ट्रम्प प्रशासनात मस्क, रामास्वामी यांना स्थान
प्रशासनाला सल्ला देणारा नवा विभाग सांभाळणार : फॉक्स टीव्ही अँकर हेगसेथ संरक्षणमंत्री होणार
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झाल्यावर डोनाल्ड ट्रम्प हे स्वत:चे प्रशासन चालविण्यासाठी टीमची निवड करत आहेत. काही पदांवर नियुक्त्या जाहीर केल्यावर ट्रम्प यांनी टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क आणि भारतीय वंशाचे उद्योजक विवेक रामास्वामी यांना मोठी जबाबदारी सोपविली आहे. मस्क आणि रामास्वामी हे डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिएंसीचे (डीओजीई) नेतृत्व करतील. डीओजीई एक नवा विभाग असून तो प्रशासनाला सल्ला देणार आहे. याचबरोबर ट्रम्प यांनी स्वत:च्या प्रशासनात फॉक्स न्यूजचे सूत्रसंचालक पीट हेगसेथ यांनाही स्थान दिले आहे. हेगसेथ यांना संरक्षणमंत्री करण्यात येणार असल्याचे समजते.
विवेक रामास्वामी आणि मस्क हे दोन्ही अद्भूत अमेरिकन माझ्या प्रशासनासाठी नोकरशाही संपविणे, अनावश्यक खर्चात कपात करणे, अनावश्यक नियम संपुष्टात आणणे आणि संघीय यंत्रणांच्या पुनर्रचनेचे काम करतील. हे आमच्या ‘सेव अमेरिका’ अजेंड्यासाठी आवश्यक असल्याचे उद्गार ट्रम्प यांनी काढले आहेत.
डीओजीई या नव्या व्यवस्थेमुळे शासकीय निधीची उधळपट्टी करणाऱ्या लोकांमध्ये खळबळ उडणार आहे. रिपब्लिकन नेत्यांनी दीर्घकाळापासून डीओजीईचा उद्देश पूर्ण करण्याचे स्वप्न पाहिले आहे. हा आमच्या काळातील द मॅनहॅटन प्रोजेक्ट ठरू शकतो असा दावा ट्रम्प यांनी केला. या डीओजीईची जबाबदारी 4 जुलै 2026 रोजी संपुष्टात येणार असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले.
आम्ही नरमाईची भूमिका बाळगणार नाही असे नवी जबाबदारी मिळाल्यावर मस्क यांनी म्हटले आहे. तर आम्हाला कमी लेखू नका, गांभीर्याने काम करू अशी प्रतिक्रिया रामास्वामी यांनी व्यक्त केली आहे.
सरकारचे 2 ट्रिलियन डॉलर्स वाचणार
नव्या विभागामुळे सरकारी खर्चात कमीतकमी 2 ट्रिलियन डॉलर्सची कपात करता येणार असल्याचा दावा मस्क यांनी केला. तर काही तज्ञ हे अशक्य असल्याचे म्हणत आहेत. मस्क हे संरक्षण अंदाजपत्रक किंवा सामाजिक सुरक्षा यासारख्या कार्यक्रमांमध्ये कपात करण्याची शक्यता असल्याचे मानले जात आहे.
रामास्वामींची निवड का?
मस्क यांनी ट्रम्प यांच्या बाजूने उघडपणे प्रचार केला होता. तसेच ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेकरता मस्क यांनी सुमारे 900 कोटी रुपये खर्च केले आहेत. तर विवेक रामास्वादी हे औषध कंपनीचे संस्थापक आहेत. ट्रम्प यांच्या विरोधात विवेक रामास्वामी यांनी रिपब्लिकन पार्टीच्या प्रायमरी निवडणुकीत भाग घेतला होता. यानंतर रामास्वामी यांनी नामांकन मागे घेत ट्रम्प यांना समर्थन दिले होते. तेव्हापासून ते ट्रम्प यांच्या प्रचारमोहिमेत मोठी भूमिका बजावत होते.
पीट हेगसेथ कोण?
पीट यांनी स्वत:चे पूर्ण जीवन देशासाठी एक योद्ध्याच्या स्वरुपात व्यतित केले आहे. ते कठोर, कुशाग्र असून अमेरिका फर्स्ट या धोरणावर त्यांचा विश्वास असल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले आहे. हेगसेथ यांनी यापूर्वी सैनिक म्हणून अफगाणिस्तान तसेच इराकमध्ये सेवा बजावली आहे. तसेच पीट हेगसेथ एक लोकप्रिय टीव्ही अँकर आहेत. फॉक्स अँड फ्रेंड्स वीकेंड या कार्यक्रमाचे ते सह-सूत्रसंचालक आहेत. हेगसेथ यांची एक मोठी फॅन फॉलोइंग आहे.