प्रियकराकडून विवाहित प्रेयसीचा खून
मरोल येथील घटना : सतर्कतेमुळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात
वार्ताहर/विजापूर
दुसरे लग्न करण्यास अडथळा ठरत असल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्या विवाहित प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मरोल ता. हुनगुंद गावातील शेतात घडली आहे. एवढ्यावरच न थांबता आरोपीने खूनानंतर मृतदेह मोटारसायकलवर घेऊन तंगडगी गावाजवळील पुलावरून नदीत फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याचा डाव उधळला गेला. आरोपी मृतदेह आणि मोटारसायकल जागीच टाकून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. समेद साबण्णवर मूळ रा. तेरदाळ, सध्या राहणार मरोल असे अटक केलेल्या आरोपीचे तर गंगव्वा सुनील त्यापी (वय 25 रा. यरटगल ता. सौंदती) असे मृत महिलेचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच सीपीआय मोहम्मद फसियुद्दीन आणि पीएसआय संजय तिपरेड्डी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेविषयी अधिक माहिती अशी, समेद आणि गंगव्वा यांच्यात प्रेम होते. मात्र घरच्यांना याची माहिती नसल्याने गंगव्वाचे लग्न सौंदत्ती तालुक्यातील अरटगल गावातील एका तरुणाशी करण्यात आले होते. पती दारूच्या व्यसनाधीन असल्याने आणि सतत होणाऱ्या त्रासामुळे गंगव्वा वारंवार माहेरी येत होती. घरच्यांनी अनेकदा समेट घडवून तिला पतीकडे पाठवले होते. तरीही काही दिवसांपासून ती माहेरीच राहत होती. गंगव्वाने आपला प्रियकर समेदशी संपर्क कायम ठेवला होता. कोणालाही न सांगता ती हुनगुंदजवळील मरोल गावातील त्याच्या शेतात आली होती.
मुलगी बेपत्ता झाल्याने तिच्या कुटुंबीयांनी सौंदत्ती पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रारही दाखल केली होती. दरम्यान, समेद दुसरे लग्न करण्याच्या तयारीत होता. ही बाब समजताच गंगव्वाने त्याला मी तुझ्या लग्नात अडथळा आणेन, तुला दुसरे लग्न करू देणार नाही, असा इशारा दिला होता. यामुळे संतापलेल्या समेदने गंगव्वाला आपल्या मार्गातून हटविण्याचा कट रचला. 13 मे रोजी रात्री सुमारे 8 वाजता त्याने तिच्यावर गंभीर हल्ला करून तिची हत्या केली.
खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने गंगव्वाचा मृतदेह मोटारसायकलवर ठेवून तंगडगी पुलाजवळ आणला. पुलावरून मृतदेह नदीत फेकण्याच्या तयारीत असताना तेथून जाणाऱ्या नागरिकांना त्याची हालचाल संशयास्पद वाटली. त्यांनी आरडाओरडा करत त्याच्या दिशेने धाव घेतली. घाबरलेल्या आरोपीने मृतदेह आणि मोटारसायकल जागीच सोडून अंधारात पळण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी त्याला पकडून चोप दिल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगितले जात आहे. मृत महिलेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे.