मुष्फिकर रहिम वनडेतून निवृत्त
वृत्तसंस्था/ढाका
बांगलादेशचा यष्टीरक्षक आणि फलंदाज 37 वर्षीय मुष्फिकर रहिमने वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करुन अनपेक्षित धक्का दिला आहे. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेश संघाचे आव्हान प्राथमिक फेरीतच समाप्त झाल्याने वनडे क्रिकेटमधून आपण निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे रहिमने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. मुष्फिकर रहिमने आपल्या गेल्या 19 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये दर्जेदार कामगिरी करत बांगलादेश संघाचा दर्जा सुधारण्यासाठी हातभार लावले आहेत. 20 वर्षांपूर्वी रहिमने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने 274 वनडे सामन्यात 36.42 धावांच्या सरासरीने 7795 धावा जमविल्या आहेत. बांगलादेशतर्फे वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा जमविणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रहिम दुसऱ्या क्रमांकावर असून बांगलादेशचा तमिम इक्बाल 8357 धावा जमवित पहिल्या स्थानावर आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यात रहिम केवळ दोन धावांवर बाद झाला होता. मुषफिकर रहिमने यापूर्वी टी-20 प्रकारातून तसेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. बांगलादेशतर्फे 100 कसोटी खेळणारा मुष्फिकर रहिम हा पहिला बांगलादेशीय क्रिकेटपटू आहे.