For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कसयले तिस्क-उसगांव येथे बेपत्ता मुलीचा खून

11:47 AM Mar 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
कसयले तिस्क उसगांव येथे बेपत्ता मुलीचा खून
Advertisement

शेजाऱ्याच्या घराजवळ पुरला होता मृतदेह : संशयित म्हणून शेजारच्या पती-पत्नीला पोलिसांनी घेतले ताब्यात

Advertisement

फोंडा : कसयले, तिस्क-उसगांव येथे बेपत्ता झालेल्या एका 4 वर्षीय चिमुकल्या गेंडस मुलीचा निघृण खून करून घराशेजारी मृतदेह दफन केल्याची ह्दयद्रावक तसेच खळबळजनक घटना काल गुरूवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. अमायरा असे मृत बालिकेचे नाव आहे. याप्रकरणी मुख्य संशयित म्हणून शेजारच्या पती-पत्नीला फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पप्पू अलहड (52) व पूजा अलहड (40) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. अमायरा ही बुधवारी दुपारनंतर आपल्या आजीच्या घरातून बेपत्ता झाली होती.

फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमायरा ही 4 वर्षाची मुलगी आपली आई व लहान बहिणीसमवेत आपल्या आजीच्या घरात राहत असे. तिचे वडील रत्नागिरी येथे राहतात. अमायराच्या आई वडीलांमध्ये संबंध बिघडल्याने काही दिवसापासून अमायराची आई दोन्ही मुलांसमवेत रत्नागिरीहून आपल्या आईच्या घरी कसयले-उसगांव येथे राहत होती. दरम्यान मागील काही दिवसांपुर्वी तिचा पती कसयले येथे येऊन गेल्याची माहिती प्राप्त झालेली आहे.

Advertisement

कसयले-उसगांव हा फोंडा तालुक्यातील झोपडपट्टीसदृष्य भाग म्हणून प्रसिद्ध आहे. दाट लोकवस्तीचा परिसरात बहुतेक बिगरगोमंतकीयांचा भरणा आहे.  अमायरा राहत असलेल्या आजीच्या घरापासून 50 मिटर अंतरावर तिचा मृतदेह दफन केलेल्या अवस्थेत संशयिताच्या घरी आढळला. आश्चर्याची बाब म्हणजे मुलीच्या हत्येनंतर एखाद्या चित्रपटाला साजेसा क्लायमेक्स दोघांही संशयिताने तयार केला. प्रथम मुलीला संधी साधून गायब केले. त्यानंतर तिची हत्या करून तिला आपल्याच घराशेजारी दफन केले. त्यानंतर शोधमोहीमेत स्वत: सहभाग घेत काहीच न घडल्यासारखा आव आणीत वावरत राहून पिडीत कुटुंबियांना सहानुभूती दाखविण्याचाही प्रयत्न केला. शेजारच्या सीसीटीव्हीमुळे हत्येचा प्रकार उघडीस आला.

पोलिसांनी गाठले सुतावरून स्वर्ग 

मयत मुलीची आई आपल्या 1 वर्षीय लहान मुलीला घेऊन इस्पितळात नातेवाईकांची विचारपूस करण्यासाठी गेली होती. अमायरा मोबाईल घेऊन खेळत होती. त्यानंतर आजी कामाला गेली. अमायरा एकटीच घरात राहिली. हाच डाव साधून संशयित पूजा अलहड हिने अमायराच्या हातात धरून तिला आपल्या 50 मिटरवर असलेल्या घरात नेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बंदिस्त झालेले आहे. बुधवारी दुपारी अमायरा बेपत्ता झाल्याची वार्ता परिसरात पसरल्यानंतर सर्वत्र शोधाशोध सुरू होती. त्यावेळी संशयित म्हणून अटक केलेला पप्पूही शोधमोहिमेत सहभागी झाला होता. ‘दृष्यम’ चित्रपटासारखी चलाखी दोघांही संशयितानी करून केली आणि काहीच न घडल्यासारखे पोलिसांना व येथील ग्रामस्थांना दाखविले.

मिरज येथे पलायनाचा बेत फसला 

पप्पू व पूजा या दांपत्याला मूल नाही. त्यामुळे ती अनेक ठिकाणी उपचार व  देवकृत्य करीत असल्याची माहिती येथील लोकांकडून पोलिसांना प्राप्त झाली. घटनेच्या दिवशी पप्पू जिथे काम करतो तेथून त्याने आपल्या पत्नीला उपचारासाठी मिरज येथे घेऊन जाणार होता. पोलिसांनी वेळीच तपासकामात मिळवलेल्या गतीमुळे त्याचा बेत फसला व दोघेही मास्टरमाइड पोलिसांच्या तावडीत सापडले.

निष्पाप मुलीचा बळी का घेतला?

पप्पू व त्याची पत्नी यांचे श्वानप्रेम या भागात सर्वांना परिचित आहे. पप्पू रोज 10-15 भटक्या कुत्र्यांना चिकन, मटनसह अन्न देत होता. नित्यनेमाने हे कृत्य करीत होता. भुतदया दाखविणाऱ्या अशा दांपत्यांनी एका निष्पाप बालिकेचा बळी घेतल्याचा प्रथमदर्शनी कुणाला विश्वासच बसला नाही. मात्र पोलिसांकडून संशयाची सुई जेव्हा या घराच्या दिशेने फिरली त्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. घराशेजारील पाठीमागील जागेत दफन करून त्यावर प्लास्टिक आच्छादन टाकण्यात आले होते. पोलिसांना घरात प्रवेश करताच मानवी रक्ताचा सड्याप्रमाणे वास आल्याने संशय पक्का झाला. त्यानंतर घरात व बाजूला शोधाशोध केल्यानंतर दफन केलेल्या अवस्थेत हात व डोक्याचा भाग निदर्शनास आला. त्यानंतर पुढील सोपस्कर पूर्ण करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकमसिंह वर्मा, उपअधीक्षक शिवराम वायंगणकर यांनी घटनास्थळी भेट घेतली. दफन केलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाची पुढील प्रक्रिया करण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांची संमती आवश्यक असल्याने काल उशिरा रात्रीपर्यंत मृतदेह त्याच स्थितीत होता. उशिरा रात्री उपजिल्हाधिकारी शुभम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली, फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून दफन केलेला मृतदेह बाहेर काढला, सर्व नमूने गोळा केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगांव येथील जिल्हा इस्पितळात पाठविण्यात आला. शवचिकित्या अहवालानंतर मृत्यू नेमका कसा झाला याचा उलगडा होणार आहे. प्रथमदर्शनी अपहरण गुन्हा संशयिताविरोधात नोंद केला आहे. हत्येप्रकरणी कसून चौकशी फोंडा पोलिस स्थानकाचे निरीक्षक करीत आहे.

Advertisement
Tags :

.