माझे लक्ष केवळ पक्षसंघटनेकडेच!
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार : मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. नवी दिल्ली दौऱ्यावर असताना सिद्धरामय्या यांनी पूर्ण कालावधीसाठी मीच मुख्यमंत्री आहे. मला अधिक आमदारांचा पाठिंबा आहे. शिवकुमार यांना कमी आमदारांचा सपोर्ट आहे, असल्याचे सांगितले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त होत असून दिल्लीहून परतल्यानंतर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पक्षाने मला संघटना आणि उपमुख्यमंत्रिपद दिले आहे. माझे लक्ष केवळ पक्ष आणि सरकारच्या हित राखण्याकडे आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. परंतु, अधिकार हस्तांतराच्या मुद्द्यावर ते आता कोणती भूमिका घेतात याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.
तीन दिवसांच्या नवी दिल्ली दौऱ्यात उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केवळ राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवालांची भेट घेऊन चर्चा केली. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे किंवा वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्याकडून त्यांना अधिकार हस्तांतराच्या मुद्द्यावर चर्चेसाठी बोलावण्यात आले नाही. त्यामुळे ते रिकाम्या हाती परतल्याचे बोलले जात आहे.
शुक्रवारी बेंगळूरला परतल्यानंतर केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि प्रदेश काँग्रेस कार्यालयात पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. नेतृत्त्व बदलाविषयी हायकमांडने सांगण्याआधीच सिद्धरामय्या यांनी प्रतिक्रिया देणे कितपत योग्य, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, तुम्ही कसेही प्रश्न विचारले तरी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. तुमच्या प्रश्नांमध्येच उत्तर आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी यापुढेही सांभाळेन, असे ते म्हणाले.
राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला वगळता आम्ही इतर कोणत्याही वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली नाही. पक्षातील कार्यकत्यांना काही पदे देण्याबाबत चर्चा झाली आहे. कार्यकर्त्यांना अधिकारपदे वाटप करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षसंघटनेसाठी परिश्रम घेतलेल्यांच्या नावांचा प्रस्ताव पुन्हा एकदा दिल्लीला पाठवून वरिष्ठांची संमती मिळविण्यात येईल, असेही त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.
सप्टेंबरनंतर कोणतीही क्रांती नाही : लक्ष्मी हेब्बाळकर
सप्टेंबरनंतर राज्य राजकारणात कोणतीही क्रांती होणार नाही. सर्वकाही शांत राहील, अशी मार्मिक प्रतिक्रिया महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे. शुक्रवारी आषाढ मासानिमित्त म्हैसूरमध्ये चामुंडेश्वरी देवीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, स्वत: मुख्यमंत्र्यांनीच आपण पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांचा प्रश्नच येत नाही. याविषयी वारंवार बोलणे योग्य ठरणार नाही. मुख्यमंत्री बदलाच्या मुद्द्यावर सिद्धरामय्या व डी. के. शिवकुमार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. याविषयी बोलण्याइतके आम्ही मोठे नाही. आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. काही झाले तरी हायकमांडच निर्णय घेईल.
आम्ही प्रतिक्रिया देण्याची गरज नाही : शिवानंद पाटील
कोणत्याही कारणास्तव मुख्यमंत्री बदल होणार नसल्याचे सिद्धरामय्या यांनी सांगितल्यानंतर त्यावर आम्ही प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री बदलाचा मुद्दा सध्या वरिष्ठांकडे चर्चेत नाही. मुख्यमंत्री बदल होईल, असे भाकित करता येणार नाही. राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी आमदारांची मते जाणून घेतली आहेत. अनेक आमदारांनी त्यांना निवेदने दिली आहेत. काही मंत्र्यांविषयी आमदारांनी थेट तक्रारी दिल्या आहेत, अशी प्रतिक्रिया मंत्री शिवानंद पाटील यांनी दिली.
अधिकार वाटपाबाबत मला माहीत नाही : डॉ. परमेश्वर
सिद्धरामय्या हे पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदी असू शकतात. अधिकार वाटपाबाबत मला माहीत नाही. आमच्यापर्यंत ही चर्चा आलेली नाही, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी दिली. म्हैसूरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, धार्मिक ठिकाणी राजकीय मुद्द्यावर चर्चा नको. आमच्याकडे हायकमांच निर्णय घेते. गुरुवारी दिल्लीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदी असू शकतात. मी यावर प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही, असेही ते म्हणाले.