मस्क यांचे ‘एक्स मनी’ फिचर सादर
वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
एलॉन मस्क यांनी ‘एक्स मनी’ फीचर सादर केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या ‘एव्हरीथिंग अॅप’ बनण्याच्या योजनेतील हे एक मोठे पाऊल आहे. कंपनीने नुकतीच ही बँकिंग सेवा केवळ अमेरिकेतील आपल्या प्रीमियम सदस्यांसाठी सुरू केली आहे. यापूर्वी याची चाचणी केवळ आमंत्रितांसाठी असलेल्या बीटा टप्प्यात केली जात होती, त्यानंतर 27 जुलैपासून हे अधिकृतपणे सादर करण्यात आले आहे. वापरकर्ते अॅप न सोडता बँकिंग करू शकतील. एक्स मनी फीचरद्वारे, सदस्य अॅप न सोडता आपली दैनंदिन बँकिंग कामे करू शकतील.
या सेवेअंतर्गत, वापरकर्त्यांना क्रॉस रिव्हर बँकेच्या सहकार्याने एक डिपॉझिट खाते मिळेल. याद्वारे, वापरकर्ते पैसे स्वीकारू शकतील, इतर एक्स वापरकर्त्यांना पैसे हस्तांतरित करू शकतील, बिले भरू शकतील, वायर ट्रान्सफर पाठवू शकतील आणि प्रत्यक्ष चेक जमा करू शकतील.
एक्स मनी अंतर्गत एक व्हर्च्युअल व्हिसा डेबिट कार्ड आपोआप जारी केले जाईल. हे कार्ड अॅपल पे आणि गुगल पे या दोन्हीसोबत काम करते. याव्यतिरिक्त, वापरकर्ते एक फिजिकल मेटल कार्ड देखील ऑर्डर करू शकतात.
कार्डची प्रमुख वैशिष्ट्यो
?कॅशबॅक: पात्र खरेदीवर 3 टक्के कॅशबॅक उपलब्ध होईल.
?शून्य शुल्क: यावर कोणतेही परदेशी व्यवहार शुल्क आकारले जाणार नाही.
?जागतिक स्वीकृती: हे कार्ड जगभरात जिथे व्हिसा समर्थित आहे, तिथे काम करेल.
वार्षिक 6 टक्के व्याज आणि मोफत एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे. सध्या, ‘एक्स मनी’ हे वैशिष्ट्या फक्त अमेरिकेतील प्रीमियम सदस्यांसाठी आहे. पात्र वापरकर्ते डायरेक्ट डिपॉझिट सेट करून 6 टक्केपर्यंत वार्षिक उत्पन्न मिळवू शकतात.
इतर सुविधा आणि सुरक्षा वैशिष्ट्यो
?मुदतपूर्व पगार: पगाराचे चेक 2 दिवस आधी मिळू शकतात.
?मोफत सेवा: मोफत एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा, मोफत वायर ट्रान्सफर आणि पोस्टाने चेक पाठवण्याची सुविधा दिली जाईल.
?सुरक्षा: एक्स नुसार, खाती सुरक्षित करण्यासाठी पास-की ऑथेंटिकेशनचा वापर केला जातो. प्रत्येक पेमेंटसाठी पडताळणीची एक अतिरिक्त पायरी आवश्यक असेल. याव्यतिरिक्त, कार्ड व्यवहार व्हिसाच्या फसवणूक संरक्षण आणि जोखीम व्यवस्थापन प्रणालीद्वारे संरक्षित केले जातील.
मस्कची ‘एव्हरीथिंग अॅप’ संकल्पना
एक्स मनी लाँच हे चीनच्या ‘वीचॅट’च्या धर्तीवर एक्सला एक ‘एव्हरीथिंग अॅप’ बनवण्याच्या इलॉन मस्कच्या योजनेचा एक भाग आहे. यामध्ये मेसेजिंग, शॉपिंग आणि वित्तीय सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर काम करतात. 2023 मध्ये, मस्कने कर्मचाऱ्यांना सांगितले की, त्यांना एक्सने पीअर-टू-पीअर पेमेंटच्या पलीकडे जाऊन वापरकर्त्यांच्या संपूर्ण आर्थिक जीवनाला आधार द्यावा अशी त्यांची इच्छा आहे.