डोक्यात बिअरची बाटली मारुन खून
सातारा :
वाई शहरातील आंबेडकरनगर येथील बाभळवन नावाच्या मोकळ्या मैदानात दि. 19 रोजी रात्री 12.30 वाजता ही दारुची पार्टी पाच मित्रांनी आयोजित केली होती. त्यात दारु पिताना झालेल्या चेष्टा मस्करीतून दोघांनी एकाच्या डोक्यात बिअरच्या बाटली आणि लाकडी दांडक्याने मारहाण करुन खून केल्याची घटना घडली. खून झालेल्याचे नाव राज अरुणकुमार सिंग (वय 26, रा. जगताप हॉस्पिटलजवळ वाई) असे आहे. या खूनप्रकरणी प्रणीत गायकवाड (रा. परखंदी), शाकिर खान (रा. निळा कट्टा) या दोघांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वाई पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करत प्रणीत गायकवाड व शाकिर खान या दोघांना अटक केली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, दि. 18 रोजी रात्री 11 वाजता राज सिंग, प्रणीत गायकवाड, शाकीर खान, हर्षवर्धन कारेकर, विनोद साळुंखे हे भेटले होते. त्यांनी दारु पिण्यासाठी एका हॉटेलमधून दारु आणली. दारु पिण्यासाठी ते आंबेडकरनगर येथील बाभळवण जागेत बसले होते. शाकीर याने हर्षवर्धनला चापट मारली आणि शिवीगाळ केली. त्यामुळे हर्षवर्धन तेथून निघून गेला. दारु पित असताना राज आणि प्रणीत व शाकीर यांच्यात चेष्ठा मस्करीतून वाद सुरु झाला. त्यादरम्यान अचानक प्रणीतने बिअरची बाटली राजच्या खांद्यावर मारली. ती बाटली फुटली. त्याच फुटलेल्या बाटलीने राज याच्या डोक्यावर पुन्हा वार केला. त्यानंतर प्रणीत आणि शाकीर या दोघांनी तेथेच बाजूला असलेल्या झुडपातून बांबू आणून दोघांनी राज यास मारायला सुरुवात केली. त्यावेळी विनोद याने अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते दोघे ऐकत नव्हते. त्या दोघांनी विनोदच्या कमरेवरही बांबूने मारहाण केली. प्रणीत गायकवाड आणि शाकीर खान यांनी राजला मारहाण करुन ते दोघे दुचाकीवरुन निघून गेले. त्यानंतर दि. 19 रोजी मध्यरात्री अडीच वाजता विनोदने फोन करुन राजचा भाऊ अश्विन याला माहिती फोनवरुन दिली. तोही घटनास्थळी पोहोचला. तत्पूर्वी पोलीस पोहोचले होते. राज हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यावरुन अश्विनने वाई पोलीस ठाण्यात प्रणीत आणि शाकीर या दोघांवर गुन्हा दाखल केलेला आहे.
त्या दोघांना तीन तासात वाई पोलिसांनी उचलले
खून करून फरार झालेले दोघे नेमके कुठं गेले असतील याकरिता वाई पोलिसांची पथके मागावर होती. वाई पोलिसांनी सीसीटीव्हीची तपासणी केली असता ते दोघे परखंदीच्या दिशेने गेल्याचे समजले. त्यांना पोलिसांनी परखंदी डोंगरातून उचलले असून अवघ्या तीन तासात जेरबंद केले आहे. ही कारवाई कारवाई पोलीस अधीक्षक समिर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक वैशाली कडुकर उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी परि. पोलीस उपअधिक्षक श्याम पानेगावकर, सहायक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, पोलीस उपनिरीक्षक बिपीन चव्हाण, तपासपथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे, सहा पोलीस उपनिरीक्षक मुकुंद माळी, पो. हवा मदन वरखडे, धिरज यादव, अजित जाधव, पो.कॉ रुपेश जाधव, राम कोळेकर, गोरख दाभाडे, राम कोळी, नितीन कदम, प्रसाद दुदुस्कर, हेमंत शिंदे, विशाल येवले, धिरज नेवसे, सागर नेवसे, श्रावण राठोड, विशाल शिंदे, अक्षय नेवसे, ज्ञानेश्वरी भोसले, शितल कुदळे, स्नेहल सोनवणे यांनी केली असुन पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर यांनी वाई तपासपथकाचे अभिनंदन केले आहे.