मस्क यांच्याकडून भारतीय मतमोजणीचे कौतुक
एका दिवसात 64 कोटी मतांची झाली मोजणी : कॅलिफोर्नियात 18 दिवसानंतरही मतमोजणी सुरूच
वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को
टेस्ला या दिग्गज कंपनीचे प्रमुख इलॉन मस्क यांनी भारतातील निवडणूक व्यवस्थेचे कौतुक केले आहे. भारताने एकाच दिवसात 64 कोटी मतांची मोजणी करून निकाल जाहीर केला आहे. तर अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात अद्याप 5 नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु असल्याचे मस्क यांनी म्हटले आहे. भारतात शनिवारी महाराष्ट्रा आणि झारखंड विधानसभेसमवेत 13 राज्यांमधील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी पार पडली आहे.
मस्क यांनी भारतातील मतमोजणीचे कौतुक करणारी पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. भारताने एकाच दिवसात 64 कोटी मतांची मोजणी कशी केली असा प्रश्न या पोस्टमध्ये करण्यात आला होता. तर मस्क यांनी दुसरी पोस्ट शेअर केली, ज्यात एका युजरने भारतात 64 कोटी मते एकाच दिवसात मोजली तर कॅलिफोर्नियात 18 दिवसांपासून दीड कोटी मतांची मोजणी सुरू असल्याचे नमूद केले होते. मस्क यांनी कॅलिफोर्नियातील हा प्रकार दु:खद असल्याचे नमूद केले आहे.
गतिमानपणे निवडणूक करविण्यासाठी मस्क यांनी भारताचे कौतुक केले सतेच अमेरिकेच्या निवडणूक व्यवस्थेवर निशाणा साधला आहे. अध्यक्ष ट्रम्प यांनी आता अधिकृतपणे स्वत:च्या प्रशासनात प्रत्येक विभागासाठी संबंधितांचे नामांकन केले आहे आणि दुसरीकडे कॅलिफोर्नियात अद्याप मतमोजणी सुरू असल्याचे उपरोधिक वक्तव्य मस्क यांनी केले आहे.
मतपत्रिकेद्वारे निवडणूक
अमेरिकेत बहुतांश मतदान मतपत्रिका किंवा ईमेल मतपत्रिकेद्वारे होते. 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीत केवळ 5 टक्के क्षेत्रांमध्ये मतदानासाठी यंत्रांचा वापर करण्यात आला होता. अशा स्थितीत तेथील मतमोजणीचा खूपच अधिक वेळ लागत असतो. कॅलिफोर्निया हा अमेरिकेतील सर्वात मोठा प्रांत आहे. तेथे 3.9 कोटी लोकांचे वास्तव्य आहे. 5 नोव्हेंबर रोजी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीकरता कॅलिफोर्नियात 1.6 कोटी लोकांनी मतदान केले होते. मतदानाच्या दोन आठवड्यांनंतरही सुमारे 5 लाख मतांची मोजणी अद्याप शिल्लक आहे. अमेरिकेत दरवर्षी मतमोजणीसाठी कित्येक आठवडे लागत असतात. कॅलिफोर्नियात 24 नोव्हेंबरपर्यंत प्रांतातील 5 लाख 70 हजारपेक्षा अधिक मतपत्रिकांची मोजणी झालेली नाही. 98 टक्के मतपत्रिकांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर डेमोक्रेटिक पार्टीच्या उमेदवार कमला हॅरिस यांना प्रांतात 58.6 टक्के मतांसह विजयी घोषित करण्यात आले आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांना 38.2 टक्के मते मिळाल्याचे स्टेट सेक्रेटरी ऑफिसकडून सांगण्यात आले आहे.
ट्रम्प प्रशासनाला मस्क यांचा समावेश
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इलॉन मस्क यांना स्वत:च्या टीममध्ये सामील केले आहे. मस्क आणि विवेक रामास्वामी यांना डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिएंसीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. डीओजीई हा नवा विभाग असून तो सरकारला बाहेरून सल्ला देणार आहे.