ज्योतिषाशी असलेल्या अनैतिक संबंधातून खून
मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या मोठ्या भावाचा बळी : चाकूहल्ल्यात दोघे जखमी
कारवार : चाकूने केलेल्या खूनी हल्ल्यात एक ठार तर अन्य दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री सिद्धापूर तालुक्यातील अवरगुप्पा येथे घडली. शिमोगा जिल्ह्यातील प्रसिद्ध ज्योतिष कमलाकर भट यांचे विवाहित महिलेशी असलेले अनैतिक संबंध या घटनेचे मूळ कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. खूनी हल्ल्यात वसंत जट्या नाईक (वय 41) याचा मृत्यू झाला. तर महेश जट्या नाईक (वय 37) आणि कुमार नाईक (वय 35) हे जखमी झाले. या प्रकरणी सिद्धापूर पोलिसांनी महेश यांची पत्नी सुचित्रा, तिचे वडील लोकनाथ चौडप्पा नाईक, कमलाकर भट आणि अन्य चौघे अशा एकूण सात जणांना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणाची कारवार जिल्हा पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली असून मंगळूरचे आयजीपी. अमित सिंग आणि कारवार जिल्हा पोलीस प्रमुख दीपन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सिद्धापूर तालुक्यातील अवरगुप्पा येथील महेश नाईक याचा प्रेमविवाह शिमोगा जिल्ह्यातील सुचित्रा हिच्याशी 20 वर्षांपूर्वी झाला होता. या दाम्पत्याला दोन मुली आहेत. महेश रोजगाराच्या निमित्ताने बेंगळूरला गेला होता. त्यामुळे सुचित्रा आपल्या दोन मुलींसह अवरगुप्पा येथे राहत होती. दरम्यान, सुचित्रा सहा महिन्यांपूर्वी रोजगाराच्या निमित्ताने ज्योतिष कमलाकर भट यांच्या घरी राहू लागली.
तिचे कमलाकर भट यांच्याशी सुत जुळले. ज्योतिषानेही सुचित्रासोबत दुसरा संसार थाटल्याचे सांगण्यात आले. दरम्यान सुचित्राच्या एका मुलीला आपल्या आईने ज्योतिषाशी प्रस्थापित केलेले अनैतिक संबंध रुचले नाही. मुलीने वडील महेश यांच्याशी संपर्क साधून आमची या नरकातून सुटका करा. आम्हला वाचवा, अशी विनंती केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महेशने मुलगी सुमश्री हिला बसने शिमोग्याहून अवरगुप्पा येथे येण्यास सांगितले. त्यानुसार सुमश्रीने अवरगुप्पा गाठले. आपली मुलगी अवरगुप्पा येथे गेली आहे असे समजताच सुचित्रा, तिचे वडील काशीनाथ नाईक, कमलाकर भट आणि अन्य चौघे भट यांच्या वाहनातून अवरगुप्पा येथे आले.
संपवायचे होते लहान भावाला,बळी गेला मोठा भावाचा
महेश यांच्या घरात विविध विषयांवरून महेश आणि शिमोगाहून सुचित्रासह आलेल्या सात जणांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्या. चकमकीचे पर्यवसन हाणामारीत झाले. त्या सात जणांकडून महेशवर चाकूहल्ल्याचा प्रयत्न झाला. याचवेळी महेशचा मोठा भाऊ वसंत व त्यांचा शेजारी कुमार हे मध्यस्थीसाठी धावून गेले. त्यावेळी वसंत व कुमार यांच्यावरही चाकूने हल्ला करण्यात आला. चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वसंतला उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. जखमी महेश व कुमार यांना उपचारासाठी शिमोगा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. चाकूहल्ला प्रकरणी सिद्धापूर पोलिसांनी सुचित्रा, ज्योतिषासह 7 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.