For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Eknath Shinde : माझा मोठा भाऊ हरपला,अपघाताची चौकशी व्हायला पाहिजे ; एकनाथ शिंदेंना अश्रू अनावर !

05:12 PM Jan 28, 2026 IST | NEETA POTDAR
eknath shinde   माझा मोठा भाऊ हरपला अपघाताची चौकशी व्हायला पाहिजे   एकनाथ शिंदेंना अश्रू अनावर
Advertisement

                                  उपमुख्यमंत्री  अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू

Advertisement

मुंबई : महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये अजित पवार यांच्या चार सभा होत्या. या सभांसाठी ते सकाळीच नेहमीप्रमाणे लवकर बाहेर पडले होते. मुंबईहून बारामतीसाठी आज सकाळी विमान निघालं होतं. यादरम्यान लँडिंगदरम्यान बारामतीमध्ये विमानाचा अपघात झाला. यावेळी अजित पवारांसह अन्य पाचजण देखील विमानात होते. परंतु विमानाचा अपघात इतका भीषण होता की, अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. अजितदादांच्या जाण्याने राज्यातील अनेक नेत्यांच्या डोळ्यात अश्रू आलेत. संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय. दरम्यान, अजितदादांबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या असून त्यांची विमान अपघाताच्या चौकशीची मागणी केली आहे.

Advertisement

काय म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे म्हणाले, मनाला वेदना देणारी आणि मनाला चटका लावणारी अतिशय दुर्देवी घटना आज महाराष्ट्रात घडली. कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल की अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून निघून जातील. महाराष्ट्रासाठी अतिशय दु:खद घटना आहे. खरं म्हणजे अजितदादा गेले अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व करत होते. अतिशय परखड आणि स्पष्टवक्तेपणा असलेले ते होते. बारीक अभ्यास करुन ते बोलायचे. रोखठोक बोलणारे असले तरी मनाने ते निर्मळ होते. याचा अनुभव मी स्वत: घेतलेला आहे.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. अजितदादांनी सकाळी सहा वाजताच्या अपॉईंटमेंट दिलेल्या अधिकारी आणि लोकप्रतीनिधींनी पाहिलेल्या आहेत. वेळेचं भान ठेवणारा नेता हरपलाय. काल पर्वाच आमची कार्यक्रमात भेट झाली होती. सरन्यायाधीश मुंबईत आले होते. ते येण्यापूर्वी आम्ही एका चेंबरमध्ये बसलो होतो. आमच्यापेक्षा अनुभवी नेते होते, वयाने देखील मोठे होते. त्यांना राज्यातील अनेक विषयांचा गाढा अभ्यास होते. त्याचा राज्याला फायदा होत होता. त्यांच्या जाण्याने पवार कुटुंबियांचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं नुकसान झालंय. मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धाजंली अर्पण करताना मनात दु:खाच्या भावना आहेत. शेवटी आमच्या सहकाऱ्याचा जीव गेलाय. 6 लोकं मृत्यूमुखी पडलेले आहेत. त्यामुळे या विमान अपघाताची चौकशी नक्कीच व्हायला पाहिजे. आणि चौकशी नक्कीच होईल.. या पुढे देखील अशा प्रकारचे अपघात होता कामा नये. यासाठी ते गरजेचं आहे. त्यासाठी त्याची चौकशी देखील होईल

जी पोकळी तयार होते ती भरून काढणं अतिशय कठिण

“राज्यात आज शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. त्यासोबत तीन दिवसाचा दिखवटा जाहीर करण्यात आला आहे. कधीही भरून न निघणारं असं नुकसान आहे. महाराष्ट्रातून असे लोकनेते गेल्यावर जी पोकळी तयार होते ती भरून काढणं अतिशय कठिण आहे. अजितदादा गेले यावर विश्वास ठेवायलाच मन तयार होत नाही” असं मुख्यमंत्री म्हणाले. अजित पवार हे जनतेच्या प्रश्नांसाठी सतत कार्यरत असायचे. लोकांमध्ये त्यांचा वावर असायचा.

अपघात कसा झाला?

विमानाच्या लँडिंग वेळी हा अपघात झालेला आहे. या अपघाताचे धक्कादायक व्हिडिओही आता समोर येत आहेत. विमान उतरत असताना एका शेतात ते कोसळल्याचे दिसत आहे.विमान कोसळल्यानंतर विमान जळाल्याचे दिसत आहे. यामुळे परिसरात काही काळ धुराचे लोट दिसत होते. सदर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले होते. मात्र अपघात इतका भीषण होता की, त्यात सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

Advertisement
Tags :

.