Kolhapur Crime : कंक दाम्पत्याचा खूनच, सराईत गुन्हेगार जेरबंद
शाहूवाडीतील दुहेरी हत्येचा उलगडा; सराईत गुन्हेगार विजय गुरव अटकेत
शाहूवाडी : शाहूवाडी तालुक्यातील निनू यशवंत कंक (वय ७०), त्यांच्या पत्नी रखुबाई निनू कंक (वय ६५) या दाम्पत्याचा सराईत गुन्हेगार विजय मधुकर गुरव (वय ३५ रा. शिरगांव ता. शाहूवाडी) याने लाकडी दांडक्याने व दगडाने ठेवून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने विजय गुरव याच्या मुसक्या आवळल्या असून शनिवारी त्याला अटक केली. दरम्यान हा खून लुटीच्या इराद्याने केला की जेवण न दिल्याच्या रागातून केला याचा तपास अद्याप सुरु आहे.
कडवी (ता. शाहूवाडी) धरण पाणलोट क्षेत्रातील गोलीवणे वसाहत येथे रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास निनू यशवंत कंक (वय ७०), त्यांच्या पत्नी रखुबाई निनू कंक (वय ६५) या दोघांचे संशयास्पद मृत्यू झाला होता . झोपडीवजा घरापासून २० मीटर अंतरावर रखुबाई यांचा तर पाण्यामध्ये निनू कंक यांचा मृतदेह आढळून आला होता. रविवारी सकाळी त्यांचा मुगला सुरेश कंकज दिवाळीसाठी आई-वडीलांना घरीच आणण्यासाठी गेला असता या घटनेचा उलगडा झाला.
पहिल्यांदा बिबट्या सदृश्य वन्य प्राण्याच्या हल्ल्यामध्ये या दोघांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र वनविभागाच्या चौकशीनुसार कोणत्याही बन्य प्राण्याकडून हा हल्ला झाला नसल्याचे समोर आले होते.यानंतर या दोघांचा घातपात झाला काय या दृष्टीने पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान केली. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक १७ऑक्टोबरपासून (शुक्रवार) मलकापूर, आंबा, निनाई परळे परिसरात ठाण मांडून होते. शवविच्छेदनामध्ये कंक दांम्पत्याचा मृत्यू गुरुवारी सायंकाळच्या सुमारास झाल्याची माहिती समोर आली होती. दोघांचेही मृतदेह सडण्यास सुरुवात झाल्यामुळे तपासात अडथळे निर्माण झाले होते.
मात्र पोलिसांनी या घटनेचा सर्व शक्यता गृहीत धरुन तपास सुरु केला. निनू कंक यांचा मृतदेह पाण्यात तर रखुबाई कंक यांचा मृतदेह झोपडीशेजारीच पडला होता. घटनास्थळावर झटापट झाल्याच्या पुरावे पोलिसांना मिळाले होते. यानंतर या परिसरातील फार्महाऊसवरील सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना हा खून सराईत गुन्हेगार विजय गुरव यानेच केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर तपास पथकाने तपासाची चक्रे गतीमान करत शुक्रवार (३१ ऑक्टोबर) रोजी ताब्यात घेतले.
गुरुवारीच केला खून
निनू कंक व रखुबाई कंक या राहत असलेल्या परिसरात विजय गुरव हा दोन दिवसांपासून फिरत होता. या परिसरातील एका फार्महाऊसच्या सिसीटीव्हीमध्ये विजय गुरव स्पष्टपणे दिसत होता. त्याने गुरुवारी (१६ ऑ क्टोबर) रोजी खून करुन तेथून पळ काढल्याचेही दिसत होते. गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास विजय गुरव व कंक दांम्पत्यामध्ये वाद झाला. यातूनच विजयने लाकडी दांडक्याने व दगडाने ठेवून हा खून केल्याचे समोर आले आहे.
बिबट्याचा हल्ला भासविण्याचा प्रयत्न ?
दरम्यान कंक दांम्पत्याचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याचे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र हा प्रयत्न अयशस्वी झाला. पोलिसांनी अत्यंत शिताफीने व शांत डोक्याने तपास करुन विजय गुरवच्या मुसक्या आवळल्या.
विजय गुरव सराईत गुन्हेगार
विजय गुरव हा सराईत गुन्हेगार आहे. तो अत्यंत शांत डोक्याने चोरीच्या घटना करत असतो. त्याच्यावर २०१४ मध्ये सांगली येथे खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये २० मोटारसायकलचोरीचे गुन्हे दाखल आहेत. शाहूवाडी पोलीस ठाण्यातही त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असून तो पसार होता.