लग्नासाठी घाई करणाऱ्या तरुणाचा खून
कित्तूर तालुक्यातील चिक्कनंदिहळ्ळी येथील घटना
बेळगाव : नशेत गोंधळ घालणाऱ्या लहान मुलाचा वडिलांनी मोठ्या मुलाच्या मदतीने विटेने ठेचून खून केला आहे. चिक्कनंदिहळ्ळी (ता. कित्तूर) येथे शनिवारी रात्री ही घटना घडली असून कित्तूर पोलिसांनी या प्रकरणी दोघा जणांना अटक केली आहे. कुटुंबीय लवकर लग्न लावून देत नाहीत म्हणून तो तरुण नशेत गोंधळ घालत होता. यामुळे त्याचा खून करण्यात आला आहे. मंजुनाथ नागाप्पा उळागड्डी (वय 25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील नागाप्पा गुरुबसाप्पा उळागड्डी (वय 63) व मोठा भाऊ गुरुबसाप्पा नागाप्पा उळागड्डी (वय 28, दोघेही रा. चिक्कनंदिहळ्ळी) यांनी हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे.
कित्तूर पोलिसांनी या पिता-पुत्राला अटक केली आहे. घटनेची माहिती समजताच बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक, कित्तूरचे पोलीस निरीक्षक शिवानंद गुडगनट्टी, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. मंजुनाथच्या मृतदेहावर रविवारी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. उपलब्ध माहितीनुसार मंजुनाथच्या प्रेमप्रकरणाला कुटुंबीयांचा विरोध होता. मनात नसतानाही आई-वडिलांनी ज्या तरुणीवर तो प्रेम करीत होता तिच्यासोबत लग्न करायला होकार दिला होता.
एक वर्षापूर्वी मोठा मुलगा गुरुबसाप्पा व लहान मुलगा मंजुनाथ या दोघा जणांचे लग्न ठरविण्यात आले. साखरपुडाही झाला. त्यानंतर मोठ्या मुलाचे लग्न झाले. मंजुनाथचे लग्न व्हायचे होते. साखरपुडाहून वर्ष उलटला माझे लग्न कधी करणार? अशी विचारणा करीत मंजुनाथ आई-वडिलांशी भांडत होता. याच मनस्तापातून त्याला दारुचे व्यसन जडले. नशेत येऊन भांडण काढू लागला. शनिवार दि. 8 मार्च रोजी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास मंजुनाथ नशेत घरी पोहोचला. लग्नाच्या मुद्यावर आई-वडिलांची जोरात भांडू लागला. त्यावेळी त्याचे वडील व मोठ्या भावाचा राग अनावर होऊन मंजुनाथला मारहाण केली. जवळच असलेला दगड व विठा घेऊन त्याच्या डोक्यावर, नाका-तोंडावर हल्ला करण्यात आला. हल्ल्यात मंजुनाथचा मृत्यू झाला.