आर्ट्स सर्कल बेळगावतर्फे रविवारी संगीत महोत्सव
आयटीसीच्या संगीत रिचर्स अकॅडमीच्या सहकार्याने आयोजन
बेळगाव : आर्ट्स सर्कल बेळगावतर्फे रविवार दि. 3 मार्च रोजी लोकमान्य रंगमंदिर येथे एकदिवसीय संगीत महोत्सव सादर होणार आहे. सकाळचे सत्र 9.30 वाजता सुरू होणार आहे. तर सायंकालीन सत्र 5.30 वाजता सुरू होणार आहे. सदर महोत्सव कोलकाता येथील आयटीसीच्या संगीत रिचर्स अकॅडमीच्या सहकार्याने होत आहे. यामध्ये पद्मश्री उल्हास कशाळकर, अलिक सेनगुप्त, संबर्ती दास यांचे गायन, अबीर हुसेन यांचे सरोदवादन होणार आहे. त्यांना विभास सांघई, रामदास पळसुले हे तबल्याची तर रवींद्र माने व सारंग कुलकर्णी संवादिनीची साथ करणार आहेत. सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. कलाकारांचा परिचय पुढीलप्रमाणे-
पद्मश्री उल्हास कशाळकर
उल्हास कशाळकर यांनी नागपूर विद्यापीठातून सर्वोच्च गुण मिळवून संगीताच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळविले. राजाभाऊ कोगजे व पी. एम. खर्डेनवीस यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतल्यानंतर पुढे राम मराठे यांच्याकडून आग्रा घराण्याची व गजाननबुवा जोशींकडून ग्वाल्हेर घराण्याची तालीम घेतली. दूरदर्शन व आकाशवाणीवर अनेक कार्यक्रम त्यांनी केले असून 1993 मध्ये त्यांनी कोलकाताच्या आयटीसी संगीत संशोधन अकादमीत आचार्यपद स्वीकारले व आज ते तेथे ग्वाल्हेर घराण्याच्या गुरुपदावर कार्यरत आहेत. त्यांना पं. विष्णू दिगंबर पलूसकर स्मृती पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, मध्यप्रदेश सरकारचा तानसेन सन्मान हे पुरस्कार व भारत सरकारकडून पद्मश्रीने गौरविले आहे.
अलिक सेनगुप्ता
अलिक सेनगुप्ता हे वडील पं. अॅशेस सेनगुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आयटीसी संगीत संशोधन अकादमीमध्ये पं. उल्हास कशाळकर यांच्याकडे शिक्षण घेत आहेत. त्यांना भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाकडून द नॅशनल स्कॉलरशीप फॉर यंग आर्टिस्ट हा राष्ट्रीय मान्यता गायन कला उत्कृष्टतेसाठी पुरस्कार मिळाला. रवींद्र भारती विद्यापीठातून त्यांनी संगीतामध्ये प्रथमश्रेणीमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. आयसीसीआरच्या संगीतकारांच्या यादीत त्यांचे नाव आहे.
अबीर हुसेन
हे मूळचे पश्चिम बंगालचे. वडील गुलाम इमाम हे त्यांचे पहिले मार्गदर्शक. हे दोघेही पं. ध्रुवतारा जोशी यांचे विद्यार्थी होते. बाराव्या वर्षी सरोदवादक पं. बुद्धदेव दासगुप्ता यांच्या संपर्कात आल्यानंतर ते आयटीसी संगीत संशोधन अकादमीचे विद्वान बनले. सेनिया शाहजहानपूर घराण्याच्या अग्रगण्य कलाकारांमध्ये ओळखल्या जाणाऱ्या अबीर यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. संगीत प्रभाकर परीक्षेत त्यांनी दुसरा क्रमांक मिळविला होता. राष्ट्रीय शिष्यवृत्तीचे ते मानकरी आहेत.
संबर्ती दासगुप्त
संबर्ती या गुरू पं. अजय चक्रवर्ती व ब्रजेश्वर मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली शिकत आहेत. प्रारंभी पालकांकडून त्यानंतर 2003 मध्ये श्रुतीनंदन संस्थेमध्ये विधान मित्रा, अभिजित मुखर्जी, चंदना चक्रवर्ती, अमोल चटर्जी यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. राष्ट्रीय शिष्यवृत्तीच्या त्या मानकरी आहेत.
रामदास पळसुले
तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांचे शिष्य असणारे पं. पळसुले हे मूळचे पुण्याचे. त्यांनी आपल्या तबला शिक्षणाची सुरुवात पं. जी. एल. सामंत यांच्याकडे केली. त्यानंतर पं. सुरेश तळवलकर यांचे मार्गदर्शन घेतले. त्यींन एकल तबलावादनाचे अनेक कार्यक्रम केले आहेत.
विभास संघाई
विभास यांनी कै. प्रा. ललित मोहन संघाई यांच्या हाताखाली तबलावादन शिकण्यास प्रारंभ केला. दिवंगत कै. कृष्णकुमार गांगुली यांच्याकडूनही त्यांनी शिक्षण घेतले. पं. समर सहा यांचे ते शिष्य आहेत. पं. अजय चक्रवर्ती यांच्याकडून देखील त्यांनी तबलावादनाच्या विविध शैलींचे शिक्षण घेतले आहे. आकाशवाणी व दूरदर्शनचे ते अ दर्जाचे कलाकार आहेत.
रवींद्र माने
पेशाने वकील असलेले रवींद्र माने उत्कृष्ट संगीतकार आहेत. संवादिनीवादक पं. रामभाऊ विजापुरे यांच्याकडून त्यांनी संवादिनीचे शिक्षण घेतले तर पं. हयवदन जोशी यांच्याकडून तबलावादनाचे शिक्षण घेतले. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत अलंकार पदवी त्यांनी मिळविली आहे.
सारंग कुलकर्णी
संवादिनीवादक पं. सुधांशू कुलकर्णी यांच्याकडे सारंग यांनी मार्गदर्शन घेतले. त्यानंतर पं. विजापुरे यांचे मार्गदर्शन मिळाले व सध्या अॅड. रवींद्र माने यांच्याकडे ते शिकत आहेत. ते एमए पदवीधर असून एमबीएचीही पदवी घेतली आहे. राष्ट्रीय पातळीवरील युवा महोत्सवात त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला असून संवादिनीच्या संशोधनात्मक बांधणीसाठी केंद्र सरकारची फेलोशिप मिळाली आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. स्वरमल्हार फाऊंडेशन या संस्थेचे ते संस्थापक आहेत.