वसती शाळेत विद्यार्थ्याचा खून
बळ्ळारी येथील घटना : वॉर्डनसह 7 जखमी, दोघे गंभीर, वर्गमित्राकडूनच हल्ला
प्रतिनिधी/ बेंगळूर
विद्यार्थ्याने त्याच्या वर्गमित्रांवर लोखंडी रॉड, स्क्रूड्रायव्हर आणि चाकूने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला तर वॉर्डनसह सात जण जखमी झाले आहेत. बळ्ळारी येथील गुऊकुल वसती शाळेत शनिवारी रात्री ही घटना घडली. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. हल्ला करणारा विद्यार्थ्याने घटनास्थळावरून पलायन केले आहे. जखमी विद्यार्थ्यांसह संशयित विद्यार्थी हे सर्व गुऊकुल वसती शाळेत नववी वर्गात शिकत होते. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव हेमंत असून तो आंध्र प्रदेशातील आदवानी येथील रहिवासी आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, जेवणानंतर सर्व विद्यार्थी वसतिगृहात झोपले होते. या प्रकरणातील संशयित विद्यार्थ्याचे इतरांसोबत क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते. परिणामी, संशयिताने शनिवारी रात्री त्याच्या वर्गमित्रांवर सोफा रॉड, स्क्रूड्रायव्हर आणि रेडियम कटर, चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात हेमंत गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी ऊग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
विद्यार्थ्यांचा गोंधळ पाहून वसतिगृहातील महिला वॉर्डन घटनास्थळी आल्यानंतर संशयित विद्यार्थ्याने त्यांच्यावरही हल्ला केला. या विद्यार्थ्याने केलेल्या हल्ल्यात वसतिगृहातील महिला वॉर्डनसह 7 विद्यार्थी जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. जखमी विद्यार्थी आणि वॉर्डनला बळ्ळारी येथील विम्स ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बळ्ळारी येथील ब्रुसपेट पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. मृतदेह विच्छेदनासाठी बळ्ळारी मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटरमध्ये पाठवण्यात आला आहे.
घटनास्थळी पालकांचा आक्रोश
संशयित विद्यार्थ्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हेमंतच्या पालकांना मोठा धक्का बसला असून घटनास्थळी एकच आक्रोश केला. या घटनेबद्दल विम्स ऊग्णालयाजवळ माध्यमांशी बोलताना मृत मुलाचे वडील लक्ष्मीकांत म्हणाले, आम्हाला रात्री उशिरा वसतिगृहातून फोन आला. तुमचा मुलगा गंभीर जखमी असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. आम्ही ताबडतोब आदवानीहून बळ्ळारीला आलो, असे सांगितले. वसती शाळेत घडलेल्या या घटनेने जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांना धक्का बसला आहे. या घटनेचे कारण आणि आरोपी विद्यार्थ्याने त्याच्या वर्गमित्रांवर हल्ला का केला याचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे.