कणकवलीत बांधकाम व्यावसायिकाचा खून?
मूळ कळसुली येथील सुशांत दळवी यांचा मृतदेह मुरेडोंगरी नजीक आढळला; डोक्याला बंदुकीची गोळी लागल्याचा अंदाज
कणकवली / प्रतिनिधी
शहरातील बांधकाम व्यवसायिक सुशांत दळवी यांचा मृतदेह शहरातील मुरेडोंगरी परिसरातील मोहनमळा परिसरात संशयास्पद परिस्थितीत आढळून आला आहे. प्रथमदर्शनी त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झालेल्या अवस्थेत मृतदेह असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.प्राथमिक माहितीनुसार त्यांच्या डोक्याला बंदुकीची गोळी लागल्यासारखी जखम दिसून येत असल्याने हा घातपात आहे की अन्य काही याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. मात्र प्रथमदर्शनी डोक्यात गोळी लागून मृत्यू झाल्याचे दिसत असल्याने तसेच काही अंतरावर रक्तही पडलेले असल्याने घातपाताचा संशय बळावला आहे.घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनाम्याची कार्यवाही सुरू केली असून फॉरेन्सिक टीम ही दाखल झाली आहे.बांधकाम व्यावसायिकाच्या आढळलेल्या या मृतदेहामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.