जगातील सर्वात वेगवान कार मस्क आणणार
टेस्ला पुढील वर्षापासून ‘न्यू टेस्ला रोडस्टर’ इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी करणार सुरू
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
एलॉन मस्कची कंपनी टेस्ला पुढील वर्षापासून ‘न्यू टेस्ला रोडस्टर’ इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी सुरू करणार आहे. या कारमध्ये 10 लहान रॉकेट थ्रस्टर्स असतील, ज्यामुळे कार एका सेकंदापेक्षा कमी वेळेत 0 ते 60 एमपीएच (ताशी 96.56 किलोमीटर) वेग घेऊ शकेल. एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की कारचे उत्पादन, डिझाइन पूर्ण झाले आहे आणि वर्षाच्या अखेरीस तिचे अनावरण केले जाईल.
ही गाडी उडू शकते
मस्कने सांगितले की, ही कार त्यांची रॉकेट कंपनी स्पेसएक्स आणि टेस्ला यांच्या सहकार्याने बनवली जात आहे. रॉकेट इंजिनमुळे कारच्या वेग आणि ब्रेकिंगमध्ये सुधारणा होईल व भविष्यात ही कार उडू शकणार असल्याचेही ते म्हणाले. मस्क म्हणाले ‘मला वाटतं की हा आतापर्यंतचा सर्वात मनाला आनंद देणारा प्रोडक्ट डेमो असेल.’ टेस्लाचे पहिले उत्पादन रोडस्टर स्पोर्ट्स कार होते जी तिने 2008 मध्ये लॉन्च केली होती. आता नवीन रोडस्टर लाँच केली जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
मस्कने एका पोस्टमध्ये लिहिले की,
‘तुम्हाला तुमच्या घरापेक्षा टेस्ला रोडस्टर अधिक आवडेल.’ मस्कने दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले आहे की 19 वर्षांपूर्वी मला माझ्या मालकीची सर्वोत्तम कार, मॅक्लारेन इ1 किंवा पालो अल्टो मधील घर खरेदी यापैकी निर्णय घ्यायचा होता. मग मी एक इ1 आणि एक छोटा कॉन्डो घेतला जो कारपेक्षा खूपच स्वस्त होता. नवीन टेस्ला रोडस्टर सर्व गॅस स्पोर्टस् कारला हरप्रकारे मागे टाकेल.
2017 मध्ये 4 सीटर रोडस्टरची घोषणा
टेस्लाने 2017 मध्ये बॅटरीवर चालणाऱ्या 4-सीटर रोडस्टरची घोषणा केली. त्यानंतर 2020 मध्ये लॉन्च करण्याची योजना होती. परंतु, त्याचे लॉन्च प्रथम 2020 ते 2021 आणि नंतर 2023 मध्ये पुढे ढकलण्यात आले. मस्क यांनी 2023 मध्ये सांगितले की टेस्लाच्या पुढील पिढीचे रोडस्टर इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कारचे उत्पादन पुढील वर्षी सुरू होण्याची अपेक्षा आहे. इलेक्ट्रिक हायपरकार रिमॅक नेव्हेरा रिव्हर्समध्ये जगातील सर्वात वेगवान कार बनली आहे. रिव्हर्स-ड्रायव्हिंग वेगाचा हा विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंदवला गेला आहे, जो क्रोएशियाच्या गोरान ड्रंडकने मंगळवारी जर्मनीतील ऑटोमोटिव्ह टेस्टिंग पापेनबर्ग सेंटरमध्ये केला आहे.