Sangli News: सांगलीतील मुस्लिम बांधवांकडून पंजाबच्या पूरग्रस्तांना मदत सुपूर्द
मुस्लिम समाजाने मानवी मूल्यांचा आदर्श ठेवत दिला मदतीचा हात
सांगली: पंजाबमध्ये आलेल्या महापुराने हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. घरदार वाहून गेले, उपजीविकेची साधने नष्ट झाली. डोळ्यांत अश्रू घेऊन आसरा शोधणाऱ्या लोकांचे हृदयद्रावक चित्र संपूर्ण देशाला अस्वस्थ करून गेले आहे.
अशा कठीण प्रसंगी सांगलीतील मुस्लिम समाजाने मानवी मूल्यांचा आदर्श ठेवत मदतीचा हात पुढे केला आहे. आजचा दिवस पवित्र असून पैगंबर जयंती आणि शुक्रवार एकत्र आल्याने मोठ्या संख्येने नमाजी मस्जिद-ए-नमराड येथे नमाज पठणासाठी जमले होते. या प्रसंगी नमाजी व ट्रस्टीनी एकत्र येत निधी जमा केला.
तब्बल २९,१०० रुपये रक्कम गोळा केली. ही मदत सांगली गुरुद्वारा व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द करण्यात आली. गुरुद्वारचे अध्यक्ष विकी चड्डा यांनी ही मदत स्विकारली. मस्जिद-ए-नमराहचे पदाधिकारी, बिट्ट कटारिया, दातारसिंग, लकी मेहंदीरथा, रोमी मेहंदीरथा, परमजीतसिंग खालसा, हरचरणसिंग गोड तसेच गुरुद्वारचे हेड ग्रंथी जीवनसिंगजी आणि मुस्लिम बांधव उपस्थित होते.
ही रक्कम थेट पंजाबमधील पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. या कार्यामुळे सांगलीकर मुस्लिम समाजाने वाखवून दिले की, संकट काळात धर्म नव्हे तर माणुसकीच खरी ओळख आहे. यावेळी मुस्लिम समाजाने शुक्रवारच्या नमाजमध्ये पंजाबवरील संकट दूर व्हावे व पीडितांना बळ मिळावे, अशी प्रार्थना केली