शेट्टींचा इतिहास माहीत असताना त्यांना महाविकास आघाडीत थारा देऊ नये : मुरलीधर जाधव
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज मुंबईत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. राजू शेट्टींची भेट ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाही तर लोकसभा निवडणुकीच्या जागा संदर्भात झाली, राजू शेट्टींचा पूर्व इतिहास माहीत असताना त्यांना आता महाविकास आघाडीत थारा देऊ नये असा आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी कोल्हापुरात केलं.
राज्यात महाविकास आघाडी आकाराला आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीचा एक भाग होती मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडीतील घटक पक्षांची धरसोड वृत्ती असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून स्वबळाचा नारा दिला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मातोश्रीवर जाऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव धरणातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या अदानींच्या प्रकल्पाला पाणी दिलं जाणार आहे, याला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध आहे, या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असल्याचं राजू शेट्टीने प्रसार माध्यमांना सांगितलं मात्र ही चर्चा राजकीय होती, स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून लढताना महाविकास आघाडीची ताकद लागणार आहे यामुळेच त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली मात्र आता राजू शेट्टींचा पूर्व इतिहास माहीत असतानाही त्यांच्यावर विश्वास ठेवू नये, राजू शेट्टी यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत असे टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी कोल्हापुरात केली तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी द्यावी अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली आहे.