Kolhapur Crime | नातेवाईकाकडूनच घात! गुंतवणुकीच्या नावाखाली म्हेतर दाम्पत्याकडून १५ लाखांची फसवणूक
कबनूरमधील दाम्पत्यावर आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप
दत्तनगर - शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीतून जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल १४ लाख ८३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश सुर्यकांत म्हेतर व प्रिया प्रकाश म्हेतर (दोघे रा. दत्तनगर, कबनूर) अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी अभिषेक मोहन लिपारे (वय ३१, रा. श्रीरामनगर, तारदाळ) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतूनमिळालेली माहिती अशी, फिर्यादी लिपारे व संशयित प्रकाश म्हेतर हे नातेवाईक आहेत. म्हेतर हा शेअर मार्केट व क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीचे काम करत असल्याचे सांगत होता. त्याने लिपारे यांना शेअर मार्केटमध्ये दरमहा ८ टक्के परतावा मिळवून देण्याचे आश्वासन देत गुंतवणुकीस प्रवृत्त केले. त्याच्या विश्वासावर लिपारे यांनी १२ लाख ४३ हजार रुपये दिले, तर त्यांचे सहकारी प्रमोद लक्ष्मण पोवार वदत्तात्रय चाळाप्पा होडगे यांनी मिळून २ लाख ४० हजार रुपये दिले. ही रक्कम अभिषेक ट्रेडर्स या खात्यावर वेगवेगळ्या तारखांना जमा करण्यात आली.
मात्र, सहा महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही कोणताही परतावा न मिळाल्याने लिपारे यांनी म्हेतर यांच्याकडे पैशांची मागणी केली. यावेळी म्हेतर याने पैसे बुडाले समजा, तुला जे करायचे ते कर, असे सांगत धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकीही दिली.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर लिपारे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी म्हेतर दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून प्रकाश म्हेतर याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.