For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पांडुरंगाच्या दर्शनाने मन अभंग अभंग!

02:56 PM Nov 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
पांडुरंगाच्या दर्शनाने मन अभंग अभंग
Advertisement

विठुरायाच्या गजराने दुमदुमली मठग्राम नगरी : रांगोळ्या, मैफिली, दिंड्यांतून हरिनामाचा गजर ,हरिमंदिराचा 116 वा दिंडी महोत्सव भक्तीभावाने गोव्यासह कर्नाटकातूनही भाविकांची अलोट गर्दी

Advertisement

मडगाव : ‘या विठुचा गजर हरि नामाचा झेंडा रोवीला... ‘ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, पांडुरंग’... ‘चंद्रभागेच्यातीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी... दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरि, तो पहा विटेवरी’... या सारख्या भक्ती रचनांनी काल सोमवारी मठग्राम नगरी दुमदुमली. आज मंगळवारी या दिंडी महोत्सवाची सांगता नंदिनी गायकवाड व अंजली गायकवाड या भगिनीच्या संगीत मैफलीने होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सपत्निक दिंडी महोत्सवाला उपस्थिती लावून श्रींचे दर्शन घेतले. मडगावच्या श्री हरिमंदिर देवस्थानचा 116 वा दिंडी महोत्सव काल सोमवारी भक्ती भावाने साजरा करण्यात आला.

रुप पाहता लोचनी...

Advertisement

दिंडी महोत्सवानिमित्त आयोजित गायनाची पहिली बैठक श्री हरिमंदिर देवस्थानच्या प्रांगणात झाली. बैठकीच्या सुरवातीला सौ. स्वरांगी मराठे हिने ‘रूप पाहता लोचना’ या अंभगाने केली. त्यानंतर तिने ‘सदा माझे डोळा, जडो तुझी मूर्ती’ ही भक्ती रचना व त्यानंतर ‘मी पुन्हा वनातरी’ व ‘सोहम डमरू वाजे’ ही दोन नाट्यागीते सादर केली.

मुरलीधर श्याम हे नंदलाला 

त्यानंतर राजयोग धुरी यांनी ‘मुरलीधर श्याम हे नंदलाला’..., ‘सावळे सुंदर रूप मनोहर’, ‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी’ व ‘माझे माहेर पंढरी’ हा अभंग सादर केला. श्रोत्यांनी दोन्ही कलाकारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

दिंडी स्पर्धेने भक्तीमय वातावरण

श्री दामबाबाले घोडे सांस्कृतिक मंडळाने आयोजित केलेल्या देंडी स्पर्धेने दिंडी महोत्सवात भक्तीमय वातावरणाची निर्मिती केली. या दिंडी स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला होता. या स्पर्धेचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी केले. यावेळी श्री दामबाबाले घोडे सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष तथा प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर व उपनगराध्यक्ष बबिता नाईक इत्यादी मान्यवर उपस्थित होती.

राज्य महोत्सवाचा दर्जा

पुढच्या वर्षी दिंडी महोत्सव भव्य स्वरूपात साजरा केला जाईल. फातोर्डा व मडगावात दिंडी महोत्सवात कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती मंत्री दिगंबर कामत यांनी दिली. राज्य महोत्सवाचा दर्जा मिळल्याने मंत्री कामत व दामू नाईक यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आभार मानले. आपण मुख्यमंत्री असताना सांखळी येथील त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला होता, असे कामत यावेळी म्हणाले. दिंडी महोत्सवानिमित्त श्री हरि मंदिरात सकाळी धार्मिक विधी व दुपारी महाप्रसाद झाला. त्यानंतर संध्याकाळी वारकरी मंडळीचा भजनाचा कार्यक्रम झाला. भजनाचा कार्यक्रम संपल्यानंतर श्री विठ्ठल-रखुमाईची उत्सव मूर्ती पालखीत विराजमान झाली. यावेळी श्रींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होती.

मुख्यमंत्र्यांनी घेतले श्रींचे दर्शन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सौ. सुलक्षणा सावंत यांनी श्री हरिमंदिर व कोंब येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या सोबत मंत्री दिगंबर कामत, प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक, पक्षाचे सरचिटणीस अॅड. नरेंद्र सावईकर व सर्वानंद भगत तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

दिंडी भव्य स्वरूपात होणार

मडगावच्या दिंडी महोत्सवाला 116 वर्षाचा फार मोठा इतिहास आहे. पोर्तुगीज काळात सुरू झालेला उत्सव आजही मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातोय, पोर्तुगीज काळात वारकरी मंडळीने हा उत्सव सुरू केला, आपण त्यांचे कौतुक करतो व आभार मानतो असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या उत्सवाला आता राज्य दर्जा मिळाला असून हा उत्सव भव्य स्वरूपात साजरा केला जाईल. राज्य दर्जा मिळाल्यानंतर यंदा पहिलेच वर्ष असल्याने थोडा प्रशासकीय उशीर झाला. मात्र, पुढच्या वर्षी या उत्सवाचे व्यवस्थित नियोजन करून तो भव्य स्वरूपात साजरा केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

दिंडी स्पर्धेला उदंड प्रतिसाद

या दिंडी स्पर्धेने खऱ्या अर्थाने मठग्राम नगरीत भक्तीमय वातावरण निर्माण झाले. यंदा या दिंडी स्पर्धेत गोव्याच्या विविध भागातून आलेली अनेक पथके सहभागी झाली होती. तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या पथकांचा समावेश होता. दिंडी स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. पारंपरिक वेशभूषा, टाळ, मृदंग तसेच पखवाज यांच्या तालावर दिंडी पथकातील कलाकारांनी दिंडीचा सुंदर आविष्कार सादर केला. श्री दामबाबाले घोडेतर्फे आकाशकंदिल स्पर्धाही आयोजित केली होती. तिलाही उदंड असा प्रतिसाद लाभला. नाविन्यपूर्ण असे आकाशकंदिल स्पर्धेचे आकर्षण ठरले. सॉलीड पार्टीने आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेत गोव्यातील कलाकारांनी रांगोळीचा सुंदर आविष्कार घडविला. दरवर्षी ही रांगोळी स्पर्धा सर्वाचे आकर्षण ठरते. यंदाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद रांगोळी स्पर्धेला लाभला. नेत्रसुखद रांगोळ्यांनी दिंडी महोत्सवात रंग भरला. कोंब मडगाव येथे युवा संजीवनीतर्फे ‘स्वर दिंडी’ हा हिंदी, मराठी गीतांचा कार्यक्रम झाला, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Advertisement
Tags :

.