भटकळातील मुरीनकट्टा वादाच्या भाेवर्यात
दोन्ही समाजाच्या नागरिकांमध्ये वादविवाद, शाब्दिक चकमकी : पोलिसांचा लाठीहल्ला
कारवार : अळवेकोडी येथील त्या भयानक दुर्घटनेने अकरा जणांचा बळी घेतल्यानंतर संपूर्ण भटकळ तालुका शोकसागरात बुडाला असताना आणि बकरी ईदचा सण तोंडावर आला असताना गेल्या दोन दिवसापासून धार्मिक तेढ निर्माण झाले आहे. भटकळ येथील राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 लगत असलेल्या मुरीनकट्ट्याची (देवाचाकट्टा) पुनर्बांधणी एका धर्माच्या लोकानी केली आहे. तर अन्य एका धर्माच्या काही नागरिकांनी या कट्ट्याची नासधूस केली आहे. परिणामी हा श्रद्धेचा कट्टा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काल रविवारी दोन्ही समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते. यावेळी वादविवाद शाब्दिक चकमकी झाल्या.
उपस्थित नागरिकांना घटनास्थळावरून पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला केला. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा अॅक्शन मोडवर आली आहे. वेगवेगळ्या कारणामुळे सातत्याने अतिसंवेदनशील बनून राहणाऱ्या भटकळमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासन प्रयत्नशील आहे. परिणामी आज सोमवारी मुरीनकट्टीच्या परिसरात बॅरिकेडस घालण्यात आले आहेत. परिस्थिती चिघळून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून भटकळ शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
पुढील तीन दिवस 144 कलम लागू
भटकळ शहराच्या व्याप्तीत आणि जाली नगर पंचायतीच्या व्याप्तीत आजपासून पुढील तीन दिवस 27 मे पर्यंत 144 कलम लागू करण्यात आला आहे. या प्रकरणाबदल समजलेली अधिक माहिती अशी भटकळ येथील राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 च्या बाजूला मुरीनकट्टे नावाचा देव आणि श्रद्धेचाकट्टा होता. काही महिन्यापूर्वी रस्ता रूंदी करणासाठी हा कट्टा हटविण्यात आला. तथापी काल रविवारी स्थानिकांनी या कट्ट्यांची पूनर्बांधणी केली. तथापी या कट्ट्याला अन्य धर्मीयांनी विरोध आणि आक्षेप व्यक्त केला. पुढे या कट्ट्यांची नासधूस करण्यात आली. त्यावेळी जमा झालेल्या दोन धर्मीयांच्या गटामध्ये मोठा राडा झाला. परिणामी नागरिकांना तेथून हटविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला केला.
पोलीस ठाण्याला घेराव
हिंदू संघटनांकडून पोलीस ठाण्याला घेराव घालून या घटनेचा निषेध करण्यात आला आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस अधिकारी भटकळात
दरम्यान भटकळ येथील प्रकरण चिघळू नये म्हणून पश्चिम विभागाचे आयजीपी अमीत सिंग आणि कारवार जिल्हा पोलीसप्रमुख दीपन एम. एन. भटकळात तळ ठोकून आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. विजयेंद्र यांनी या घटनेचा निषेध केला असून या घटनेला काँग्रेस सरकार जबाबदार असल्याची प्रतिक्रिया नोंदविली आहे. कारवारचे खासदार विश्वेश्वर हेगडे यांनीही या घटनेचा निषेध केला आहे.
100 हून अधिक जणांवर गुन्हे दाखल
भटकळ येथील मुरीनकट्टा (देवाचा कट्टा) नासधूस प्रकरणी 100 हून अधिक जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये 70 हून अधिक मुस्लीम बांधवांचा आणि 30 हून अधिक हिंदू बांधवांचा समावेश आहे. भटकळचे माजी आमदार सुनील नाईक यांच्यावरही पोलिसांनी प्रकरण दाखल केले आहे.