पाकिस्तानात अंडरवर्ल्ड डॉन अमीर बलाज टीपूची हत्या
विवाहसोहळ्यादरम्यान गोळी लागल्याने मृत्यू
वृत्तसंस्था/ लाहोर
पाकिस्तानच्या लाहोरमध्ये अंडरवर्ल्ड डॉन अमीर बलाज टीपूची हत्या करण्यात आली आहे. एका विवाहसोहळ्यात त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यादरम्यान हल्लेखोरही मारला गेला आहे. अमीर बलाज टीपू हा मालवाहतूक नेटवर्कचा मालक होता. अमीरचा लाहोरसोबत पूर्ण पाकिस्तानात दबदबा होता. त्याचे वडिल आरिफ अमीर आणि आजोबा बिल्ला ट्रकानवाला देखील गँगस्टर होते. 2010 मध्ये त्याच्या वडिलांची देखील गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
एका हल्लेखोराने लाहोरच्या चुंग भागात विवाह सोहळ्यादरम्यान बालाज टीपूवर गोळ्या झाडल्या. दोन अन्य लोकांनाही गोळी लागली होती. अमीर हा स्वत:सोबत नेहमीच सुरक्षारक्षक बाळगत होता. हल्लेखोराकडून गोळीबार झाल्यावर या सुरक्षा रक्षकांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत हल्लेखोर मारला गेला आहे.
अमीर बालाज टीपूला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे बालाजीचा मृत्यू झाल्याने त्याचे समर्थक रुग्णालयाबाहेर मोठ्या संख्येत जमा झाले. लाहोरमध्ये झालेल्या या घटनेनंतर पाकिस्तान पोलिसांनी संबंधित परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला. पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कुणालाच अटक केलेली नाही