For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

12:06 PM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून
Advertisement

भिंतीची डागडुजी व छप्पराची दुरूस्ती न केल्याने खून : एकाच घरात दोन खोल्यांमध्ये राहत होते मामा, भाचे

Advertisement

फोंडा : सांताव्रुझ-फोंडा येथे मामाने आपल्या भाच्याचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार काल सोमवारी सायंकाळी उघडकीस आला. अविनाश धनंजय गुरखा उर्फ नाईक (42, सांताव्रुझ फोंडा) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. घटनेनंतर काहीच न घडल्यासारखे घरात दडून बसलेला मामा कृष्णा सदाशिव नाईक (67) याला फोंडा पोलिसांनी भा.द.सं.च्या 302 कलमाखाली गुन्हा नोंदवून अटक केली आहे. सांताव्रुझ येथील साऊथ इंडियन बंकेजवळील मुख्य रस्त्यापासून 100 मीटर अंतरावर हा प्रकार घडला. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मामा आणि भाचा दोघेही सांताव्रुझ येथील आपल्या वडीलोपार्जित घरी राहत आहेत. एकाच घरात वेगवेगळ्या दोन खोल्यांमध्ये वास्तव्यास होते. मामा आपल्या पत्नीसोबत तर भाचा अविवाहित आहे. त्याची आई तीन वर्षापासून बहिणीच्या घरी राहत असल्यामुळे तो खोलीत एकटाच राहत असे. मामाच्या खोलीला लागून असलेली भिंत मातीची असल्याने पावसाळ्यात ती कोसळण्याची भिती होती. त्यामुळे पत्र्याचे छप्पर उभारण्याचा तगादा मामाने लावला होता. यावरून मामा भाच्याचे अनेकवेळा खटके उडत असत. मामा दारूच्या नशेतही कधीकधी भांडण करत असे. रविवारी रात्री सुमारे 12 वाजता दोघांचेही याच कारणावरून कडाक्याचे भांडण झाले होते. यात मामाने मोडलेल्या भिंतीचा चिरा अविनाश याच्या डोक्यावर घातला आणि तो गतप्राण झाला. त्यानंतर मामा मामीसह आपल्या खोलीत झोपी गेला. सकाळी, दुपारपर्यंत भाच्याला जाग आली नसल्याने मामीने मयत अविनाशच्या बहिणीला फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर हा खुनाचा प्रकार उघडकीस आला.

कोसळलेल्या भिंतीची दुरूस्ती, छप्पराची डागडुजी ठरले खुनाचे कारण

Advertisement

मयत अविनाश याचे वडील धनंजय गुरखा (मूळ नेपाल) व त्याच्या आईचा प्रेमसंबंधातून विवाह झाला होता. अविनाश लहान असताना वडिल वारले होते. त्यानंतर त्याची आई आपल्या तिघां मुलांसह काही काळ फेंड्यात अन्य ठिकाणी भाड्याच्या खोलीत राहत असे. त्यानंतर ती आपल्या भावाच्या घरी वास्तव्यात आली होती. कोविडकाळात अविनाशची आई आजारी पडल्यामुळे अविनाशच्या विवाहित बहिणीने तिला आपल्या घरी सावईवेरे येथे नेले होते. मामाच्या घरातील एका खोलीत अविनाश एकाकी आयुष्य जगत होता. दोन्ही वेळचे जेवण हॉटेलवर खाऊन मिळेल ते काम करीत आपली गुजराण करीत असे. खोलीची कोसळलेली भिंत दुरूस्ती करण्याचा तगादा मामाने लावला होता. घटनेच्या दिवशी आज पत्रे आणून छप्पराची दुरूस्ती करणार असा शब्द अविनाशने मामाला दिला होता. तो न पाळल्याने मामाचा राग अनावर झाला होता. त्या रागाच्या भरात मामाने भाच्याला अद्दल घडविण्यासाठी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा अंदाज फोंडा पोलिसांनी व्यक्त केला आहे.

खून करण्यात वापरलेले दगड व घटनास्थळावरील नमूने जप्त

याप्रकरणी मयताच्या बहिणीने रितसर तक्रार फोंडा पोलीस स्थानकात केल्यानंतर पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यानी घटनास्थळी पंचनामा केला. संशयिताने खून करण्यात वापरलेले चिऱ्याचे तुकडे अन्य दगड जप्त करण्यात आले आहे. फॉरेन्सिक टिमने हत्यार व घटनास्थळावरील नमूने गोळा केले. त्यानंतर संशयित कृष्णा नाईक याला फोंडा पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक सुनिता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर अधिक तपास करीत आहे.

Advertisement
Tags :

.