For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाऊस गायब झाला तरी बाजारात अळंबी दाखल

07:46 AM Jul 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाऊस गायब झाला तरी बाजारात अळंबी दाखल
Advertisement

25 कळ्यांचा वाटा तब्बल 600 रुपयांना

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

पणजी : पावसाळा सुरु होताच राज्यात मासेमारी बंदी लागू होते. त्यामुळे खवय्यांना गोड्या पाण्यातील मासळीवर अवंलबून राहावे लागते. परंतु हल्लीच्या वर्षांमध्ये अशी मासळी मिळणेही कमी होऊ लागले आहे. अशावेळी लोकांची भीस्त असते ती हंगामी रानभाज्या किंवा सर्वाधिक वैशिष्ट्यापूर्ण आणि लोकप्रिय खाद्य असलेल्या अळंब्यांवर. तसे पाहिल्यास ही अळंबी प्रचंड महाग असली तरीही ‘हौसेला मोल नसते’ म्हणतात त्या न्यायाने लोक खरेदीही करतात.

Advertisement

सध्या राज्यात अनेक ठिकाणी अळंबी दाखल झालेली आहेत. परंतु त्यांच्या किंमती ऐकल्यास प्रथमच बाजारात दाखल होणाऱ्या मानकुराद आंब्यांची आठवण आल्याशिवाय राहात नाही. सध्या दाखल झालेल्या अळंब्यांचा वाटा (पुडा) 600 रुपयात विकला जात होता. पूर्वी या पुड्यात 100 कळ्या असायच्या व त्या सुमारे 800 रुपयांना मिळायच्या. आता केवळ 20 ते 25  कळ्या असतात. त्यावरून दर ठरविल्यास 100 कळ्यांसाठी तब्बल 2400रुपये मोजावे लागतील, एवढी महाग असल्याचे दिसून आले आहे.

अळंबी ही अशी एक प्रजाती आहे जिची लागवड करता येत नाही. त्यामुळे अति-संकलनामुळे तिच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. त्याचे पर्यावरणावर दूरगामी परिणाम होऊ शकतात, अशी भीती असल्याने गेल्या काही वर्षांपासून वनखात्याने अळंब्यांच्या संकलनावर कायदेशीर बंदी घातलेली आहे. तरीही लोक रानात जातात व वाऊळांवर वाढणारी अळंबी जीव धोक्यात घालून गोळा करतात. नंतर साग किंवा केळीच्या पानांत गुंडाळून त्यांची एखाद्या बाजारात किंवा महामार्गांच्या कडेला थांबून विक्री करण्यात येते.

गोव्यासह कर्नाटक तसेच महाराष्ट्रातही रान अळंबी आढळतात. मात्र त्यांची बनविण्याची प्रक्रिया त्या त्या प्रदेशातील पाककलेवर अवलंबून असते. गोव्यात ती अप्रतिमरित्या बनविण्यात येते.  गोव्यात पश्चिम घाटातील जंगलांतून अळंबी गोळा करतात. यांची कृत्रिमरित्या लागवड करता येत नसल्याने त्यांना मोठी मागणी आहे. म्हणूनच दरवर्षी सोन्याच्या भावात विक्री होत असते.

Advertisement
Tags :

.