खुनांच्या घटनांमुळे शांतताप्रिय जिल्ह्याला हादरे
रत्नागिरी / प्रवीण जाधव :
मागील काही वर्षात खूनासारखे गंभीर गुन्हे घडत असल्याने शांतताप्रिय असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याला हादरे बसत आहेत. मानसिक ताणतणाव, नात्यामधील दुरावा, पैशाचा लोभ अशी प्रमुख कारणे खूनासारख्या गुन्ह्यांना जन्म देतात. मागील सात वर्षाचा विचार करता जिल्ह्यात तब्बल ९१ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. समाधानाची बाब म्हणजे यावर्षी जूनअखेर केवळ तीन खून प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. खूनांच्या वाढत्या घटना चिंता वाढवणाऱ्या आहेत.
जेव्हा एखादा मनुष्य दुसऱ्या मनुष्याचे प्राण घेतो, तेव्हा केवळ एका व्यक्तीचा जीव जात नाही, तर त्या घटनेमुळे संपूर्ण समाज हादरतो. त्यामुळे खून हा फक्त कायदेशीर गुन्हा नसून एक गंभीर सामाजिक प्रश्न आहे. जिल्ह्यातील खून प्रकरणांचा विचार करता प्रेमप्रकरण, व्यावसायिक वाद, पूर्ववैमनस्य आदी प्रकार प्रामुख्याने असल्याचे दिसून येत आहे. मागील ६ वर्षाचा विचार करता सन २०१९ मध्ये १५, सन २०२० मध्ये १६ व सन २०२१ मध्ये १३ खून झाल्याचे नोंदविण्यात आले आहेत. यातील दोन वर्षे ही कोरोना काळातली आहे. लॉ कडाऊन व इतर व्यवहार ठप्प असतानाही खुनांच्या घटना सातत्याने होत असल्याचे दिसून आले आहे. यातील बहुतांश गुन्ह्यांमध्ये न्यायालयापुढे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
खुनाचा प्रयत्न कलम ३०७ अन्वये नोंदविण्यात आलेल्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. सन २०१९ मध्ये खुनाचा प्रयत्न कलमाखाली २० घटना नोंदविण्यात आल्या होत्या. तर सन २०२० मध्ये १२ तर सन २०२१ मध्ये २, २०२२ मध्ये १०, सन २०२३ मध्ये ८ तर २०२४ मध्ये १३ खुनाचा प्रयत्न असल्याचे नोंदविण्यात आले. जिल्ह्याचा विचार करता महिन्याला केवळ एक घटना घडत असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यात एकूण १८ पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी तालुक्यात शहर, ग्रामीण, पूर्णगड व जयगड आदी आहेत. तर चिपळूण तालुक्यात सावर्डे, चिपळूण आलोरे शिरगाव, संगमेश्वर तालुक्यात देवरूख व संगमेश्वर, गुहागर तालुक्यात गुहागर व दाभोळ, राजापूर तालुक्यात राजापूर व नाटे, मंडणगड तालुक्यात मंडणगड व बाणकोट तर लांजा, खेड व दापोली तालुक्यात प्रत्यकी एक पोलीस ठाणे आहेत. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी यांची भूमिका देखील महत्वाची ठरत आहे.
- खुनामागील प्रमुख कारणे
आर्थिक विषमता हे खूनाचे प्रमुख कारण मानले जाते. संपत्ती, जमीन जुमला, वारसाहक्क यांवरील वादातून अनेकदा खुनाच्या घटना घडतात. नुकतीच चोरीच्या उद्देशाने चिपळूण येथे वृद्ध महिलेचा खून करण्यात आला. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता.
- सत्ता संघर्षातून वैमनस्य
सत्तेची आणि राजकीय स्पर्धा यातून एकमेकांना संपविण्याचा विडा उचलला जातो. याचा सामाजिक स्वास्थ्यावर गंभीर असा परिणाम होत असल्याचे दिसून येते. स्थानिक वर्चस्वासाठी राजकीय वादातून खून होणे ही गंभीर समस्या आहे. सुदैवाने जिल्ह्यात किरकोळ अपवाद वगळता अशा प्रकारच्या घटनांची नोंद दिसून येत नाही.
- मानसिक असंतुलन
मानसिक स्वास्थ्य हा अलिकडचा गंभीर प्रश्न झाला आहे. रागाच्या भरात खुनाच्या घटना घडत असतात. बेरोजगारी, कौटुंबिक वाद, ताण तणाव यातून माणसाचे मानसिक आरोग्य बिघडत असल्याचे दिसून येत आहे. यातून राग, द्वेष, सूडभावना निर्माण होऊन खूनासारखे गंभीर अपराध केले जातात.
