स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधमास नाट्यामयरीत्या अटक
उसाच्या फडातून धरपकड, आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न, खटला फास्ट टॅकमध्ये चालवण्याची आयुक्तांची माहिती
पुणे /मुंबई : प्रतिनिधी
स्वारगेट एसटी स्थानक परिसरात 26 वषीय तऊणीवर शिवशाही बसमध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला पुणे पोलिसांनी शिरूर परिसरात गुणाट गावच्या हद्दीतून गुरुवारी रात्री उशिरा नाट्यामयरीत्या अटक केली. श्वान पथकाचा माग, ड्रोनची नजर, सुमारे 500 पोलीस कर्मचाऱ्यांसह गावातील 400 ग्रामस्थांचे सहकार्य यातून आरोपीचे लोकेशन सापडल्यानंतर उसाच्या फडाजवळील कालव्याच्या ख•dयातून गाडे यास जेरबंद करण्यात आले. या घटनेनंतर आरोपीचे छायाचित्र माध्यमांतून प्रसिद्ध झाल्यानंतर त्याने गळफास घेऊन तसेच कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करून फास्ट ट्रॅक न्यायलयामध्ये केस चालवण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
आरोपी दत्तात्रय गाडे हा पुण्यातील शिरूर तालुक्यामधील त्याच्या गुणाट या गावी लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांची 10 पथके दत्तात्रय गाडेला अटक करण्यासाठी गुणाट गावात दाखल झाली. गुऊवारी दिवसभर दत्तात्रय गाडेचा गावातल्या उसाच्या फडात शोध घेण्याचे काम पोलिसांनी केले. पण, तो सापडत नव्हता. ड्रोनच्या माध्यमातूनही त्याचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, रात्र झाली आणि बिबट्यांचा वावर असल्याने कारवाई थांबवण्यात आली. अशातच रात्रीच्या सुमारास दत्तात्रय गाडे गावात एका नातेवाईकाकडे आला. तिथे त्याने आपल्याला खूप भूक आणि तहान लागल्याचे सांगितले. आपल्याला थोडे जेवण आणि प्यायला पाणी देण्याची मागणी त्याने केली. यावेळी नातेवाईकाने त्याला फक्त पाण्याची बाटली दिली. मात्र, याबाबतची माहिती त्यांनी लगेचच गावकऱ्यांना दिली. त्यानंतर संबंधित गावकऱ्यांनी लगेचच हे पोलिसांना कळवले. गाडे गावातल्याच उसाच्या शेतात जाऊन लपल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी या परिसराला वेढा घातला. ‘ड्रोननं तुझ्यावर लक्ष ठेवलं आहे. तू ताबडतोब जिथे आहेस तिथून बाहेर येऊन पोलिसांना शरण ये’, अशी घोषणा पोलिसांकडून ड्रोनच्या माध्यमातून केली गेली. त्यानंतर गाडे पॅनॉलच्या ख•dयातून बाहेर येऊन उभा राहिला आणि पोलिसांनी त्याला अटक केली, अशी माहिती समोर आली आहे.
आरोपी दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी
स्वारगेट बसस्टँड परिसरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला मध्यरात्री अटक करण्यात आली. शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी त्याला कोर्टात हजर केले असता, त्याला 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
एसटी स्थानकांचे सेफ्टी ऑडिट
याबाबत माहिती देताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, शहरातील महिला सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे. शहरातील विविध भागातील एसटी स्थानक येथील सेफ्टी ऑडिट केले जात आहे. मनपासोबत एकदा पुन्हा डार्क स्पॉट जागी लाईट खांब लावून गस्त वाढविण्यात येईल. महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात येईल. आरोपीचा शोध उशिरा लागला असला, तरी तक्रार आल्यावर याबाबत तपास तातडीने सुरू करण्यात आला. आरोपीबाबत सीसीटीव्ही तपासणी करून त्याची ओळख पटविण्यात आली. ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात पोलिसांना सहकार्य केले आहे. त्यामुळे स्वत: मी गावात जाऊन त्यांचा सन्मान करणार आहे.
