Satara Crime : सस्तेवाडीत शिकारीच्या कारणावरून खून..!
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार तासांत आरोपींची अटक
फलटण: सशाच्या शिकारीच्या कारणावरून झालेल्या वादात डोक्यात काव्या व रॉडने मारहाण केल्याने चाळीस वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना सस्तेवाडी, ता. फलटण गावच्या हद्दीत लोंढे वस्ती नजीक घडली
या घटनेनंतर सदर प्रकरणाला अपघाताचे स्वरूप देऊन अपघातात संबंधित इसमचा मृत्यू झाल्याच्या बनाव या घटनेतील संशयित आरोपीकडून करण्यात आला होता परंतु पोलिसांच्या चाणक्षपणामुळे खुनाचा प्रकार उघडकीस आला. या घटनेतील दोघे संशयित परराज्यात पलायनाच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.
गणेश बाळु मदने (क्य ४०, रा. सस्तेवाडी, ता. फलटण) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. या प्रकरणी रोडन कैलास पवार (वय २०, रा. सोमवार पेठ, फलटण) व गणेश शंकर जाधव (वय २२, सध्या रा. सोमवार पेठ, फलटण मूळ रा. कलिना, मुंबई) असे या घटनेतील अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सस्तेवाडी, ता. फलटण गावचे हद्दीत लोंढेवस्ती नजीक फलटण रोडवर गणेश बाळु मदने याचा अपघातात होऊन त्यात दुखापत झाल्याने ते मयत झाल्याची खबर उपजिल्हा रुग्णालय, फलटण यांच्याकडुन ग्रामीण पोलीस ठाण्यास प्राप्त झाली. यानंतर फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे सदर मयताची नोंद अकस्मात मयत अशी करण्यात आली.
या नंतर पोलीसांनी तत्काळ घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांना घटनास्थळावर रक्ताचे थारोळे दिसून आले त्याचबरोबर मयत गणेश मदने यांची मोटार सायकल साईड स्टॅण्डवर फलटणकडे तोड करुन सुस्थितीत उभी असल्याचे व तिच्या स्विचलाच चावी असल्याचे पोलीसांना दिसुन आले. ही विसंगत बाब हेरुन पोलीसांनी मदने यांच्या नातेवाईकांकडे विचारपूस केली असता त्यांना मयत गणेश मदने यांचे शेतात काही वेळापुर्वी ससे पकडण्यासाठी आलेल्या दोन अनोळखी इसमांबरोबर भांडण झाल्याचे समजले.
सदरची घटना ही मध्यरात्रीच्या सुमारास निर्जनस्थळी घडल्यामुळे तांत्रिक तपासास मर्यादा येत होत्या.तरी देखील तुटपुंज्या माहितीच्या आधारे फलटण ग्रामीण पोलीसांनी तपासाची दिशा निश्चित करून मिळालेली गोपनीय माहिती व परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे अवघ्या चार तासांमध्ये या घटनेतील परराज्यात पलायनाच्या तयारीतअसलेल्या दोघा संशयितांना अटक केली. मदने यांना डोक्यात काठी व रॉडने मारहाण झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप जगताप हे करीत आहेत.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक वैशाली कडुकर, उपअधिक्षक विशाल खांबे, फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांचे मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शिवाजी जायपत्रे, गुन्हे प्रकटीकरणचे दिपक पवार, उपनिरीक्षक मच्छिंद्र पाटील, ज्योती चव्हाण आदींनी केली.