर झालेला मानसिक आघात प्रचंड होता, असे कुटुंबीयांकडून सांगण्यात येते. या धक्क्यातून सानिकाच्या आईच्या वडिलांनाही मोठा मानसिक धक्का बसला आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. सानिकाची आई आणि तिची छोटी बहीण यांनाही या तीव्र मानसिक धक्क्यामुळे इस्पितळात दाखल करण्याची वेळ आल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

एका लेकीच्या मृत्यूने आधीच घरातील आनंद हिरावला, त्यातच त्या घटनेच्या धक्क्याने कुटुंबातील आणखी एका ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू आणि आई-बहिणीवर उपचाराची वेळ या सगळ्यामुळे हे कुटुंब सध्या अक्षरशः दुःखाच्या खाईत लोटले गेले आहे.

आईची न्यायासाठी धाव
या सर्व घटनांनंतर सानिकाच्या आईने मालवण पोलिसांकडे धाव घेतली आहे. सानिकाचा मृत्यू आत्महत्या नसून घातपाताचा प्रकार असल्याचा स्पष्ट आरोप तिने आपल्या तक्रारीत केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. आपली लेक परत येणार नाही, हे कटू वास्तव या आईला स्वीकारावेच लागणार आहे. मात्र, तिच्या मृत्यूमागचे सत्य तरी समोर यावे, एवढीच तिची अपेक्षा आहे. मुलीच्या आठवणींच्या सावलीत, डोळ्यात अश्रू आणि मनात असंख्य प्रश्न घेऊन ही आई आता न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.

सानिकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? तो आत्महत्येचा प्रकार होता की घातपात? तक्रारीतील आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपासातूनच स्पष्ट होणे अपेक्षित आहे. तक्रारीतील आरोपांची स्वतंत्र पडताळणी होणे बाकी असून तपासातून समोर येणाऱ्या वस्तुस्थितीकडे सानिकाच्या कुटुंबासह सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

.