कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुस्लीम ब्रदरहुडवर जॉर्डनमध्ये बंदी

07:00 AM Apr 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

इस्लामिक संघटनेपासून धोका असल्याचा दावा

Advertisement

वृत्तसंस्था/अम्मान

Advertisement

जगातील सर्वात मोठी सुन्नी इस्लामिक संघटना मुस्लीम ब्रदरहुडवर जॉर्डन या मुस्लीम देशानेच बंदी घातली आहे. या संघटनेशी संबंधित लोक शस्त्रास्त्रं जमा करत समुदायामध्ये कट्टरता फैलावत असून हा प्रकार देशासाठी धोकादायक असल्याचे म्हणत जॉर्डनने हा निर्णय घेतला आहे. जॉर्डनच्या गृह मंत्रालयाने मुस्लीम ब्रदरहुडवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या संघटनेमुळेच हमास निर्माण झाल्याचे मानले जाते. इजिप्तमध्ये स्थापन मुस्लीम ब्रदरहुड ही संघटना जगातील अनेक देशांमध्ये फैलावलेली आहे. जगभरातील मुस्लिमांना एकजूट ठेवण्याचा अजेंडा असल्याचा दावा करणाऱ्या मुस्लीम ब्रदरहुडमुळे मध्यपूर्वेतील अनेक देशांमध्ये मागील दशकात हिंसक आंदोलन झाल्याचे मानले जाते.

राष्ट्रीय सुरक्षा आणि स्थिरतेसाठी मुस्लीम ब्रदरहुडवर बंदी घालणे आवश्यक ठरले आहे. मुस्लीम ब्रदरहुडचे सदस्यत्व स्वीकारणे आणि त्याच्याशी जोडले जात कुठल्याही कृतीत सामील होण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मुस्लीम ब्रदरहुडच्या कार्यालयांना बंद करण्यात आले आहे. आता देशात या संघटनेचे कुणीच सदस्यत्व स्वीकारू शकणार नाही. या कट्टरवादी संघटनेच्या सर्व संपत्ती देखील जप्त करण्यात आल्या आहेत असे उद्गार जॉर्डनचे गृहमंत्री माजेन फराया यांनी काढले आहेत.

मुस्लीम ब्रदरहुडशी संबंधित लोक मोठ्या प्रमाणावर शस्त्रांची जमवाजमव करत आहेत. हे लोक संवेदनशील भागांवर हल्ला करू शकतात. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. जॉर्डनच्या समाजात अस्थिरता निर्माण करणारे घटक आहेत. जॉर्डन एक देश आणि समाज म्हणू एकजूट आहे. समाजात फूट पाडणाऱ्या कुठल्याही शक्तीला काम करण्याची अनुमती आम्ही देऊ शकत नसल्याचे गृहमंत्री फराया यांनी म्हटले आहे. जॉर्डनमध्ये मुस्लीम ब्रदरहुडच्या 16 सदस्यांना देखील अटक करण्यात आली आहे. या आरोपींच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनंतरच मुस्लीम ब्रदरहुड देशात फूट पाडू असल्याचा आरोप जॉर्डनच्या सरकारने केला आहे. मुस्लीम ब्रदरहुडशी संबंधित कुठल्याही सामग्रीला प्रसारित न करण्याचा आदेश प्रसारमाध्यमांना तेथील सरकारने दिला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article