For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फोंड्यातील उद्योजक अपहरणातील मास्टर माईंड मुनीर गजाआड

12:39 PM Jun 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
फोंड्यातील उद्योजक अपहरणातील मास्टर माईंड मुनीर गजाआड
Advertisement

संदीपने मुनीरला 56 लाख रुपये देण्यात टाळाटाळ केल्याने अपहरण  

Advertisement

फोंडा : फोंड्यातील युवा उद्योजक संदीप चौधरीचे दिवसाढवळ्या अपहरणामागे भंगार व्यवसायातील त्याची पैशाची थकबाकी कारणीभूत असल्याची कबुली या अपहरणप्रकरणातील मास्टरमाईंडने दिली आहे. अपहरण कृत्यानंतर मास्टरमाईड बेंगळूरहून मुंबई येथे पलायन करण्याच्या बेतात असताना त्याला कोल्हापूर येथे पकडण्यात आले. मुनीर अल शफिक (22, मंगळूर) असे त्याचे नाव आहे. अपहरण कृत्यातील अन्य 4 साथीदार फरार असून फोंडा पोलिस त्यांच्या मागावर आहेत. सर्व संशयित मंगळूर येथील आहेत. ज्योफिलनगर-फोंडा येथून संदीप छत्रलाल चौधरी (32, मूळ राजस्थान रा.ज्योफिलनगर फोंडा) यांना कार्यालयातून बाहेर पडताना अज्ञाताकडून कारगाडीत कोंबून अपहरण केल्याची घटना मंगळवारी 10 जून रोजी दुपारी उघडकीस आली होती. संदीप याला गोव्याची बनावट नंबर प्लेट लावलेल्या स्वीफ्ट कारगाडीने मोले चेकनाक्यावरून अनमोड, खानापूरहून हुबळीमार्गे बेंगळूर येथे नेण्यात आले हेते. यावेळी मास्टरमाईड मुनीर हा बसमधून बेंगळूर येथे पोचला होता.

एकमेव ट्रेडर असल्याने मक्तेदारी 

Advertisement

अपहरणकर्त्यांनी काम फत्ते झाल्याचे मास्टरमाईंडला फोनवरून कळविण्यात आले होते. सर्व नियोजनबद्धरित्या करण्यात आले होते. कर्नाटकच्या हद्दीत पोचल्यानंतर कारची गोव्याची नंबरप्लेट काढून केए ही कर्नाटकाची नंबरप्लेट लावण्यात आली होती. मंगळूर येथील मुनीर संदीप याला भंगारअड्ड्यातून गोळा केलेला माल पुरवित होता. मागील दोन वर्षांपासून त्याने सुमारे कोटी ऊपयांचा माल संदीपला पुरविला होता. संदीप याचे गोव्यातील भंगाराचा माल घेणाऱ्या कंपनीकडे सौहार्दाचे संबंध आहे. त्यामुळे त्याच्याशिवाय अन्य कुणाला गोव्यातील कंपनी सामावून घेत नसल्याने संदीप याला माल दिल्यावाचून मुनीरला पर्याय नव्हता.

पैसे देत नाही, पाहिजे ते कर...  

अपहरणाचा मास्टरमाईंड मुनीर याला मागील एक वर्षापासून सुमारे ऊपये 56 लाख संदीपकडून येणे बाकी होते. मुनीरने पैसे मिळवण्यासाठी तगादा लावला होता. ‘पैसे देत नाही, पाहिजे ते कर’ असे संदीपने मुनीरला सहा महिन्यांपूर्वी सांगितल्यामुळे राग अनावर झाला होता. त्यातून हे अपहरणनाट्या घडले. त्याने मंगळूर येथील टोळीकडे अपहरणाची कामगिरी सोपविली. त्यात आपण कुठेच दिसणार नाही, याची दक्षता घेतली. त्यामुळेच मुनीर अपहरणासाठी वापरलेल्या कारमधून नव्हे, तर बसमार्गे बेंगळूरला पोचला होता. तेथून तो मुंबईकडे जात असताना पोलिसांनी त्यांना कोल्हापुरात अटक केली.

मुनीरच्या आवळल्या मुसक्या

फोंडा पोलिसांनी कुळे पोलिस व म्हार्दोळ पोलिसांच्या साहाय्याने 4 पथके स्थापन करून अपहरण केलेल्या संदीप याला सुखरूप गोव्यात आणले. त्यानंतर मुंबईकडे कूच करणाऱ्या मास्टरमाईंड मुनीर याच्या पाठलागासाठी दोन पथके पाठविण्यात आली होती. कोल्हापूर येथून मुनीर याला ताब्यात घेण्यात आले. तर फरारी असलेल्या अन्य चारजणांच्या शोधार्थ पोलिस कार्यरत आहेत. संदीप चौधरी प्रकृती ठिक नसल्यामुळे उपचार घेत असून त्याची जबानी अजून नोंदविण्यात आलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

निरीक्षक विजयनाथ कवळेकर याची स्टंटबाजी

फोंडा, कुळे, म्हार्दोळ येथील पोलिस स्थानकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र उपासमारी करीत गोवा ते बेंगळूर सर्कस केली. प्रथम अपहरण केलेल्या संदीप याला सुखरूप गोव्यात दाखल केले. त्यानंतर अधिक टिम व कर्नाटक पोलिसांच्या सहकार्याने पलायन करीत असलेल्या मास्टरमाईंडला कोल्हापूर येथून अटक करण्यात आली. एका आऊट पोस्टवर आयत्या आणून ठेवलेल्या मास्टरमाईंडला तडकाफडकी फोंडा पोलिस स्थानकात जीपगाडीमधून आणत आपण ही कामगिरी फत्ते केल्याचे श्रेय घेण्याचे काम फोंड्याचे पोलिस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी पेले. प्रसारमाध्यमांच्या एकाला घेऊन स्टंटबाजी करीत असल्याचे कॅमेऱ्यामध्ये टिपलेले आहे. यामुळे याकामी जीव ओतून काम केलेले कुळे व म्हार्दोळ पोलिस स्थानकाचा उल्लेखही करण्यासही ते विसरले. या गैरवर्तनामुळे उपअधिक्षक शिवराम वायंगणकर यांनी पोलिस निरीक्षक विजयनाथ कवळेकर याला तंबीही दिली आहे. मास्टरमाइंडला भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमाखाली गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली असून याप्रकरणी उपनिरीक्षक शिवराम वायंगणकरच्या मार्गदर्शनाखाली फोंडा पोलिस अधिक तपास करीत आहे.

Advertisement
Tags :

.