कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

'शहर अभियंता'साठी संगीत खुर्ची

12:14 PM May 21, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर  / संतोष पाटील :

Advertisement

शहराच्या विकासाला दिर्घकाळ दिशा देण्याची क्षमता असणारे महापालिकेतील आयुक्तांनंतरची ताकदीची खुर्ची म्हणजे शहर अभियंता होय. नेत्रदीप सरनोबत या पदावरून 31 मे रोजी निवृत्त होत आहेत. सहा महिन्यांसाठी मुदतवाढीसाठी ते प्रयत्नशील आहेत. दोनवेळा खुर्चीवर बसूनही पुन्हा बदली झालेले जल अभियंत हर्षजित घाटगे हे या खुर्चीसाठी प्रबळ दावेदार मानले जातात तर उपशहर अभियंता रमेश मस्कर यांची पदोन्नती असल्याने या तिघांपैकी या हॉटसिटवर कोण बसणार? याची उत्सुकता महापालिका वर्तुळात आहे.

Advertisement

नेत्रदीप सरनोबत यांनी सभागृहाच्या ठरावाव्दारे 2012 साली शहर अभियंता पदाचा रितसर चार्ज घेतला. यापूर्वी सहा-सात वर्ष ते प्रभारी म्हणून खुर्चीवर बसत होते. घेल्या दोन वर्षापासून त्यांना अतिरिक्त आयुक्तपदावर पदोन्नत्ती होणार असल्याची चर्चा होती. दरम्यान, मार्च 2023 मध्ये शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेला जबाबदार धरत, खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या तक्रारीची अतिजलद दखल घेत, शासनाने शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची पदावरुन उचलबांगडी केली. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नेमणूक होईल, अशी आशा असतानाच नेत्रदीप सरनोबत यांच्या पदाची अवनती करुन त्यांची जलअभियंतापदी नियुक्ती झाली. तर जलअभियंता पदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या हर्षजीत घाटगे यांची शहर अभियंतापदी नेमणूक झाली होती.

दरम्यान , वर्षभरानंतर राज्य शासनाला आपला तो पदबदलीचा आदेश चुकीचा असल्याचा साक्षात्कार झाला. अन् पुन्हा नेत्रदीप सरनोबत यांना शहर अभियंताच्या खुर्चीवर बसवण्याचा शासन आदेश झाला. कार्यकारी अभियंता दर्जाचे पद असणाऱ्या हर्षजीत घाटगे यांच्यावर पुन्हा पाणी पुरवठा विभागाचा कार्यभार सांभाळण्याची वेळ आली.

सरनोबत यांनी अतिरिक्त आयुक्त पदासाठी मंत्रालयात फिल्डींग लावली, मात्र महापालिकेतून पत्रव्यवहारच रखडला. जो पत्रव्यवहार झाला त्यातही मेख मारली होती. 2012 च्या सभागृह ठरावाला राज्य सरकारने 2022 ला मंजुरी दिली, तीच तारीख त्यांना पदोन्नतीची असल्याचे पत्रात उल्लेख केल्याने नगरविकास विभागाने पुन्हा महापालिका प्रशासनाकडे बोट दाखवले. आता 31 मे रोजी रात्री बारा वाजेपर्यंत सरनोबत यांना शासनाकडून सहा महिने मुदतवाढ दिल्याचा आदेश आणावा लागेल, अन्यथा 1 जून रोजी महापालिका प्रशासक सेवाज्येष्ठता यादीप्रमाणे हर्षजित घाटगे यांची शहर अभियंता पदावर नेमणूक करु शकतात.

हर्षजित घाटगे यांची अजून किमान 15 वर्ष सेवा आहे. याचदिवशी पदोन्नती होणारे रमेश मस्कर दोन वर्षात निवृत्त होत आहेत. त्यामुळे घाटगे यांनी जल अभियंता पदावर काम करावे, मस्कर यांना शहर अभियंता पदावर काम करण्याची संधी द्यावी, असाही एक सूर आहे. याबाबत हे दोघेही प्रशासक यांना भेटल्याचे सांगितले जाते. मात्र सेवा ज्येष्ठता किंवा शासन आदेश यापलिकडे जाऊन कोणताही निर्णय होणार नाही, याबाबत प्रशासक के. मंजूलक्ष्मी ठाम आहेत. सहा महिन्यांनी मदतवाढीच्या प्रतिक्षेतील नेत्रदीप सरनोबत, दोन वेळा पदावर हुलकावणी दिलेले हर्षजित घाटगे आणि निवृत्तीपूर्वी शहर अभियंता व्हावे, अशी मनिषा असणारे रमेश मस्कर यांच्यातील शहर अभियंता पदाच्या शर्यतीत बाजी कोण मारणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

महापालिकेच्या राजकारणात महाडिक यांच्याप्रमाणेच आमदार सतेज पाटील आणि आमदार राजेश क्षीरसागर यांचा शब्द महत्वाचा मानला जातो. सरनोबत हे सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर या दोघांचेही निकटवर्ती असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते असल्याने सरनोबत यांच्यासाठी राजेश क्षीरसागर राजकीय ताकद वापरण्याची शक्यता आहे.

शहराच्या सर्वांगिण विकासाला दिशा देणारे हे पद आहे. या पदावर असणाऱ्या व्यक्तींनी आतापर्यंत शहराच्या विकासाला किती दिशा दिली, हा संशोधनाचा विषय आहे. यापुढेही बसणारे काय दिवे लावतील, याचाही अंदाज बांधणे कठीण आहे. मात्र शहरात खर्च होणाऱ्या निधीपैकी 80 टक्के निधी या विभागाच्या मांडवाखालूनच जातो. चार विभागीय कार्यालयासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा दिमतीला असतो. टक्केवारीची मोठी गणित हाच विभाग सोडवतो, या अर्थाने या पदाला महापालिका वर्तुळात मोठं महत्व आहे.

शहर अभियंता पदावर कार्यकारी अभियंता दर्जाचा अधिकारी असतो. राज्य शासनाने ठरवल्यास प्रशासकांनी नेमणूक केल्यानंतरही दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक होऊ शकते. ही व्यक्ती महापालिकेतील त्या दर्जाची किंवा पीडब्ल्युडी विभागातील समकक्ष अधिकाऱ्याची नेमणूक होऊ शकते. महापालिका निवडणूक, कोट्यावधीच्या निधीतील कामे, प्रस्तावित निधी, अंबाबाई विकास आराखड्यास हजारो कोटींची विकासकामे आदींमुळे या पदावर आपला माणूस असावा, यासाठी पडद्यामागेही जोरदार घडामोडी सुरू आहेत.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article