आरोपीला कडक शिक्षा करण्यासाठी प्रयत्नशील : पोलीस आयुक्त
स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीला आम्ही सोडणार नाही. आरोपीला कठोरात कठोर कडक शिक्षा करण्याबाबत पोलिस प्रयत्नशील राहतील, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
अमितेश कुमार म्हणाले, पुणे पोलिस गुन्हे शाखा आणि स्वारगेट पोलिस यांच्यात कोणताही श्रेयवाद नाही. सर्व पोलिस यंत्रणा तपासात सक्रिय होत्या. तीन दिवस रात्रंदिवस पोलिस अधिकारी आणि कर्मचारी काम करत होते. त्यामुळे हे एकत्रित ऑपरेशन होते. आरोपीबाबत तक्रार आल्यावर तातडीने त्याचे नाव निष्पन्न करण्यात आले. त्यानंतर त्याचा माग काढून त्याला अटक करण्यात आली.
माहिती देणाऱ्या ग्रामस्थाला बक्षीस, गावासाठीही काहीतरी करणार
ग्रामस्थ आणि पोलिस एकत्रित काम करत होते. गावात नाकाबंदी करण्यात आली. त्यामुळे आरोपीला गावाबाहेर पडणे शक्मय झाले नाही. ज्या ग्रामस्थाने आरोपीबाबत माहिती दिली, त्याला एक लाखाचे बक्षीस देण्यात येईल. गावासाठीदेखील काही देता येईल का, याबाबत आम्ही विचार करू.
आरोपीविरोधात पाच गुन्हे
22 जानेवारी 2024 रोजी आरोपीविरोधात एक गुन्हा स्वारगेट पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. त्यापूर्वी 2019 मध्ये त्याच्यावर पाच चोरीचे गुन्हे अहिल्यानगर आणि पुणे येथे दाखल आहेत. ज्यांच्यावर बलात्कार आणि विनयभंग गुन्हे दाखल आहेत, त्यांचे रेकॉर्ड करून त्याबाबत पोलीस देखरेख सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
सार्वजनिक ठिकाणी गस्त वाढवणार
सार्वजनिक ठिकाणी पोलिस गस्त वाढवली जाईल. बस स्थानकात जे अवैध गैरप्रकार सुरू आहेत, त्याबाबत आढावा घेऊन त्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही पोलीस आयुक्तांनी या वेळी दिली.
गंभीर घटनांवर बोलताना मंत्र्यांनी संवेदनाशीलता बाळगावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला
पुण्यात स्वारगेट बसस्थानकात युवतीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी गफहराज्यमंत्री योगेश कदम आणि राज्याचे वस्त्राsद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर विरोधी पक्षाकडून जोरदार टीका होत आहेच, पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही मंत्र्यांना घरचा आहेर दिला आहे. अशा प्रकारच्या गंभीर आणि संवेदनशील प्रकरणात बोलताना मंत्र्यांनी संवेदनशीलता बाळगावी, असा सल्ला फडणवीस यांनी दिला आहे. याविषयी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंत्री योगेश कदम जे बोलले ते वेगळ्या पद्धतीने घेतले गेले. घटना घडली ते ठिकाण वर्दळीचे होते, बस आत नव्हती तर बाहेर होती, त्यानंतरही प्रतिकार न झाल्यामुळे अशी एखादी घटना घडल्याचे लोकांना समजले नाही, असे सांगण्याचा प्रयत्न कदम करत होते. मात्र त्यांनी अशा प्रकरणांत बोलताना संवेदनशीलता बाळगली पाहिजे. कारण, बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाजमनावर परिणाम होतो. त्यामुळे मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांनी संवेदनशीलतेने बोलावे असा माझा सल्ला आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आरोपीला अटक झाली आहे. तो लपून बसला होता. त्याला वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करुन अटक केली आहे. या घटनेचा जो काही पर्दाफाश करायचा आहे तो लवकारत लवकर केला जाईल. त्यासंदर्भात पोलीस कमिशनर यांनी माहिती दिली आहे. मात्र या स्टेजला ही माहिती समोर आणणे योग्य राहणार नाही. योग्य वेळी आली की सांगितली जाईल, असे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले.