For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मालवणच्या मुथूट फिनकॉर्प प्रकरणाची केंद्रीय चौकशी करा; पीडितांची माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराडांकडे धाव

12:11 PM Sep 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
मालवणच्या मुथूट फिनकॉर्प प्रकरणाची केंद्रीय चौकशी करा  पीडितांची माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ  भागवत कराडांकडे धाव
Advertisement

मालवण/छत्रपती संभाजीनगर : मालवण येथील मुथूट फिनकॉर्प शाखेशी संबंधित कथित सोनेतारण गैरव्यवहार प्रकरणाची केंद्रीय स्तरावरून सखोल चौकशी करून पीडितांचे अडकलेले मूळ सोने परत मिळवून द्यावे, अशी मागणी पीडित महिला आणि ‘सोनेतारण फसवणूक तक्रार निवारण मंचा’च्या शिष्टमंडळाने केली. रविकिरण तोरसकर यांच्या माध्यमातून शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीनगर येथे माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची भेट घेऊन प्रकरणाची माहिती दिली.

Advertisement

मालवण शाखेशी संबंधित या प्रकरणात 120 हून अधिक मच्छीमार आणि स्थानिक महिलांचे अंदाजे 9 किलो सोने तसेच सुमारे 6 कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पीडितांच्या म्हणण्यानुसार, अनेक कुटुंबांनी कष्टाने जमा केलेले दागिने या प्रकरणात अडकले आहे.

प्रत्येक पीडितेच्या सोन्याचा आणि संबंधित आर्थिक व्यवहारांचा स्वतंत्रपणे तपास करावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. तसेच हे प्रकरण केवळ मालवण शाखेपुरते मर्यादित न ठेवता कंपनीच्या इतर शाखांमध्येही अशा प्रकारच्या तक्रारी किंवा व्यवहार झाले आहेत का, याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली.

Advertisement

या तपासणीदरम्यान KYC कागदपत्रे, ग्राहकांची संमती, OTP व ई-कन्सेंट, गोल्ड लोनची कागदपत्रे, कर्ज वितरण व बंद करण्याची प्रक्रिया, आर्थिक व्यवहार, सोन्याचे मूल्यांकन आणि सोन्याच्या ताबा व सुरक्षिततेशी संबंधित नोंदी तपासाव्यात, असे शिष्टमंडळाने सांगितले.

मूळ दागिने परत मिळावेत

पीडित महिलांची मागणी केवळ कथित गैरव्यवहारातील जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्यापुरती मर्यादित नसून त्यांचे मूळ दागिने आणि स्त्रीधन सुरक्षित राहावे आणि कायदेशीर प्रक्रियेतून ते लवकरात लवकर परत मिळावे, अशी आहे. यासाठी RBI तसेच आवश्यक केंद्रीय यंत्रणांकडे पाठपुरावा करण्याची मागणीही करण्यात आली.

शिष्टमंडळात रुपेश प्रभू, दाजी जोशी, कविता मोंडकर, माधुरी प्रभू, माजी सभापती पूजा सरकारे, सरपंच तथा प्रमुख तक्रारदार सिया धुरी, मच्छीमार संघटनेचे प्रतिनिधी आणि स्वीकृत नगरसेवक रविकिरण तोरसकर यांचा समावेश होता.

शिष्टमंडळाने मांडलेल्या मागण्यांची दखल घेत डॉ. भागवत कराड यांनी प्रकरणाचा सखोल अभ्यास करून RBI आणि संबंधित केंद्रीय यंत्रणांच्या स्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली.

दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर यावे आणि प्रत्येक पीडितेचे स्त्रीधन सुरक्षितपणे परत मिळावे, यासाठी कायदेशीर मार्गाने पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार शिष्टमंडळाने व्यक्त केला.

Advertisement
Tags :

.