युवकाकडून चार बहिणी, मातेची हत्या
स्वत:च्याच समाजातील भूमाफियांवर ठेवला ठपका
वृत्तसंस्था / लखनौ
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे भयानक हत्याकांड नववर्षाच्या प्रथम दिनी घडले आहे. अर्शद नामक एका युवकाने आपल्या चार बहिणी आणि मातेची एका हॉटेलात निर्घृण हत्या केली. या कृत्यात त्याच्या पित्याचाही सहभाग होता, अशी माहिती समोर येत आहे. या युवकाने आपल्या या कृत्याचा व्हिडिओही प्रसारित केला आहे. या हत्याकांडामुळे लखनौ आणि आग्रा ही दोन्ही शहरे हादरली आहेत.
अर्शद हा 24 वर्षांचा असून त्याने आपल्या या कृत्यासाठी आपल्याच मुस्लीम समाजाला दोषी मानले आहे. हा युवक आणि त्याचे कुटुंब आग्रा शहरातील आहे. हे कुटुंब लखनौ येथे नववर्ष साजरे करण्यासाठी आले होते. नववर्षाच्या प्रथम दिनी या युवकाने आपल्या चार बहिणी आणि माता यांना अन्नातून बेशुद्धीचे औषध पाजले. त्याने त्यांना दारूही पाजविली असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानंतर त्याने धारदार शस्त्राने भोसकून आणि कांबीने प्रहार करून त्यांची हत्या केली. त्यांच्या मृतदेहांचा व्हिडिओ त्याने प्रसारित केला. या कृत्यात त्याला त्याच्या वडिलांचेही सहकार्य मिळाले. आपल्या बहिणी आणि आई यांची आपल्याच समाजातील भूमाफियांपासून सुटका करावी, यासाठी आपण हे कृत्य केले आहे, असे संदेशही या युवकाने व्हिडिओ चित्रणातून दिला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. हत्या करण्यापूर्वी त्याने 31 डिसेंबरला कुटुंबासह अजमेर दर्ग्याचे दर्शन घेतले होते. त्यानंतर त्याने नववर्ष साजरे करण्यासाठी कुटुंबाला लखनौत आणले होते.
बहिणींची विक्री होणार होती?
आग्रा शहरातील भूमाफियांचा अर्शद आणि त्याच्या कुटुंबीयांच्या भूखंडांवर डोळा होता. ते मिळविण्यासाठी त्यांनी या कुटुंबावर दबाव आणला होता. मात्र, या कुटुंबाने भूखंड देण्यास नकार दिला होता. या रागापोटी आपल्या चारही बहिणींचे अपहरण करून त्यांची विक्री करण्याचा कट आपल्याच समाजातील भूमाफियांनी रचला होता. आपल्या कुटुंबातील महिलांच्या अब्रूचे धिंडवडे आपल्या समाजाच्या धनदांडग्या लोकांकडून काढले जाणार होते. या सर्व त्रासातून आणि संभाव्य अप्रतिष्ठेतून आपल्या कुटुंबातील महिलांची सुटका करण्यासाठी आपण हे पाऊल उचलले आहे, असे प्रतिपादन अर्शद याने आपल्या व्हिडिओत केले आहे.
पित्याचे पलायन
अर्शद याच्या चार बहिणी आणि त्याची आई यांची हत्त्या केल्यानंतर त्याचा पिता बदर याने पलायन केले असून तो बेपत्ता आहे. त्याचा शोध घेण्यासाठी लखनौ पोलिसांनी प्रयत्न चालविला आहे. अर्शद याने स्वत:च हे हत्त्याकांड केल्यानंतर आपल्या पित्याला रेल्वेस्थानकावर सोडले आणि तो स्वत: पोलीस स्थानकात गेला, अशीही माहिती उपलब्ध झाली आहे. त्याने त्याच्या व्हिडिओत या हत्याकांडाचे जे कारण दिले आहे, त्याची पडताळणी केली जात आहे. तो आणि त्याचे कुटुंब खरोखरच भूमाफियांच्या दबावात होते, की हा केवळ बनाव असून हत्याकांडाचे खरे कारण वेगळेच आहे, याचा तपास केला जात आहे.
‘आमच्या भूखंडावर मंदिर व्हावे’
माझ्या कुटुंबातील स्त्रियांची मी त्यांच्या सन्मानाचे संरक्षण करण्यासाठी हत्या केली आहे. आमच्या भूखंडावर एका मंदिराचे निर्माण कार्य व्हावे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आमच्या कुटुंबावर दबाव आणणाऱ्या भूमाफियांचा नायनाट करावा आणि आमच्यासारख्या अनेकांचे रक्षण करावे. हे कृत्य करण्यावाचून माझ्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. भूमाफियांशी संघर्ष करण्याची शक्ती माझ्यात नाही. त्यामुळे हाच मार्ग अवलंबावा लागला. अशा अनेक धक्कादायक बाबी अर्शद याने आपल्या व्हिडिओत स्पष्ट केल्या आहेत. पोलिसांनी आता व्यापक प्रमाणात अन्वेषण कार्य हाती घेतले असून मृतदेहांचे शवविच्छेदन पार पडले आहे. गुन्हेवैज्ञानिक अहवाल काही दिवसांमध्ये मिळणार आहे.
हत्याकांडाचे कारण संभ्रमित करणारे
ड भूमाफियांपासून कुटुंबातील महिलांची सुटका करण्यासाठी कृत्याचा दावा
ड हत्याकांडाचे कारण संशय निर्माण करणारे असल्याने सखोल तपास होणार
ड अर्शद यानेच प्रसिद्ध केला हत्याकांडाचा व्हिडिओ, नंतर पोलिसांच्या आधीन