For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुश्रीफ नवव्यांदा मंत्री, आबिटकरांना अखेर ‘लाल दिवा’

10:46 AM Dec 16, 2024 IST | Pooja Marathe
मुश्रीफ नवव्यांदा मंत्री  आबिटकरांना अखेर ‘लाल दिवा’
Mushrif's 9th Term as Minister, Abitkar Gets Red Beacon
Advertisement

कोल्हापूर जिह्यास मिळाली दोन कॅबिनेट मंत्री पदे
हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर यांनी घेतली मंत्री पदाची शपथ
आता पालकमंत्री कोण ? याकडे जिह्याचे लक्ष
जिह्याच्या विकासाला मिळणार गती
कोल्हापूर
विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिह्याने महायुतीला घवघवीत यश मिळवून दिल्यानंतर महायुतीचे वरिष्ठ नेते किती मंत्री पदे देतात ? याकडे जिह्यातील नेते, कार्यकर्त्यांसह मतदारांचे लक्ष होते. अखेर रविवारी झालेल्या मंत्री पदाच्या शपथविधीमध्ये कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ यांनी कॅबिनेट मंत्री पदाची नवव्यांदा शपथ घेतली. तर राधानगरी मतदारसंघातून विजयी हॅटट्रीक केलेले आमदार प्रकाश आबिटकर यांनाही शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाल दिव्याची गाडी बहाल करून निवडणुकीच्या प्रचारसभेत दिलेला शब्द पाळला आहे. कोल्हापूरातील महायुतीचे अनेक आमदार मंत्री पदाच्या शर्यतीत असले तरी त्यामध्ये मुश्रीफ आणि आबिटकर यांनी बाजी मारली आहे. आता जिह्याचे पालकमंत्री कोण होणार ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच महायुतीला निर्विवाद यश मिळाले. यामध्ये भाजप अपक्षासह तीन, जनसुराज्य दोन, शिवसेना शिरोळमधील घटक पक्षासह चार आणि राष्ट्रवादीला एक असे महायुतीचे संख्याबळ झाले असताना किती कॅबिनेट मंत्रीपद आणि राज्यमंत्रीपद मिळणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. या विस्तारात कोल्हापूर जिह्याला दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. जिह्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर आत्मविश्वास मिळालेल्या महाविकास आघाडीला मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने दहा पैकी दहा जागांवर यश मिळवून मविआला धोबीपछाड केले. कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपद मिळेल अशी सुरुवातीपासूनच चर्चा होती. मुश्रीफ यांचा पूर्वानुभव आणि सलग सहाव्यांदा आमदार झाल्याने अखेर त्यांच्या मंत्रीपदावर शिक्कामोर्तब झाले. करवीरचे आमदार चंद्रदीप नरके, कोल्हापूर उत्तरचे राजेश क्षीरसागर हे दोघेही मंत्री पदासाठी आग्रही होते. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीपदाची माळ आबिटकर यांच्या गळ्यात टाकली. जिह्यात भाजपचे दोन आमदार असून त्यांचा घटक पक्ष असलेला जनसुराज्य शक्ती पक्षाचेही दोन आमदार आहेत. आघाडी सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्रिपदावर आमदार विनय कोरे यांनी जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी असलेला अनुभव आणि गेल्या दहा वर्षांपासून भाजपसोबत असलेला घरोबा यामुळे कोरे यांनाही मंत्री पद मिळेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. अखेर मंत्री पदाच्या शर्यतीत मुश्रीफ आणि आबिटकर यांनी बाजी मारली आहे.
हसन मुश्रीफ यांची यशस्वी घौडदौड कायम