- सामाजिक विकृती
जातीय, धार्मिक वाद, कौटुंबिक कलह, प्रेमसंबंधातील अपयश इत्यादींमधून खून घडतो. राज्यभरात व देशभरात रक्ताच्या नातलगाला संपविल्याचे प्रकार दिसून येतात. त्याचप्रमाणे प्रेमात अपयश आले की, अॅसिड फेकणे, बलात्कार करुन जीवे ठार मारणे आदी प्रकार घडत असतात.
- दारू, व्यसनाधीनता व गुन्हेगारी टोळ्या
व्यसनाधीनता हे गुन्हा घडण्यात मोठे कारण ठरत आहे. व्यसनांनी जखडल्याने पैशासाठी कोणत्याही थराला जाण्याची वृत्ती वाढत आहे. यासाठीच पोलिसांकडून अमली पदार्थ विरोधी कारवाया करण्यावर भर दिला जात आहे. अमली पदार्थाचे रॅकेट उध्वस्त केले जाणे गरजेचे आहे. या गोष्टींमुळे समाजातील गुन्हेगारी वृत्ती अधिकच वाढते.
- खूनामुळे होणारे परिणाम कुटुंबाचे विघटन:
एका व्यक्तीचा मृत्यू संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करतो. बहुतेक वेळा खूनामध्ये बळी पडलेला व्यक्ती त्या कुटुंबाचा कर्ता असतो. त्याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडते. प्रत्येक व्यक्तीचे कुटुंबात अनन्य साधारण महत्व असते. कोणत्याही गोष्टींनी गेलेल्या माणसाची उणीव भरुन काढली जात नाही.
समाजात भीतीचे वातावरण खुनाची घटना घडल्यानंतर लोकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. रस्त्यावर, बसमध्ये, सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या घटना समाजात खोलवर परिणाम करतात. वृद्ध महिलेच्या झालेल्या खूनामुळे जिल्ह्यातील एकटे राहणाऱ्या वृद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
- न्यायव्यवस्थेवरील ताण
अशा घटनांमुळे पोलीस व न्यायालयावर अतिरिक्त भार पडतो. खुनाचा गुन्ह्या घडल्यानंतरचे तपासकाम पोलिसांपुढे आव्हानात्मक ठरत आहे. मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कामाला लावावे लागतात. दोषारोप तयार करणे व आरोपीला शिक्षेपर्यंत पोहोचविण्यासाठी पोलिसांना ताण सहन करावा लागतो. तसेच न्यायालयात अनेक खटले पूर्वीपासून प्रलंबित असतात.
- नैतिक अधःपतन :
खूनासारख्या घटनांमुळे समाजातील एकात्मता, विश्वास व मूल्ये डळमळीत होतात. त्याचा गंभीर परिणाम समाजमनावर होत असल्याचे दिसून येते.
- ... तर समाज अधिक सुरक्षित बनेल
खून हा समाजाच्या सुरक्षिततेला व स्थैर्याला धोका निर्माण करणारा प्रश्न आहे. तो केवळ पोलीस व न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून सुटणार नाही, तर समाजातील प्रत्येकाने हिंसाचाराविरोधात उभे राहिले पाहिजे. मानवी जीवनाचे मोल जाणून परस्परांबद्दल आदर, सहिष्णुता व प्रेमभाव ठेवला तरच खुनासारख्या घटना कमी होतील आणि समाज अधिक सुरक्षित बनेल.
- संदेश जाधव सजग नागरिक, रत्नागिरी
- शासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना
शिक्षण व जनजागृती : शालेय स्तरावर जीवनाचे महत्त्व आणि अहिंसेची शिकवण देण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
कायदा व सुव्यवस्था मजबूत करणे : गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू.
व्यसनमुक्ती व मानसिक आरोग्य सेवा : अशा सुविधा उपलब्ध केल्यास हिंसाचार कमी होऊ शकतो.
कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी समुपदेशन : वाद वाढण्यापूर्वी तोडगा काढणे आवश्यक असते. त्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात असून कौटुंबिक वाद सोडविण्यासाठी पोलिसांकडून समुपदेशन केले जाते.
सामाजिक ऐक्य वाढवणे : समाजात एकता निर्माण करण्यासाठी जनजागृती व एकात्मतेचे कार्यक्रम.