पंतप्रधानांचे आभार मानले पाहीजेत! त्यांच्यामुळेच इतक्या जागा आल्या; शरद पवार यांचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला
लोकसभेच्या महाराष्ट्रातील निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीला अनुरूप अशी वातावरण निर्मिती केल्या मुळेच महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगल्या जागा मिळवता आल्या असा खोचक टोला महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी लगावला आहे.
लोकसभेच्या निवडणुकाच्या निकालानंतर तब्बल ११ दिवसांनी महाविकास आघाडीची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थिती लावली. या पत्रकार परिषदेला मविआच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. तसेच लोकसभेला मिळालेल्या यशाबद्दल महाराष्ट्रातील मतदारांचे या विजयाबद्दल आभार व्यक्त केले.
झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळून ४७ पैकी ३० जागांवर यश मिळवलं. महायुतीला मात्र या निवडणुकांमध्ये केवळ १७ जागांवर समाधान मानावं लागलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या दाव्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी सभा घेतल्या आहेत. त्या त्या ठिकाणी भाजपचा पराभव होऊन महाविकास आघाडीचा उमेदवार निवडूण आला आहे. याचाच आधार घेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोचक टिका करताना चिमटा काढला आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या ज्या मतदारसंघात सभा घेतल्या..रोड शो घेतले...त्या त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला. मोदींनी १८ सभा आणि १ रोड शो घेतला होता. त्याठिकाणी आमच्या उमेदवारांना मतदारांनी भरभरून पाठिंबा दिला. त्यामुळेच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जेवढ्या अधिक सभा आणि दौरे करतील तेवढे आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना धन्यवाद दिले पाहीजेत.” असे त्यांनी म्हटलं आहे.