Advertisement

Advertisement

मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीस कागल पंचायत समिती सभापती व जिल्हा परिषद सदस्य म्हणून उल्लेखनीय काम केले. तर गेली अनेक वर्षे जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. 1999 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यावेळी त्यांना पधुसंवर्धन, दुग्धविकास खात्याचे राज्यमंत्री पद मिळाले. 2004 पासून शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय व विधी व न्याय राज्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला. त्यानंतर 2008 पासून नगरविकास, जमीन कमाल धारणा, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय, अल्पसंख्यांक विकास (औकाफसह) विधी व न्याय या खात्यांची धुरा सांभाळली. 2009 मध्ये विधानसभेवर तिसऱ्यांदा विक्रमी 46,412 मतांनी निवड झाल्यानंतर त्यांनी नगरविकास, कमाल जमीन धारणा, पशुसंवर्धन, दुग्ध्यविकास, मत्स्यव्यवसाय, अल्पसंख्याक विकास या खात्याचा राज्यमंत्री तसेच; कामगार व जलसंपदा या खात्याचा कॅबिनेटमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला. 2014 मध्ये त्यांची विधानसभेवर चौथ्यांदा आणि 2019 मध्ये विधानसभेवर सलग पाचव्यांदा आमदार म्हणून निवड झाली. यावेळी ते ग्रामविकास खात्याचे कॅबिनेट मंत्री झाले. त्यानंतर झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर 2 जुलै 2023 रोजी त्यांना पुन्हा वैद्यकिय शिक्षण व विशेष सहाय्य या खात्याचे कॅबिनेट मंत्री पद मिळाले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्येही शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांच्याविरोधात त्यांची चुरशीची लढत झाली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी मुश्रीफ यांना पराभूत करण्यासाठी केलेले भावनिक आवाहन आणि एकूणच तत्कालिन परिस्थिती पाहता मुश्रीफ यांच्यासमोर कडवे आव्हान होते. पण ‘पवार’ वस्तादांच्या तालमीत कुस्तीचे धडे घेतलेल्या मुश्रीफांनी घाटगेंचा मोठ्या मताधिक्यांनी पराभव करून थेट वस्तादांनाच आव्हान दिले.
आबिटकर यांची आमदारकीची हॅटट्रिक अन् कॅबिनेट मंत्री पदाची लॉटरी

राधानगरी विधानसभेला इतिहासाच प्रथमच आमदारकीची हॅट्ट्रिक केल्यानंतर आमदार प्रकाश आबिटकर यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. आबिटकर यांनी 33 व्या क्रमांकावर कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे प्रकाश आबिटकर यांच्या रुपाने प्रथमच राधानगरी मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. आबिटकर यांना कॅबिनेटची संधी देण्यात आल्याने तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द सुद्धा पूर्ण केला आहे. कोल्हापूरमधून राजेश क्षीरसागर आणि प्रकाश आबिटकर यांच्यामध्ये चुरस होती. मात्र आबिटकर यांनी बाजी मारली. मंत्री आबिटकर यांनी 1997 मध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीतून वयाच्या 21 व्या वर्षी राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली. गारगोटी पंचायत समिती गणातून त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि मोठ्या मताधिक्याने ते विजयी झाले. पुढे त्यांनी राधानगरी पंचायत समितीत उपसभापती म्हणूनही उत्कृष्ट काम केले. सन 2002 ते 2007 या दरम्यान कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून उल्लेखनीय कामगीरी केली. राधानगरी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी युवा संघर्ष नावाची संघटना स्थापन करून मतदार संघातील न्याय मागण्यांसाठी आंदोलने व मोर्चे काढले. जनतेच्या आग्रहामुळे 2009 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढविण्याचा त्यांनी निर्णय घेतला. या निवडणूकीमध्ये ते पराभूत झाले असले तरी त्यांना 36 हजारहून अधिक मते मिळाली. त्यानंतर 2014 ची विधानसभा निवडणूक त्यांनी शिवसेनेकडून लढवली. यावेळी माजी आमदार के.पी.पाटील यांचा दारूण पराभव करत त्यांनी 1 लाख 32 हजार 485 इतकी मते मिळवली. आणि 40 हजारहून अधिक मताधिक्याने निवडून आले. 2014 ते 2019 दरम्यान मतदारसंघातील विविध प्रश्न मार्गी लावल्यामुळे 2019 च्या निवडणूकीमध्ये पुन्हा एकदा बाजी मारून शिवसेनेचा गड राखण्याचे काम केले.
चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून जिह्याला तीन मंत्री पदे
कोल्हापूरचे माजी पालकमंत्री कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिह्यास तीन मंत्री पदे मिळाली आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या विकासाला एक नवी गती प्राप्त होणार आहे.

जिह्यातील रखडलेले प्रश्न मार्गी लागणार काय ?
मुश्रीफ आणि आबिटकर यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिह्यास दोन कॅबिनेट मंत्री पदे मिळाली आहेत. तसेच जिह्यातील सर्व दहा आमदार हे महायुतीचेच आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे रेंगाळलेले जिह्यातील प्रश्न पुढील पाच वर्षात तरी मार्गी लागणार काय ? असा जाणकार नागरिकांतून प्रश्न उपस्थित केला जात आहे. अंबाबाई व जोतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा, पंचगंगा प्रदुषण, महापूराचे संकट, क्षारपड जमिनीचा प्रश्न, आयटी पार्क उभारणे, खंडपीठ, दर्जेदार रस्ते, शैक्षणिक सुविधा, रोजगार निर्मीती आदी अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे.

Advertisement
Tags :

.