जागतिक श्रीमंतात मस्क अव्वल, मुकेश अंबानींचा आशियात डंका
हुरुन ग्लोबल रिच 2025 यादी जाहीर : भारतीयात रोशनी नाडर तिसऱ्या
वृत्तसंस्था/ मुंबई
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी एचसीएल टेकच्या चेअरमन रोशनी नाडर या भारतातील तिसऱ्या नंबरच्या सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरल्या आहेत आणि जागतिक क्रमवारीत पाहता पाचव्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्ती बनल्या आहेत. हुरून ग्लोबल रीच 2025 ची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये रोशनी नाडर या जागतिक स्तरावर महिलांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहेत.
अलीकडेच तिच्या वडिलांनी म्हणजेच शिव नाडर यांनी आपली 47 टक्के इतकी हिस्सेदारी रोशनी नाडर हिच्या नावे केली आहे. त्यानंतर रोशनी नाडर यांची संपत्ती 3.5 ट्रिलियनवर पोहोचली आहे. जागतिक 10 आघाडीवरच्या श्रीमंत अब्जाधीश महिलांच्या यादीत रोशनी नाडर पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत.
मुकेश अंबांनींची श्रीमंती कायम
रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे भारतातर्फे सर्वात श्रीमंत राहिले असून त्यांची संपत्ती 8.6 ट्रिलियनवर राहिली आहे. गेल्या एक वर्षभरामध्ये पाहता त्यांच्या संपत्तीमध्ये एक ट्रिलियनची घसरण पाहायला मिळाली. कर्जाच्या प्रमाणात झालेली वाढ, मागणीत आलेली घसरण आणि स्पर्धा या पार्श्वभूमीवर त्यांच्या संपत्ती मूल्यामध्ये घसरण झालेली दिसली आहे. अंबानी हे सध्याला आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून हुरुन ग्लोबल रिचच्या यादीत नेंदले गेले आहेत. गौतम अदानी हे 8.4 ट्रिलियनच्या संपत्तीसह दुसरे भारतीय श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. सन फार्मासिटिकलचे दिलीप संघवी हे चौथ्या स्थानावर असून त्यांच्यापाठोपाठ अजीम प्रेमजी आहेत.
284 अब्जाधिश
भारतामध्ये अब्जाधीशांची संख्या आज घडीला 284 इतकी झाली आहे. मागच्या वर्षी या यादीमध्ये जवळपास 13 जणांचा नव्याने समावेश झालेला आहे. अब्जाधीशांच्या संख्येच्या तुलनेमध्ये पाहता जागतिक स्तरावर भारत आता याबाबतीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीमध्ये अमेरिका आणि चीन हे दोन देश पहिल्या दोन स्थानांवर आहेत.