महाराष्ट्र ऑलिंपिक निवडणुकीत अजित पवारांविरोधात मुरलीधर मोहोळ यांचा शड्डू
पुणे : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या आगामी निवडणुकीमध्ये आता चांगलेच राजकीय रंग भरले आहेत. विद्यमान अध्यक्ष अजित पवार यांच्याविरोधात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करून थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे ही निवडणूक गाजण्याची शक्यता आहे. ही निवडणूक 2025 ते 2029 या चार वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक प्रक्रिया आणि वार्षिक सर्वसाधरण सभा 2 नोव्हेंबरला पुण्यामध्ये पार पडेल. अजित पवार यांनी यापूर्वीच अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल केला असून, ते सलग चौथ्यांदा या पदासाठी इच्छुक आहेत. अजित पवार हे 2013 पासून म्हणजेच मागील 12 वर्षांपासून, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत.
खेळाडूंच्या आग्रहास्तव मोहोळ यांचे आव्हान
अजित पवार यांना आव्हान देण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. मोहोळ यांचा अर्ज राज्य कुस्तीगीर संघटनेकडून दाखल करण्यात आला. अनेक खेळाडू, क्रीडा संघटनांसह कुस्तीगीर संघटनांचा हा आग्रह होता, की अध्यक्षपदासाठी एक खेळाडू असला पाहिजे, असे सरचिटणीस योगेश दोडके यांनी मोहोळ यांचा अर्ज दाखल करताना सांगितले. ते म्हणाले, की मुरलीधर मोहोळ अध्यक्ष व्हावेत, ही आमची इच्छा आहे. त्यानुसारच मोहोळ यांनी या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
मोहोळ दिल्लीत व्यस्त, दोडके यांनी भरला अर्ज
अर्ज भरण्याच्या वेळी मुरलीधर मोहोळ हे दिल्लीमध्ये काही कामांमध्ये व्यस्त होते. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचा सचिव असलेल्या योगेश दोडके यांना फॉर्म भरण्यासाठी अधिकृत केले होते. त्यानुसार दोडके यांनी आज मोहोळ यांच्यावतीने अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला.