For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माझं घर...

06:46 AM Sep 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
माझं घर
Advertisement

परवाच वि. स. खांडेकर यांची जयंती साजरी झाली. त्यानिमित्त त्यांनी दिलेल्या काही पुस्तकांची नावे आली होती. त्यातल्या एका नावाने माझे लक्ष वेधून घेतलं, घर कुणाचं? असं त्यांच्या पुस्तकाचं नाव होतं. पुस्तक वाचलं आणि स्वत:च्या घराकडे एका वेगळ्याच दृष्टीने बघायला लागले. रामदासांच्या ओळी देखील त्यावेळेला आठवल्या ‘पाल म्हणते हे माझे घर,... मुंगी म्हणते हे माझे घर...’ हे वाचलं आणि माझं मलाच हसू आलं. आपण घर घेताना, सातबारा नावावर करून घेत असतो. रजिस्टर करतो, स्वत:च्या नावाची पाटी तयार करतो अगदी कड्या, कोयंडे, कुलपं लावतो,

Advertisement

कॅमेरेसुद्धा बसवतो. स्वत:चा हक्क दाखवण्यासाठी काय काय करत असतो देव जाणे.... शाळेत असताना आम्हाला माझा घर निबंध लिहायला सांगताच, आम्ही भराभर आमच्या सगळ्या घराचं वर्णनच त्याच्यामध्ये लिहून काढतो आणि शेवटची ओळ लिहीतो ....माझं घर मला खूप आवडतं ... ते लिहिलं की अगदी आपल्या निबंधाला पहिल्या क्रमांकाचे मार्क मिळणार असंच आपल्या मनात येतं. पण बहुतेक सगळ्यांनी हे असंच लिहिलेलं असतं.... पण एका मुलीने मात्र एक वेगळाच निबंध लिहिला. ‘माझं घर’ असं तिला लिहायला सांगितल्यानंतर तिने आपलं छोट्याशा घराचं वर्णन फार नेटक्या पद्धतीने केलं. खरं म्हणजे ती मुलगी एका छोट्याशा खोलीमध्येच राहत होती. हात लांब केला की कुठलीही वस्तू सहज घेता येईल, एवढंच त्या खोलीचं अंतर. पण त्या खोलीचं वर्णन तिने पुढीलप्रमाणे केलं. माझं घर म्हणजे एका खोलीचं अॅक्वेरियमच. आमच्या घरात दोन देवमासे राहतात म्हणजे आजी आजोबा.... दोन गरागरा फिरणारे मासे म्हणजे माझे आई-बाबा.... आणि दोन छोटे फायटर मासे म्हणजे मी आणि माझा दादा, अशा आमच्या घरात आमची दोस्त मंडळी पण असतात. म्हणजे आमचे शेजारी म्हटलं तरी चालेल. पण जाऊन येऊन असतात. उंदरांची सतत रिले रेस ची

प्रॅक्टिस सुरू असते. तर झुरळांची वेगळीच गडबड. रात्री मात्र पाल येऊन चकचक आवाज करत शिकारीला निघून जाते. तर डास मात्र रात्रभर पहारा दिल्यासारखे गुणगुणत प्रत्येकाला सांगत असतात... ‘जागते रहो.... जागते रहो’, खिडकीतला पोपट मात्र दिवसभर डोकं उठवून रात्री अगदी शहाण्यासारखा झोपतो.  मोत्याला मात्र कसलाही आवाज आला तरी जागेवर बसूनच कान टवकारून बघत बसतो आणि घशातून कसले कसले आवाज काढत असतो. खारुताई किंवा कबूतर किंवा चिमणी दिसल्यावर मात्र आमचा मोत्या त्याच्यातला शिकारी कुत्रा जागा होतो आणि भुंकायला लागतो आणि असा काही झेपावतो की बघतच रहावं. आमच्या घरात छोटे-छोटे कोळीसुद्धा राहतात बरं का! त्यांचे विणकाम अगदी शांतपणे आवाज न करता सुरू असते. कोणीही कुंचा घेऊन जळमटं साफ केली तरी ह्यांचं आपलं पुन्हा काम नेटाने सुरूच असतं. कावळा, चिमणी म्हणजे रोजचे स्नेही घराला भेट देऊन चहा पाणी, दिल्याशिवाय किंवा दाणे दिल्याशिवाय ते पुढे जायचेच नाहीत. घर बांधल्यापासून या सगळ्यांचंच हे हक्काचे निवासस्थान. घर बांधायला सुरुवात झाल्यानंतरच कबुतराने आपलं घरटं कुठे बांधायचं हे ठरवलेलं असतं. चिमणीने सुद्धा घराच्या आतमध्ये आपल्या पिलांना सुरक्षित जागा कोणती हे सुद्धा ठरवून ठेवलेलं असतं. कावळा मात्र पोस्टमनचं काम करतो. येता जाता निरोप देतो पण येतो मात्र नक्की. त्याच्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की जे घर मी माझं माझं म्हणत होतो ते घर माझं नाहीच. ते माझं तात्पुरते निवासस्थान आहे. हे माझ्या आता शेवटी शेवटी लक्षात यायला लागलं आणि घर कोणाचं हा प्रश्न तसाच लोंबकळत राहिला...

Advertisement

Advertisement
Tags :

.