पावसासाठी कसगीत मुस्लिम बांधवांची विशेष नमाज
धाराशिव : पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांवर संकट निर्माण झाले असून शेतकरी चिंतेत आहेत. पावसाअभावी निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती दूर व्हावी आणि परिसरात समाधानकारक पाऊस पडावा, यासाठी उमरगा तालुक्यातील कसगी येथे मुस्लिम समाजाच्या वतीने विशेष नमाज अदा करण्यात आली.
कसगी येथील नुरे ए इलाही जामा मस्जिद येथे मुस्लिम बांधवांनी सामूहिकरीत्या विशेष नमाज अदा करून अल्लाहकडे पावसासाठी साकडे घातले. खरीप हंगामातील पिकांना सध्या पाण्याची नितांत गरज असताना पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
परिसरात चांगला पाऊस पडावा, दुष्काळसदृश परिस्थिती दूर व्हावी, शेतीला पुरेसे पाणी मिळावे तसेच शेतकरी आणि ग्रामस्थांना दिलासा मिळावा, यासाठी यावेळी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
या विशेष नमाजमध्ये मौलाना हाफिज निसार आलम, सदर मकबुल सरनोबत, मशाक मुल्ला, जाफर मुल्ला, माजी सरपंच नबीसाब मुल्ला, ग्रामपंचायत सदस्य उस्मान मुल्ला, मदार सय्यद, मदार मकानदार, बशीर सरनोबत, मशाक सरनोबत यांच्यासह कसगी गावातील मुस्लिम समाजातील लहान-थोर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.