कटकोळमधील वृद्धाच्या खुनाचा पर्दाफाश
सुपारी देऊन टोळक्याकडून खून
बेळगाव : वृद्धाचा खून करून तो अपघात भासवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. अडीच लाखांची सुपारी घेऊन या चौकडीने वृद्धाचा काटा काढल्याचे उघडकीस आले आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सोमवारी पत्रकारांना ही माहिती दिली आहे. शंकर जाधव (वय 26) रा. कटकोळ, सुलतान किल्लेदार (वय 43), राहुल बागेवाडी (वय 27) दोघेही राहणार चिकोडी, टिप्पू मुजावर (वय 32) रा. निपाणी अशी अटक करण्यात आलेल्या चौघा जणांची नावे आहेत. रामदुर्गचे पोलीस निरीक्षक आय. आर. पट्टणशेट्टी, कटकोळचे पोलीस उपनिरीक्षक बसवराज कोण्णूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
कटकोळ येथील 7 एकर 2 गुंठे जमिनीसाठी हा खून झाला आहे. सन्नरामप्पा अतार (वय 65) रा. कटकोळ या वृद्धाचा 25 फेब्रुवारी 2025 रोजी खून करून कटकोळपासून जवळच त्याचा अपघात भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सन्नरामप्पाच्या कुटुंबीयांनीही घातपाताचा संशय व्यक्त केला होता. शवचिकित्सा अहवालातही खून झाल्याचे उघड झाले आहे. जमीन वादातून सन्नरामप्पाचा खून करण्यासाठी चिकोडी-निपाणीतील टोळीला अडीच लाखांची सुपारी देण्यात आली होती. यापैकी दीड लाख रुपये या चौकडीला पोहोचविण्यात आले होते. पैसे घेतल्यानंतर दोन ते तीनवेळा सन्नरामप्पावर खुनी हल्ल्याचा प्रयत्नही झाला आहे. चौघा जणांना अटक करून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्याचेही जिल्हा पोलीसप्रमुखांनी सांगितले.